लेख – आपण सारे!

>> दिलीप जोशी

एका अकल्पित आणि आकस्मिक आजाराने पृथ्वीवरच्या समस्त मानवजातीला जागच्या जागी जखडून ठेवल्याचा अनुभव आपण सारे गेले काही महिने घेत आहोत. कोविड 19 या महामारीवर औषध कधी सापडेल याचे अंदाज वर्तवले जातायत. जगातल्या अनेक वैद्यकीय संशोधन संस्था या भयंकर रोगावरची लस (व्हॅक्सिन) शोधण्यात गुंतल्या आहेत. त्यांना लवकर आणि परिणामकारी यश आलं तर जगाची करोनाभयातून मुक्तता होईल. सध्या सर्व देशातल्या सर्वांच्याच जीवनपद्धतीचा तो केंद्रबिंदू बनलाय. त्यानुसारच सरकारी किंवा वैयक्तिक धोरणं ठरवावी लागतायत. ‘जो तो अपुल्या जागे जखडे, नजर न धावे तटापलिकडे’ या अवस्थेतून हळूहळू आणि सावधपणे बाहेर येण्याचा प्रयत्न आपण सारे करत आहोत.

हे ‘आपण सारे’ म्हणजे जगभर विस्तारलेली मानवी वस्ती. आता ती आठ अब्जांच्या जवळ चालली आहे. त्यापैकी बरीचशी वस्ती आशियात आणि त्यातही चीन आणि हिंदुस्थानमध्ये आहे. आशियाई देशात तसंच मध्यपूर्वेपर्यंत लोकसंख्या जास्त असल्याचं कारण म्हणजे इथली मानवी संस्कृती प्राचीन आहे. हजारो वर्षं त्या-त्या काळातली प्रगत माणसं इथे राहात आली आहेत. सर्वात प्राचीन संस्कृतीबद्दल जगात वाद चालत असला तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत पौर्वात्य देशातले मानवी व्यवहार इतिहास काळात अधिक प्रगत होते. इथे संपन्नता होती हे सर्वज्ञात आहे. म्हणून तर हिंदुस्थानकडे परकीय आक्रमकांच्या नि व्यापाऱयांच्या नजरा वळल्या.

त्या तुलनेत युरोपमध्ये हजार-पंधराशे वर्षांची समृद्ध परंपरा आढळेल. अमेरिका तर सतराव्या शतकापासून वसत आणि प्रगत होत गेलेला देश. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे दक्षिण गोलार्धातले महत्त्वाचे देश तसेच, अर्थात या सर्व भागांत त्यापूर्वीही तिथल्या आदिवासींचं राज्य होतं. यंत्रयुगाने आधुनिकता आलेल्या युरोपीयांनी त्या बळावर जग काबीज केलं. नंतरच्या काळात त्यांना काही ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला, तर काही ठिकाणी त्यांनी कायमचा जम बसवून तो प्रदेश स्वतःचा केला.

माणसं ज्याकाळी जथ्याने भ्रमण करत त्यावेळी अवघी पृथ्वी त्यांची होती. आधुनिक पारपत्र वगैरे सोपस्कार नव्हते. जिथे स्थिर राज्य होती तिथे परवाना मिळवून व्यापार वगैरे होत असे. परंतु तोही काही लोकसमूहांनी ठराविक प्रदेश निवडून स्थिर नगररचना केल्यानंतर. अशी महत्त्वाची संस्कृती, सिंधू संस्कृतीच्या रूपाने आपल्याकडे डोलावीरा आणि लोथल येथे अवशेषरूपाने दिसून येते.

‘वाढता वाढता वाढे, व्यापिले पृथ्वीगोलका’ असा लोकसंख्येचा प्रसार मात्र गेल्या काही ‘शे’ वर्षात झाला. त्यातही एकोणीसाव्या शतकानंतर बदललेल्या जीवनमानाने आणि आधुनिक औषधोपचारांनी जगातला मृत्यूदर आटोक्यात आला. ठिकठिकाणच्या हरितक्रांतीने दुष्काळावर मात करता आली. अवर्षण पडलं तरी उपासमार होणार नाही एवढा धान्यसाठा आणि तो पुरवण्यासाठी दळणवळणाची साधनं उपलब्ध झाली. घोळ असेल तो नियोजनाचा. त्याचा फटका अनेकांना बसतोच. युद्धात लाखो लोकांचे प्राण जाण्याचं प्रमाणही कमी झालं. तरी विसाव्या शतकात दोन महायुद्ध, संसर्गजन्य आजार आणि दुष्काळ यांनी लाखो बळी घेतल्याची नोंद आहेच.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परिस्थिती पालटली. 1947 मध्ये चाळीस कोटी लोकसंख्येचा असलेला आपला देश आता 130 कोटींचा झालाय. स्कॅडिनेव्हियातील काही देशातली लोकसंख्या कमी होताना दिसली तरी तो अपवाद. बाकीच्या जगात ती वाढतच आहे. लोकसंख्येच्या बाबतीत इसवी सनापूर्वीपासून सुरुवात करायची तर सुमारी 10 हजार वर्षांपूर्वी सर्व जग एक कोटी माणसांचं असावं. त्यानंतर 5 हजार वर्षांनी ते 10 कोटींचं झालं. इसवी सनारंभी ते अर्ध्या अब्जापर्यंत पोहचले. यामध्ये अनेकदा रोगराई, दुष्काळ आणि युद्धामुळे लोकसंख्या विसाव्या शतकापर्यंत चढत्या क्रमाने जात राहिली आणि या शतकाच्या उत्तरार्धात लोकसंख्या वाढली. 1968 मध्ये जागतिक लोकसंख्येने सर्वाधिक 21 टक्के वाढ पाहिली.
इ.स. 1800 मध्ये 1 अब्ज असलेली जगाची लोकसंख्या 1927 मध्ये 2 अब्ज, 1960 मध्ये 3 अब्ज, 1974 मध्ये 4 अब्ज, 1999 मध्ये 6 अब्ज आणि 2012 मध्ये 7 अब्ज झाली. 2023 मध्ये ती 8 अब्जांचा टप्पा ओलांडेल. 2055 मध्ये 10 अब्ज आणि 2088 मध्ये 11 अब्ज होईल असा अंदाज आहे. याचा अर्थ पुढची लोकसंख्यावाढ, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांमुळे कमी होईलसं दिसतं. 11 जुलैचा जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हा आढावा घेतला.

सुमारे 80 लाख प्रकारच्या सजीव प्रजातींमधली मानवी ही एक समूहाने राहणारी प्रजाती. आपलंच वर्चस्व आज साऱया जगावर आहे. सौहार्दाने, सामंजस्याने राहिलो तर आपण सारे या पृथ्वी नावाच्या सुंदर ग्रहाचा स्वर्ग बनवू शकतो. आपल्याबरोबरच इतर असंख्य प्रजातींना वाचवून जगाचं वनस्पतींसह जैविक वैविध्य टिकवू शकतो. आज ‘कोरोना’सारख्या आकस्मिक संकटाला सामोरं जाताना एकूणच जीवनपद्धतीचा विचार आपण सारे, सुमारे आठ अब्ज करणार आहोत का, हाच प्रश्न आहे.

आपली प्रतिक्रिया द्या