
>> द्वारकानाथ संझगिरी
गेल्या दोन-तीन दिवसांत आयपीएल पाहताना मला माझ्या हृदयाच्या ठोक्यांवर ताबा ठेवता आलेला नाही. ‘मिस्सिंग बिटस्चा’ त्रास व्हायची भीती वाटायला लागली. हृदयाचे ठोके तरी किती चुकावेत? मॅच एका संघाकडून दुसऱया संघाकडे अशा जात होत्या की, लंबकसुद्धा ओशाळला असता. प्रत्येक चेंडू एका संघाला विजयाचं स्वप्न दाखवत होता आणि त्याचवेळेला दुसऱया संघाचं स्वप्न उद्ध्वस्त करत होता. राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबची मॅच अतिशय रोमहर्षक झाली असे वाटत असतानाच मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू मॅचने रोमहर्षकतेचं शिखर गाठलं.
काय स्क्रिप्ट लिहिली नियतीने!
ज्या जगातल्या सर्वोत्पृष्ट फलंदाजाला म्हणजे विराट कोहलीला 3 धावा करताना 11 चेंडूंकडे भिकेचं वाडगं फिरवावं लागलं. त्याने सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर चौकार ठोपून मॅच जिंकली. विराट कोहलीने मॅच जिंकल्यावर सुस्कारा सोडला असेल. कारण पुणालाही दोन्ही डोळय़ांत अश्रू नको असतात. स्वतःच्या फलंदाजीच्या अपयशाचे अश्रू त्याच्या डोळय़ांत आधीच होते. त्यात मुंबई संघ कोमात गेलाय असं वाटत असताना ईशान किशन आणि पोलार्डने एक स्वप्नवत भागीदारी केली. 5 षटकांत 90 धावा त्यांनी केल्या. व्हेंटिलेटरवरचा संघ उठून धावायला लागला आणि मॅच टाय झाली. विराट कोहलीच्या दुसऱया डोळय़ातही अश्रू जमा व्हायला सुरुवात झाली होती. पण सैनीने अप्रतिम सुपर ओव्हर टाकली. किशन केवळ थकल्यामुळे असेल, सुपर ओव्हरमध्ये खेळायला आला नाही. त्यामुळे मुंबई संघाला सुपर ओव्हरमध्ये फक्त 7 धावा करता आल्या. मागे वळून पाहताना किशनला फलंदाजीला न पाठवणं ही मुंबई संघाला घोडचूक वाटली असावी, कारण तो पूर्णपणे सेट झालेला फलंदाज होता.
त्यानंतर सुपर ओव्हर खेळण्यासाठी आरसीबीसाठी ए बी डिव्हिलीयर्स येणार हे तर नक्कीच होतं. प्रश्न होता की, दुसरा कोण येणार? एबीडीबरोबर कर्णधार विराट कोहलीला पाहिल्यानंतर एक सुखद धक्का बसला. यालाच ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ असं म्हणतात. मोठेपणाचं हे लक्षण आहे. म्हणजे मूळ मॅचमध्ये 3 धावा करताना धडपडल्यावरसुद्धा ज्या वेळेला जबाबदारी खांद्यावर आली तेव्हा ती जबाबदारी विराट कोहलीने झटकली नाही, तर ती यशस्वीपणे झेलली. त्याचबरोबर अचानक, अनपेक्षितपणे वेगळं द्वंद्व डोळय़ासमोर उभं राहिलं आणि पाहायला मिळालं. एबीडी आणि विराट कोहली हे जगातले या फॉरमॅटमधले दोन सर्वश्रेष्ठ फलंदाज. आणि त्यांच्यासमोर उभा कोण ठाकला होता, तर बुमराह! म्हणजे या फॉरमॅटमधला सर्वश्रेष्ठ गोलंदाज. असं युद्ध नियतीने अचानक जुळवून आणलं. बुमराहचे यॉर्पर्स लक्ष्याचे योग्य वेध घेत असताना त्याने एबीडीला एक बाऊन्सर टाकला. खरं तर जेव्हा तुम्ही बाऊन्सर टाकता त्यावेळी तुमच्याकडे फाइन लेग हा हवाच हवा. कारण फलंदाज हुक करणार ही काळय़ा दगडावरची रेष आहे, आणि विशेषतः अशा प्रसंगात ज्यावेळी प्रत्येक चेंडूवर धाव घेणं हे अत्यंत गरजेचं होतं. त्याने बाऊन्सर तर टाकला, पण त्याने फाइन लेग ठेवला नाही. त्यामुळे एबीडीला 4 धावा मिळाल्या आणि तिथेच खूप वेळाने यश विराटकडे पाहून हसलं. मग त्याचा हात हातात घेऊन त्याच्याबरोबरच आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलं.
