लेख – कोरोनामुक्तीच्या दिशेने प्रवास सुरू!

विलास पंढरी

देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाने मोठा हादरा बसला आहे. त्यातून सावरण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे, हे आत्मनिर्भयतेच्या मार्गावरील महत्त्वपूर्ण पाऊल असून याबरोबरच या अदृश्य विषाणूमुळे भयभीत झालेल्या जनतेला आत्मनिर्भयताही मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हिंदुस्थानच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. दहशतीखाली कुणीही पुरेशा कार्यक्षमतेने काम करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात कोरोनाची तर अदृश्य दहशत होती. त्यामुळे लसीकरण लवकरात लवकर सुरू होणे महत्त्वाचे होतेच.

गेले वर्षभर अदृश्य दहशतीमुळे संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूवरील लस अखेर आली आहे. युरोप, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लसीकरणास प्रारंभही झाला. हिंदुस्थानातदेखील लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही हिंदुस्थानात राबविली जाणार आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाने मोठा हादरा बसला आहे. त्यातून सावरण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे, हे आत्मनिर्भयतेच्या मार्गावरील महत्त्वपूर्ण पाऊल असून याबरोबरच या अदृश्य विषाणूमुळे भयभीत झालेल्या जनतेला आत्मनिर्भयताही मिळणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही हिंदुस्थानच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. दहशतीखाली कुणीही पुरेशा कार्यक्षमतेने काम करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यात कोरोनाची तर अदृश्य दहशत होती. त्यामुळे लसीकरण लवकरात लवकर सुरू होणे महत्त्वाचे होतेच. पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य व सफाई  कर्मचारी, दोन कोटी  लष्कर, निमलष्करी दले व पोलीस दले यांसारख्या अत्यावश्यक सेवांतील ‘कोरोना योद्धय़ां’ना मोफत लस दिली जाईल असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले. आधी त्यांनी ‘‘सर्व देशभर लस मोफत दिली जाईल’’, असे काहीसे संदिग्ध विधान केल्याने माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली व विरोधकांना टीका करण्यास वाव मिळाला, मात्र नंतर हर्षवर्धन यांनी ट्विट करून खुलासा केला की, या तीन कोटी कोरोना योद्धय़ांचे लसीकरण झाल्यानंतर 27 कोटी ज्येष्ठ नागरिक व मधुमेह, हृदयविकार असलेल्या रुग्णांना प्राधान्यक्रमाने लस दिली जाणार आहे. त्यांना लस मोफत द्यायची की नाही यावर विचारविनिमय सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खरे तर जगभरात सर्वांना मोफत लस कुठल्याही देशात दिली जात नाही. सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय झाला नसताना असे विधान त्यांनी करायला नको होते. देशातील 135 कोटी जनतेला लस देणे हा फार मोठा, प्रदीर्घ काळ चालणारा आणि चिकाटीने राबवावा लागणारा कार्यक्रम आहे, तो सरकारने पुरेशा गांभीर्याने आणि पद्धतशीरपणे राबविला पाहिजे. या महामारीला रोखण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, रशियामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे, मात्र त्याच वेळी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने आणखी चिंता वाढविली आहे. नवा स्ट्रेन सत्तर टक्के अधिक वेगाने फैलावत असल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिले आहेत. त्यामुळे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि आवश्यक तेव्हा हात स्वच्छ करणे याला आणखी काही महिने, कदाचित काही वर्षेही पर्याय नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘‘आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी हिंदुस्थानात तयार झाल्या आहेत, याचा प्रत्येकाला अभिमान आहे. हिंदुस्थान आत्मनिर्भर होत आहे. कोरोनाच्या दोन लसींना नुकतीच डीजीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मनिर्भय हिंदुस्थानचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केले. हिंदुस्थानींचे अभिनंदन आणि आपल्या शास्त्र्ाज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.’

कोणतीही लस विकसित करण्यासाठी दहा ते बारा वर्षे लागतात, मात्र शास्त्र्ाज्ञांनी दूरदृष्टी दाखवून यापूर्वी इतर लसी तयार करताना केलेल्या प्रयोगाच्या ज्ञानाचा उपयोग करीत जगातील 200 गटांनी त्यावर काम सुरू केले. शिवाय कोरोनाची घातकता बघता एरवीची 90 टक्क्यांपेक्षा अधिक संरक्षणाची अट शिथिल करीत जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनापासून 50 टक्के संरक्षण देणारी लस असेल तरीही तिचा वापर केला जाईल असे जाहीर केले होते. अर्थात, आजही कोरोनावरच्या ज्या लसी विकसित झाल्या आहेत त्या 90 टक्क्यांपासून पुढे संरक्षण देणाऱ्या आहेतच.

सर्वप्रथम प्रयोगशाळेमध्ये विविध संयुगांचा विचार करून विशिष्ट आजारावर हे विशिष्ट संयुग चालू शकेल का, याचा विचार होतो. त्यालाच ‘क्लिनिकल ट्रायल’ असे म्हणतात. त्यानंतर माणसावर प्रयोग करण्यापूर्वी प्रयोगशाळेत अंदाज बांधण्यात येतो. त्यानंतर लसीचा प्रयोग वेगवेगळ्या जनावरांवर करण्यात येतो. सर्वप्रथम जनावराला लस टोचून विषाणूविरुद्ध लढण्यासाठी ‘ऍण्टी बॉडी’ तयार होतात की नाही, हे बघितले जाते. त्यासह किती प्रमाणात मात्रा दिल्यानंतर त्या तयार होतात, हेदेखील पाहिले जाते. त्याचप्रमाणे जनावरांच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये ती लस कशी काम करते, त्याचे काय काय दुष्परिणाम होतात, याचा अभ्यास केला जातो. गरोदर जनावरांचाही वेगळा अभ्यास केला जातो. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष माणसावर प्रयोग केला जातो, त्यासाठी तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे 24 ते 36 जणांचा समावेश असतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 200 जणांचा समावेश केला जातो. या टप्प्यात दुष्परिणाम आणि ‘ऍण्टी बॉडी’ तयार होतात की नाही, याचा मोठय़ा प्रमाणात अभ्यास केला जातो. अखेरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 40 ते 60 हजार जणांचा समावेश असतो. या टप्प्यामध्ये दुष्परिणाम आणि ‘ऍण्टी बॉडी’ तयार होण्याची प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासली जाते. तिसऱ्या टप्प्यामध्येही अपेक्षित निकाल हाती आल्यास मग ती लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाते. सर्वसाधारणपणे हा अखेरचा टप्पा तीन ते पाच वर्षांचा असतो, मात्र कोरोनामध्ये तो दीड वर्षावर आला आहे. म्हणजे लसीकरणासाठी आपत्कालीन मंजुरी तर देण्यात आली आहे, मात्र त्यावर सतत लक्षही ठेवले जाणार आहे. जर मोठे दुष्परिणाम दिसले तर वापर बंद करण्यात येईल. म्हणूनच परवानगी देताना ‘आपत्कालीन आणि मर्यादित’ हे शब्द वापरले आहेत. अशा कष्टाने आणि काळजीपूर्वक तेही अल्पावधीत तयार केलेल्या देशी लसींचा अभिमान बाळगायला हवा.

आपली प्रतिक्रिया द्या