हिरवळ आणिक पाणी!

394

>> दिलीप जोशी

हा लेख लिहीत असताना खिडकीबाहेर धो-धो पाऊस पडतोय. हवेत सुखद गारवा आलाय. थोडासा वारा आहे, पण वादळ नव्हे! ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या उत्पातानंतरचं ‘पावसाचं हे आश्वासक रूप आहे. आपल्या राज्यात आणि सबंध देशभर त्याने आकाश व्यापून टाकलंय. या वर्षी पाऊस चांगला होणार असा अंदाज होताच. म्हणूनच ‘करोना’च्या संकटकाळात बळीराजाला सुखावणाऱया पावसाने थोडा दिलासा दिलाय. तो नियमित पडावा आणि धरित्री सुजलाम् सुफलाम करून जाव अशीच इच्छा कुणीही व्यक्त करील.

आपल्या कृषीप्रधान देशात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील हिंदुस्थानात विविध पिकं आणि फळाफुलांची जेवढी रेलचेल असते तेवढी इतरत्र खचितच पाहायला मिळेल. लवंग, दालचिनीसारख्या मसाल्याच्या पदार्थांनी तर व्यापारासाठी परदेशीयांनाही आकर्षित केलं असा आपला कृषी इतिहास. धनधान्य, पशुवृद्धी अशी आपली पारंपरिक प्रार्थना. ती ऐकून ‘नेमेचि येणारा पाऊस’ आपल्याकडे चार महिन्यांचा संपूर्ण ऋतू म्हणून राहतो. वर्षातील एक तृतीयांश भाग पावसाचा असतो. जगात असंही अन्यत्र घडत नाही. बारमाही रिमझिम पाऊस होणारेही अनेक देश आहेत, परंतु सातत्याने चार महिने बरसून भूमी तृप्त करणारा पाऊस आपल्याकडचाच.

महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कृपेमुळे कोकणात प्रचंड पाऊस होतो. त्यामानाने विदर्भ, मराठवाडय़ात कमी. राज्यातील काही भाग तर कायम पर्जन्यछायेखाली किंवा दुष्काळी असतो. यावेळच्या आतापर्यंतच्या वृत्तानुसार अशा ठिकाणीही पावसाने कृपा केली आहे. तो असाच साथ देत राहील आणि दुष्काळ अथवा महापूर अशा आपत्तींपासून हा पावसाळी मोसम मुक्त राहिला तर विराट निसर्गाचे आभार मानावे तेवढे थोडेच.

या महिन्याच्या आरंभी हरित क्रांती दिवस होता. एकेकाळी धान्य समृद्धी असलेल्या आपल्या देशाने गेल्या अनेक शतकांत मोठमोठे दुष्काळही सोसले. विसाव्या शतकातल्या महादुष्काळाने बंगाल आणि बिहारमध्ये उपासमारीने अनेकांचे बळी गेले. या नैसर्गिक अवकृपेवर काहीतरी कायमचा उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर.

तरीसृद्धा एकोणीसशे साठचं दशक देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण करीत सुरू झालं. त्यातच एकोणीसशे बासष्टच्या चिनी आक्रमणानंतर देशामध्ये एकोणीसशे छप्पन्नमध्ये बंद केलेली ‘रेशनिंग’ व्यवस्था पुन्हा सुरू झाली. अन्नधान्याचा तुटवडा इतका होता की, अमेरिकेकडून ‘पब्लिक लॉ 480’ किंवा ‘पीएस 440’ नावाने गव्हाची आयात होऊ लागली. मुंबईसारख्या महानगरांमध्ये रेशनवर हा लाल रंगाचा, चिकट पोळी होणारा गहूसुद्धा तुटपुंजा मिळू लागला. तांदूळ, साखर तर माणशी काही ग्रॅम असा तो दुर्धर काळ आमच्या पिढीने अनुभवला. या असल्या धान्यासाठीही रेशन दुकानासमोर तीन-तीन तास रांगेत उभे राहावे लागायचे. इंधन गॅस तर सहजपणे मिळत नव्हतंच, पण रेशनवरच्या केरोसीनचा (रॉकेल) पुरवठाही नीट नसायचा.

1968 मध्ये लाल बहादूर शास्त्र्ााr देशाचे प्रधानमंत्री झाले. त्यांना बालपणीचा शेतीचा अनुभव होता. देश अन्नधान्य संपन्न व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्याला साथ मिळाली ती आपल्या महाराष्ट्रातले केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांची. अण्णासाहेबांची शेतीविषयक जाणीव आणि अभ्यास प्रचंड होता. त्यांची तीन व्याख्यानं त्यावेळी ऐकल्याचं आठवतं. अधिक पीक देणारं बियाणं वापरून उदंड पिकं घेतली तरच दुष्काळावर मात करता येणार होती. शास्त्र्ााrजी लवकर गेले, पण नंतर प्रधानमंत्री झालेल्या इंदिरा गांधींनीही अण्णासाहेबांना पूर्ण पाठिंबा दिला. मला वाटतं मेक्सिकन ड्वार्फ प्रकारच्या गव्हाचं बियाणं आणून पंजाब, हरयाणातही व्यापक पेरणी झाली. त्याचे चांगले परिणाम दिसू लागल. इतके की, 1968 मध्ये या राज्यांमध्ये अनेक शहरांत गव्हाचा प्रचंड साठा दिसू लागला. त्या आनंदात केंद्र सरकारने गव्हाची क्रांती किंवा ‘व्हीट रेव्हल्युशन’ असं पोस्टाचं तिकीटही प्रसिद्ध केलं. आता घाणेरडय़ा लाल गव्हासाठी अमेरिकेकडे बघायची गरज नव्हती.

याच काळात महाराष्ट्रात वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांना या कृषिक्रांतीमध्ये विलक्षण रस होता. त्यामुळे थोडय़ाच काळात राज्यात आणि देशात अन्नधान्य साठय़ात वाढ झाली. त्याचबरोबर स्वामिनाथन यांच्यासारखे कृषितज्ञ, कुरियनसारखे दुग्धोत्पादन तज्ञ देशाला लाभले. तेलबिया आणि इतर अनेक गोष्टींवर संशोधन होऊन खाद्य पदार्थांची अधिकाधिक निर्मिती होऊ लागली. त्यानंतर पशुधन, फळ बागायती, मत्स्य व्यवसाय, साखर उत्पादन या सगळय़ा गोष्टींनी गती घेतली. आज देशात अन्नधान्याचा विपुल साठा आहे असं केंद्र सरकार सांगू शकतं. त्यासाठी दूरदृष्टीने जे प्रयत्न झाले त्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा मोलाचा वाटा आहे हे आपल्याला अभिमानास्पद आहे. आताही अनेकदा दुष्काळी परिस्थिती येते, पाणीटंचाई भासते तेव्हा अशाच अथक प्रयत्नांतून, सुयोग्य नियोजनातून आणि दुर्गम भागात राहणाऱयांनाही अन्नपाणी विनासायास मिळेल अशा उत्तम वितरण व्यवस्थेतून प्रश्न सोडवता येतील. यावेळचा पाऊस देशाला आणखी अन्नसमृद्ध करील. त्या ‘हिरवळ आणिक पाण्याचं’ स्वागत करूया. संपन्नतेचं गाणं त्यातूनच निर्माण होईल.

आपली प्रतिक्रिया द्या