मुंबईने टॉस जिंपून क्षेत्ररक्षण घेतलं. दव ज्या पद्धतीने सध्या अरबी आखातात गोलंदाजांना त्रास देतंय हे पाहिल्यावर कर्णधाराला वेगळा विचार करणं कठीण आहे. ओला झालेला चेंडू किती वेळा कोरडा करावा लागत होता. गोलंदाजांना चेंडू ग्रीप करायला त्यामुळे त्रास होत होता. फिंचने आरसीबीला झंझावाती सुरुवात करून दिली होती. फिंचचा हा आठवा संघ आहे. म्हणजे 7 संघांचं पाणी पिऊन हा इथे आलेला आहे. त्याला कर्नाटकच्या पॅडीकलने चांगली साथ दिली. विराट कोहली आला आणि प्रत्येक धावेसाठी झगडला. त्यामुळे आरसीबीच्या धावांची गती थोडी घसरली. पण नंतर सर्व सूत्र ए बी डिव्हिलीयर्सने हाती घेतली. एबीडी ज्या चेंडूवर षटकार ठोकतो ना त्या प्रत्येक चेंडूची किंमत 6 धावांची एरव्ही नसते हं! एबीडीची गुणवत्ताच अशी आहे की, तो त्या चेंडूची किंमत षटकार अशी ठरवतो. आयपीएलमध्ये सीमारेषा लहान आहेत. पण एबीडी थेट रिकाम्या स्टॅण्डमध्ये चेंडू पोचवत होता. एबीडीची खेळी दम न लागता पाहणाऱयाला कोविडची लक्षणं नाहीत असं त्याने खुशाल समजावं. कारण आपण ते फटके पाहताना इतक्या वेळा श्वास रोखून धरतो की, ती एक गोष्ट दर्शवते की आपलं फुप्फुस एकदम तंदुरुस्त आहे. कारण त्याशिवाय इतके श्वास रोखून खेळी पाहणं फार कठीण आहे. एबीडी खेळत असताना समोरच्या फलंदाजालासुद्धा स्फूर्ती मिळते. दुबेने 10 चेंडूंत 27 धावा केल्या आणि त्यामुळे आरसीबीचा धावफलक 200च्या पुढे गेला. मुंबई इंडियन्सच्या डावात विराट कोहली एक मास्टरस्ट्रोक खेळला. त्याने पॉवरप्लेमध्ये चक्क ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला आणलं. प्रत्येक फिरकी गोलंदाज नवा चेंडू चांगला वापरतो असं नाही, पण वॉशिंग्टन सुंदरने तो अप्रतिम वापरला. त्याने 4 षटकांत फक्त 12 धावा दिल्या आणि मुंबई संघाचा एक्का म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा खिशात टाकला. सूर्यपुमार यादव हा सध्या चांगल्या फॉर्मात असलेला फलंदाज आहे आणि खेळतोही सुंदर. पण या सामन्यात तो उडाणाचा चेंडू शरीरालगत कट करायला गेला आणि एबीडीने जवळजवळ बोटात तो झेल घेतला. त्यानंतर 200 धावा या 200 मैलावर आहेत असं वाटलं. पण मुंबई इंडियन्सची एक गोष्ट चांगली आहे, त्यांच्याकडे मोठे फटके खेळणारे फलंदाज अगदी खालच्या क्रमांकापर्यंत आहेत. त्यात आरसीबीच्या चहल-झांपा या लेगस्पिनर्सना चेंडू ग्रीप करणं कठीण होतंय असं जाणवत होतं. त्यांच्यावर जो प्रतिहल्ला ईशान किशन आणि पोलार्डने केला तो डोळय़ांनी पाहिला म्हणून मी विश्वास ठेवला. एरव्ही त्यावर विश्वास ठेवणं ही कठीणच गोष्ट होती. त्यावेळी षटकार मारणं ही क्रिकेटमधली सर्वात सोपी गोष्ट वाटायला लागली होती. पोलार्डच्या बॅटला फक्त सहाचा पाढा शिकवलाय अशी माझी धारणा झाली होती. पोलार्डचाच पाढा किशनने पटकन गिरवला. दबावाखाली आरसीबी क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले, धावा दिल्या. आरसीबीने जिंकलेली मॅच मुंबई इंडियन्सने खेचून नेली होती. पण शेवटच्या क्षणी नियतीने पुन्हा एकदा आरसीबीला काwल दिला. टी-20 क्रिकेट ‘रोमहर्षक’ या शब्दाची व्याख्या बदलणार आहे.



























































