लेख – कोरोना आणि सुरक्षिततेची खबरदारी

>> डॉ. सतीश नाईक  

कोरोना संकट तूर्त तरी कमी होण्याची चिन्हे नाहीत. अनलॉक-2 चा टप्पा सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी लॉक डाऊन करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे. कारण कोरोनाच्या संकटाची संपूर्ण जाणीव असूनही असंख्य लोक आजही कोरोना निर्बंधांचे पालन करताना दिसत नाहीत. सामाजिक अंतर राखणे, मास्क लावणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आदी बाबींचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे.

 

आपण जेव्हा दुसर्‍याला इन्फेक्शन देऊ शकतो तेव्हा ते पुन्हा गोल फिरून आपल्याकडे किंवा आपल्या सग्या-सोयऱयांकडे परत येत असतं. म्हणजे मास्क हा जितका दुसर्‍यासाठी आहे तितकाच तो आपल्यासाठी देखील आहे. पुढचा बराच काळ तो आपल्या नाकातोंडावर असणं आवश्यक आहे. थोड्या काळासाठी जरी आपण घराबाहेर पडलो तरी तोंडावर मास्क हवा. वेळ काळ सांगून येत नाही. अल्पसा गलथानपणादेखील खूप महागात पडू शकतो. कोरोना विषाणू नवनव्या शरीराच्या शोधात असतो. जितक्या जास्त माणसांमध्ये घुसता येईल तितकी त्याची पिलावळ वाढत जाईल. शिवाय आपल्या आसपास वावरणार्‍या कुठल्या व्यक्तीला कोरोना आहे हे सांगणं कुणालाही शक्य नाही. काळजी, आणखी काळजी हा उद्याचा मंत्र आहे. म्हणून मास्क हवाच.

मास्क कुठला हवा हा प्रश्न साहजिकच कुणाच्याही मनात येईल. बाजारात कित्येक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. त्यातला कुठला विकत घ्यायचा हा प्रश्न समोर येईल. आपण काही रुग्णाची सेवा करण्याच्या व्यवसायात गुंतलेलो नाही. विषाणू आपल्या शरीरात घुसणार नाहीत इतकं काम करणारा मास्क आपल्याला पुरेसा आहे. मास्क बनवायचा असो की, बाजारात मिळणार्‍या मास्कमधून निवडायचा असो, तीन महत्त्वाच्या मुद्दय़ांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. पहिलं म्हणजे तो तुमच्या नाक आणि तोंडा सभोवती फिट बसला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे त्याने कोरोनासारखे विषाणू बाहेरच्या बाहेर गाळून टाकले पाहिजेत, आत शिरू देता कामा नयेत. तिसरं तो परिधान केला असताना आपल्याला सहज श्वास घेता यायला हवा. या तिन्ही पातळ्यांवर सरस ठरेल तो कुठलाही मास्क उत्तम.

इथं तोंडाला रुमाल बांधणं बाद होतं. त्याने नाकाच्या आसपासचा आणि तोंडावरचा बराचसा भाग उघडा राहतो. इथं एक सूचना करावीशी वाटते. भाजी बाजारात अनेक विक्रेते रुमाल बांधून बसलेले दिसतात. त्यांच्यापासून दूर असणं बरं. मुली तोंडाला ओढणी बांधतात तीही घट्ट असावी. काहीजण हल्ली मास्कदेखील फॅशनेबल वापरतात. मास्कचं मूळ काम विसरून नुसतं दिसण्याकडे लक्ष पुरवण्यात काय अर्थ आहे!

तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी तीन पदरी मास्क चालेल. हे काम घरी बनवलेला मास्कदेखील करू शकतो. एन-95 सारखे महागडे मास्क तर फक्त आरोग्यसेवेत काम करणार्‍या व्यक्तींनी वापरावे असं जागतिक आरोग्य संघटना सांगते.

घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क वापरावा हे उत्तमच, पण काही जणांनी मास्क वापरणं थोडंसं धोकादायक आहे. दोन वर्षांच्या आतली मुलं, ज्यांना श्वसनाचे विकार आहेत अशी मंडळी, बेशुद्ध व्यक्ती आणि काही शारीरिक समस्यांमुळं ज्यांना आपला मास्क स्वतःहून सांभाळणं शक्य नाही अशांनी मास्क वापरणं धोक्याचं आहे हे नक्की. अशा व्यक्तींनी विनाकारण बाहेर जाणं टाळलं पाहिजे. निदान गर्दीची ठिकाणं तरी हमखास टाळली पाहिजेत.

हातमोजे वापरणं कितपत फायद्याचं आहे याबद्दल निश्चित सांगता येत नाही. ग्लोव्हज कसे घालावेत आणि काढावेत याची नीट माहिती करून घेणं आवश्यक आहे. नाहीतर ग्लोव्हज्च्या बाहेर लागलेले विषाणू पुन्हा आपल्या हाताला चिकटू शकतात. शिवाय फक्त काही प्रकारचे ग्लोव्हज धुऊन वापरता येतात. कित्येक रबरी ग्लोव्हजची सॅनिटायझर सोबत रासायनिक प्रक्रिया होऊन ते खराब होतात. त्यांना सूक्ष्म छिद्रे पडतात हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ग्लोव्हज निवडणं हा गुंतागुंतीचा विषय आहे. खूप पातळ रबराचे बनलेले आणि सूक्ष्म छिद्रे असणारे ग्लोव्हज जराही उपयोगी नाहीत. रबरी ग्लोव्हज उष्म्यामुळं वितळू नयेत, एकमेकांना चिकटू नयेत यासाठी त्यांच्यामध्ये एकप्रकारची पावडर घातलेली असते. कित्येकांना त्या पावडरीची ऍलर्जी होते.

