लेख – कोरोना जाईल, पण माणुसकी कायम ठेवा!

>> प्रमोद कांदळगावकर

कोरोना आपल्या देशात येण्यापूर्वी त्याची सुरुवात चीन या देशात झाली. त्यांनी प्रारंभी फारसे लक्ष दिले नाही. किंबहुना इतर देशांना पत्ता लागू दिला नाही. आपल्याकडे केरळमध्ये तो दाखल झाला. आपल्याकडूनही वेळोवेळी उपाययोजना करण्यात आली नाही. त्याला पोषक अशी हवाईसेवा चालूच ठेवली. त्याचा प्रसार होऊन परिणामांना सामोरे जावे लागले. यातून मार्ग काढताना बऱयावाईट घटनांचा सामना करावा लागला.

कोरोना पहिल्या प्रथम चीनमध्ये आणि बघता बघता सर्व देशांत त्याने आपले हातपाय पसरले. हिंदुस्थानमध्ये तो केरळमध्ये दाखल झाला. आज जागतिक पातळीवर थैमान घालतोय. सुरुवातीला कोरोनाला गांभीर्याने घेतले गेले नाही. त्याचे परिणाम सर्वच देशांना भोगावे लागले. त्यातही निगेटिव्ह शब्दाकडे नकारात्मक अशा स्वरूपात पाहणारे सर्वच जण कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. दरम्यान, कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांच्या घरातील सदस्यांचे अवसान गाळून पडले आणि कोरोना कुणालाही कसाही होऊ शकतो या भीतीने कित्येकांना ग्रासले. कित्येक जण तणावाच्या छायेखाली जीवन व्यतीत करीत होते. किंबहुना आजही फारशी परिस्थिती सुधारली आहे असे म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावर ठोस सावधगिरी बाळगताना दिसत नाही. कोरोनावर लस कधी येत आहे याकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. रोजची शासकीय आकडेवारी पाहता लोकांच्या मनातील भय अद्याप गेलेले नाही. प्रत्येक जिवंत माणसाला घरात बसून कसे चालेल? मग त्याने मनाशी खूणगाठ बांधली. मला कोरोनासोबत जगायचंय. तो एकदाचा घराच्या बाहेर पडला. पण आजही कोरोनाशी जगताना कित्येक संकटांशी त्याला सामना करावा लागतोय. त्यासाठी त्याला यातनामय रोजचा प्रवास करावा लागतोय. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने देशाची, राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. देश पातळीवर याचे पडसाद उमटू लागले. कित्येकांच्या नोकऱया गेल्या. त्यामुळे तणाव येऊन तणावग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली. घराघरात आनंदी वातावरणाला खीळ बसली असताना दैनंदिन जीवनात आवश्यक वस्तू खरेदी करताना भाजी विक्रेत्यांपासून व्यापाऱयांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. तर सर्वच नाही पण अनेक खासगी डॉक्टरांनी तपासणीकरिता गेलेल्या रुग्णांना घाबरवून सोडले. तर शासकीय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका, अंगणवाडी सेविका कोरोना निवारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याने रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झाली, पण त्या प्रमाणात कोरोनावर मात करण्याची संख्या लक्षणीय आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या संकल्पनेचा सर्वत्र फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या जास्त होती. या आकस्मिक आलेल्या संसर्गजन्य आजारावर ठोस उपाय काय करावेत? यात संपूर्ण आरोग्ययंत्रणा विचारात पडली असताना त्यावर घ्यावयाची काळजी आणि लक्षणे यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आणि टास्क फोर्स नियुक्त करून मुंबई आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय मंडळींनी शासन व प्रशासकीय सेवा यांनी एकत्रितपणे कंबर कसली. त्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपले योगदान दिले. त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्था यांचं पालन होण्यासाठी पोलीस, होमगार्ड, काही भागात सैनिक यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

या परिस्थितीमध्ये आबाळ झाली ती हातावर पोट असलेल्या गरीबांची. त्यांना काय करावे ते सुचेना. सुरुवातीला वाटले की, दहा पंधरा दिवसांत दूर होईल. पण मारुतीच्या शेपटाप्रमाणे ते वाढतच गेले आणि शेवटी त्यांना ‘गडया माझा गाव बरा’ असे म्हणायची वेळ आली. मग लोंढेच्या लोंढे गावाकडे निघू लागले. हाल झाले. भीक नको कुत्रा आवर, अशी अवस्था झाली. कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले. यामध्ये माणुसकी जिवंत असल्याचे प्रसंग पाहण्यासही मिळाले. कित्येकजण अन्न, धान्य तर शिजवलेले अन्न वाटप करीत असून आशेचा किरण त्यांच्या जीवनात फुलविण्याचा प्रयत्न करताना दिसले.

आजसुद्धा कोरोनाने आपल्याला काय शिकवलं, असा प्रश्न निर्माण होतो. आलेल्या प्रसंगांना धीराने सामना करायला शिकविले, सध्याच्या काळात स्वतःची काळजी घेऊन इतरांचीसुद्धा काळजी घेण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करा. संकटात सापडलेल्यांना सहकार्य करा. कोरोना आज आहे, उद्या जाईल या आशेवर जगताना आपल्यातील माणुसकी कायम ठेवावी.

आपली प्रतिक्रिया द्या