आशाताई कोविड योद्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संगीता पालकर, अंगणवाडी सेविका

कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी आहार वाटप, लसीकरण, बालकांचे वजन मापन, गृहभेटी, कुपोषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे पार पाडली. कुटुंब सांभाळून, कोरोना काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन त्या इतरांकरिताही कामे त्यांनी केली.

या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम करणे, लोकांना कोरोनाविषयक शिक्षण देणे, त्यांचे प्रबोधन करणे, मुलांसाठी छोटे छोटे व्हिडीओ तयार करून पालकांच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर पोस्ट करणे, शिवाय स्तनदा माता, गरोदर माता, किशोरी सक्षमीकरण कार्यक्रम, अनौपचारिक शिक्षण अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करणे हे या काळात या सेविकांसाठी आव्हानात्मक होते. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती, घर कसे चालवायचे हा प्रश्न, शिवाय वस्त्यांमधून फिरताना घ्यावी लागणारी स्वतःची काळजी. अशा वैयक्तिक सर्व विवंचना बाजूला सारून कोरोनाच्या अटीतटीच्या काळात आपल्या सर्वच अंगणवाडी सेविकांनी समाजाकरिता आणि स्वतःला कामात टिकवून ठेवण्याकरिता हे आव्हान कसे पेलले याविषयी एका अंगणवाडी सेविकेचा अनुभव.

कोरोनाने माणुसकी शिकवली

कोरोना काळात आम्हाला घरोघरी जाऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणे, लहान मुलांना पोलिओचे डोस देणे, घरोघरी अन्न वाटप इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागत होती. तसेच आम्ही घरोघरी जातो म्हणून आमची कोरोना चाचणीही केली. त्यावेळी आम्ही सर्वच जणी घाबरलो. कारण नाकातून नळी घालून चाचणी करायला काही जणींनी घाबरून नकार दिला. त्यावेळी मी असा विचार केला की, हल्ली सगळीच रिस्क आहे. नोकरी सांभाळता येईल तेवढी सांभाळायची. केव्हा ना केव्हातरी जायचं आहेच असा विचार करून कोरोना चाचणी करून घेतली, पण आम्ही सगळ्या जणी भाग्यवान निघालो. कारण जेवढय़ा जणींनी चाचणी करून घेतली तेवढय़ा जणी कोरोना निगेटिव्ह होतो.

सुरुवातीला आमच्याकडे कोरोना संरक्षणाचं संपूर्ण किट नव्हतं. शिवाय दररोज पन्नास घरं करायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही दररोज सकाळी 8 ते दुपारी 4 किंवा 5 पर्यंत पन्नास घरी जाऊन सर्वेक्षण करायचो.

घरोघरी जाऊन ज्या घरी लहान मुलं असतील, त्यांना पोलियो डोस पाजणे, डोस घेतलेल्या मुलांच्या हाताला खूण करणे, त्यांची नोंद करणे अशी कामे आम्ही करत होतो.

कोरोनामध्ये लहान मुलांना कसं जपायचं, आरोग्याची स्वच्छता कशी राखायची अशी सर्व माहिती, वयोवृद्धांची काळजी कशी घ्यायची, घराबाहेरून आल्यावर आपण आपली काळजी कशी घ्यायची इत्यादी माहिती आम्ही वेगवेगळ्या विभागात जाऊन समजावून सांगत होतो. लोकांनीही आम्ही सांगितलेलं मनापासून ऐकलं. याशिवाय प्रत्येकाच्या शरीराचं तापमान तपासणे, ऑक्सिजन तपासणे, त्याची नोंद करणे, एखाद्याचं तापमान, ऑक्सिजन कमी असेल तर महापालिकेत कळवणे अशी कामे आम्ही सगळ्यांनी केली.

कोरोना काळ सगळ्यांनीच पहिल्यांदाच अनुभवला, पण या काळात कोण उपयोगी पडला, कोण मदत न करता बाजूला होतो हे शिकवलं.