
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
हिंदुस्थानात पूर्वेकडील समुद्रात अंदमान व निकोबार बेटांमुळे अतिव्यग्र जलमार्गिकांवर निगराणी करण्याचे प्रचंड सामर्थ्य आपल्याला त्यांच्या भौगोलिक स्थितीमुळे प्राप्त झाले आहे. अंदमान व निकोबार बेटे संख्येत 572 आहेत. महत्त्वाच्या समुद्री दळणवळणाच्या जलमार्गिकांनजीक (सी-लेन्स ऑफ कम्युनिकेशन नजीक) असलेली तसेच आग्नेय आशिया देशांच्या संदर्भातील त्यांच्या स्थानामुळे व्यूहरचनात्मक स्थिती त्यांचे महत्त्व वाढवते. त्यादृष्टीने निकोबारमधील कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते लिटल अंदमान आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज बेट अशी सेवा अंदमान, निकोबारच्या मोठय़ा भागात सुरू झाली आहे. सुमारे 2300 किलोमीटरवर समुद्रात केबल्स टाकण्याचे हे काम नियोजित वेळेआधी पूर्ण करणे ही गोष्ट प्रशंसनीय आहे. खोल समुद्रात सर्वेक्षण करणे, केबलची गुणवत्ता कायम राखणे आणि विशेष जहाजांद्वारे केबल टाकणे हे काम सोपे नव्हते. त्यात वरून उंच लाटा, वादळ आणि पावसाचा व्यत्यय. हा प्रकल्प जितका मोठा होता, तितकीच आव्हानेसुद्धा मोठी होती. सर्व अडथळे पार करीत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता अंदमान आणि निकोबारमधील लोकांना मोबाईल जोडणी आणि वेगवान इंटरनेटसारख्या स्वस्त आणि चांगल्या सुविधा मिळू शकतील.
अंदमान आणि निकोबार हे हिंदुस्थानचे आर्थिक-सामरिक सहकार्य आणि समन्वयाचे मुख्य केंद्र आहे. हिंदी महासागर आणि आता हिंदुस्थानच्या इंडो-पॅसिफिकमधील व्यापार आणि सहकार्याच्या नव्या धोरणानुसार अंदमान आणि निकोबारच्या सर्वच बेटांचे महत्त्व प्रकर्षाने वाढले आहे. पूर्वेकडील धोरणानुसार पूर्व आशियाई देश आणि समुद्राशी जोडलेल्या इतर देशांशी हिंदुस्थानच्या मजबूत संबंधांमध्ये अंदमान आणि निकोबारची भूमिका खूपच महत्त्वाची आहे आणि अव्याहतपणे वाढणार आहे.
अंदमान आणि निकोबार येत्या काळात बंदर आघाडी विकास केंद्र हब म्हणून विकसित होणार आहे. अंदमान-निकोबार जगातील बऱयाच बंदरांपासून अगदी स्पर्धात्मक अंतरावर आहे. ज्या देशात बंदरांचे जाळे व त्यांचे संपर्क अधिक चांगले असतील, तेच व्यापाराला गती देईल.
आज हिंदुस्थान आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेतून वाटचाल करीत आहे. जागतिक उत्पादक हब म्हणून जागतिक पुरवठादार व मूल्य साखळीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेतून स्वतःला सिद्ध करण्यात गुंतला आहे. तेव्हा आपले बंदरांचे जाळे सक्षम करणे गरजेचे आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा समुद्री अर्थव्यवस्थेलाही गती देतील. मासेमारी, मत्स्यपालन आणि सागरी शैवाल शेती हा सागरी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशाचे प्रयत्न अंदमान-निकोबारला, तेथील लोकांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच जागतिक पर्यटन नकाशामध्ये एक प्रमुख स्थान मिळवून देतील.