सरते शेवटी सॅनिटायझर आणि हात धुण्याचा विषय आला. सॅनिटायझर निवडणं इथपासून सुरुवात करू. कारण बाजारात फसवे, बोगस सॅनिटायझर मोठय़ा प्रमाणात आले आहेत. जागतिक पातळीवर मान्यता असलेल्या सॅनिटायझरमध्ये किमान 60 टक्के  इथेनॉल किंवा 70 टक्के आयसोप्रोपिल अल्कोहोल असतं. जगातल्या काही संस्था हीच पातळी अनुक्रमे 80 टक्के आणि 75 टक्के असावा असा आग्रह धरतात. यामुळं हातावरचे 99 टक्के बॅक्टेरिया आणि विषाणू मरतात. म्हणून विकत घेताना बाटलीवरचं लेबल नीट वाचलं पाहिजे. अर्थात, हाताला धूळ, माती, रक्त किंवा इतर द्राव लागलेले असतील तर सॅनिटायझर उपयोगाचा नाही. कारण या गोष्टी अल्कोहोलमध्ये विरघळत नाहीत. अशावेळी साबण आणि पाण्याने किमान 20 सेकंद हात धुणे महत्त्वाचे ठरते. साबण अल्कोहोल वापरल्यानं काय फरक पडतो हा विचार मनात येऊ शकतो. त्याचं कारण हा विषाणू एका तेलकट आवरणाने वेढलेला असतो. हे आवरण एकदा गेलं की विषाणू निष्प्रभ होतो. तो इन्फेक्शन करू शकत नाही. म्हणून साबणाने किंवा अल्कोहोलने हात स्वच्छ करायचे.

कोरोनाचा विषाणू शरीराबाहेर काही काळ जिवंत राहतो. कोरोना झालेल्या एखाद्या व्यक्तीचा नाकाला हात लागला आणि त्या हाताने त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी स्पर्श केला तिथे आपला स्पर्श होऊ न देणं महत्त्वाचं असतं. पण आपल्या नकळत चुका होतात. आपल्या नकळत आपण दुकानांच्या काऊंटरवर टेकतो. यासाठी पुढचा काही काळ आपल्याला खूप सजग राहावं लागेल. एकदा शरीराला या नव्या वागण्याची सवय झाली की मग प्रश्न राहणार नाही. कोरोना पसरतो तो हवेत उडणार्‍या पाण्याच्या सूक्ष्म कणांमधून. त्यामुळं जिथं हात कोरडे करण्याची मशिन्स ‘हॅण्ड ड्रायर’ लावली आहेत अशा बाथरूम्सपासून दूर राहायला हवं. टॉयलेटला जाऊन आल्यावर आपण फ्लश ओढतो. फ्लश एका विशिष्ट प्रकारे कार्य करतं. मागून जोरात पाण्याचा प्रवाह येतो. हा प्रवाह टॉयलेट सीटच्या पुढच्या भागाला आदळला की फवारा उडतो. त्या फवार्‍यातदेखील कोरोनाचे विषाणू जिवंत राहू शकतात.

याबाबत काही गोष्टींची काळजी घेणं शक्य आहे. सीट पूर्ण बंद केल्यावर फ्लश वापरला तर फवारा बाहेर उडणार नाही. आतल्या आत राहील. ज्यांना वारंवार लघवीला जावं लागतं अशांना आणि लहान मुलांसाठी डायपर वापरता येतील. लहान मुलांची टॉयलेट मधली कामं मोठय़ांना करता येतील. सोबत अल्कोहोल असलेले वेट टिश्यू ठेवता येतील. टॉयलेटला जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणं आवश्यक आहे. इतकी काळजी घेतल्यावर वॉशरूममध्ये होणारा कोरोनाचा संसर्ग खूप कमी होऊ शकतो.

जेव्हा एखादी जागा मोठय़ा प्रमाणावर सॅनिटायझ करायची असेल तेव्हा हे अल्कोहोल असलेले सॅनिटायझर वापरणं बरंच महागात पडेल. तेव्हा सोडियम हायपोक्लोराइटचं द्रावण वापरणं हिताचं ठरतं. याचा फवारा मारल्यावर जागा निर्जंतुक होतात. फवारा मारणार्‍या व्यक्तीने स्वतः पीपीई किट घालायला हवं. कारण फवार्‍यातून उडणारे तुषार त्याला त्रास देऊ शकतील. कधी कधी प्रश्न पडतो की हे 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट बनवायचं कसं? तेही कठीण नाही. बाजारात जे लिक्विड ब्लिच मिळतं. त्या द्रावात अडीच पट पाणी मिसळायचं, नुसतंच सोडियम हायपोक्लोराईट असेल तर त्यात चौपट पाणी घालायचं किंवा घरात ब्लिचिंग पावडर असते, त्यातली 7 ग्रॅम पावडर 1 लिटर पाण्यात विरघळवायची म्हणजे 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट तयार होतं.

मधल्या काळात स्वतःला निर्जंतुक करण्यासाठी 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट सॅनिटायझरचे फवारे असलेल्या कनाती उभारल्या गेल्या. कित्येक पोलीस स्टेशन आणि बाजारांच्या प्रवेशद्वारांवर या कनाती दिसल्या. याने फायदा होतो किंवा कसं हे नक्की माहिती नाही. या सगळ्यात आभासी विचार नसले पाहिजेत. लोकांना आपण सुरक्षित आहोत असा खोटा विश्वास वाटता नये. लोक खरोखरच सुरक्षित हवेत. हा प्रकार वाईट नाही. पण व्यवस्थित अभ्यास व्हायला हवा इतकं निश्चित.

आपली प्रतिक्रिया द्या