सध्या आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग अंदमान-निकोबारच्या टोकाखालून जातात. अंदमान-निकोबार बेटांच्या मधून कोणतेही समुद्री मार्ग जात नाहीत. चीन थायलंडशी एक करार करायचा प्रयत्न करत आहे. त्यात थायलंडमधून एक ‘क्रा’ नावाचा कॅनाल तयार करण्यात येणार आहे. यामार्फत अंदमानचा समुद्र थायलंडच्या समुद्राला मिळेल. सध्या चीनचा 85 टक्के व्यापार हा मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होतो. चीनला हे धोकादायक वाटते. उद्या युद्ध झाले तर हिंदुस्थान अंदमान- निकोबार बेटांवरून हा मार्ग बंद करू शकतो. म्हणूनच जवळपास चीन दुसरा मार्ग बांधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र निकोबारमधील कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलमुळे ‘क्रा-कॅनाल’ आर्थिकदृष्टय़ा न परवणारा प्रकल्प होईल.
बंदरांच्या पायाभूत सुविधा विकासातील कायदेशीर अडथळेही दूर केले जात आहेत. सरकारचे लक्ष समुद्रात व्यवसाय सुलभीकरणाला प्रोत्साहन देणे आणि सागरी रसद सुलभ करण्यावर आहे. आता ग्रेट निकोबारमध्ये अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्चाच्या मालवाहू जहाजासाठी बंदर बांधण्याचा प्रस्ताव आहे. येत्या चार-पाच वर्षांत याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे बंदर तयार झाल्यावर मोठी जहाजे येथे उभी राहू शकतात. अंदमान-निकोबार ही सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाची बंदरे आहेत. या बंदरावरील कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलचे दोन भौगोलिक फायदे आहेत. पूर्व-पश्चिम आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गाच्या जवळ असल्याने मालाची ने-आण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि मोठय़ा प्रमाणात आर्थिक फायदाही होईल. निसर्गतः पाण्याची खोली अधिक असल्याने नवीन घडणीची मोठमोठी जहाजेसुद्धा येथे आरामात उभी राहू शकतात.
ट्रान्सशिपमेंट बंदरात मोठय़ा जहाजांनी नांगर टाकल्याने हिंदुस्थानचा समुद्री व्यापार वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासनाने गेल्या वर्षी दक्षिण खाडीत कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनलसाठी फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन देण्यात स्वारस्य दाखवले होते. हिंदुस्थानी जहाजांना कोलंबो, सिंगापूर आणि पोर्ट क्लांग (मलेशिया) या बंदरांना पर्याय म्हणून ग्रेट निकोबारचे ट्रान्सशिपमेंट बंदर आहे.
अंदमान व निकोबार द्वीपसमूहांमधील 10 अंश वाहिनी (Ten-degree channel) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 6 अंश वाहिनी (six-degree channel), जे जलमार्ग, व्यापारी नौकानयनाकरिता वापरले जातात. वर्तमान अनुमानानुसार दरसाल एकूण 60 हजारांहून अधिक नौका मल्लाक्काची सामुद्रधुनी ये-जा करण्यासाठी वापरत असतात. ऊर्जा उत्पादनांची तसेच व्यापारी आणि वाणिज्यिक उपयोगाच्या इतर वस्तूंची ने-आण त्या करत असतात. त्यामुळेच अंदमान व निकोबार बेट समूह मल्लाक्काच्या सामुद्रधुनीनजीकचा तळ म्हणून एक लाभ पुरवतो. आग्नेय आशियातील इतर सामुद्रधुनींच्याही तो सान्निध्यात असल्याने वर्दळीच्या ठिकाणांबाबतची तसेच विरुद्ध वाहतुकीची पूर्वसूचना व माहिती तो आपल्याला पुरवू शकतो.
हिंदुस्थानात पूर्वेकडील समुद्रात अंदमान व निकोबार बेटांमुळे अतिव्यग्र जलमार्गिकांवर निगराणी करण्याचे प्रचंड सामर्थ्य आपल्याला त्यांच्या भौगोलिक स्थितीमुळे प्राप्त झाले आहे. अंदमान व निकोबार बेटे संख्येत 572 आहेत. महत्त्वाच्या समुद्री दळणवळणाच्या जलमार्गिकांनजीक (सी-लेन्स ऑफ कम्युनिकेशन नजीक) असलेली तसेच आग्नेय आशिया देशांच्या संदर्भातील त्यांच्या स्थानामुळे व्यूहरचनात्मक स्थिती त्यांचे महत्त्व वाढवते.
























































