
21 डिसेंबरला सुरू झालेले सूर्याचे उत्तरायण परवा संपले. बरोबर सहा महिन्यांचा कालावधीचा हा सूर्याचा भासमान प्रवास. 21 जून रोजी त्याचे दक्षिणायन सुरू झाले. त्या वेळी तो हिंदुस्थानच्या मध्यातून जाणाऱया कर्कवृत्तावर म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला साडेतेवीस अक्षांशावर होता. पृथ्वीचा अक्ष बरोबर तेवढाच कललेला असल्याने उज्जैनच्या पुढच्या उत्तरेकडच्या गावात सूर्य अगदी डोक्यावर कधीच येत नाही.
महाराष्ट्रात मात्र सूर्य अगदी माथ्यावर तळपण्याची वेळ वर्षातून दोन वेळा येते. मे आणि जुलैमध्ये विशिष्ट तारखेला सूर्य भर मध्यान्ही डोक्यावर येतो आणि आपली सावली अगदी पायावर पडते. अशावेळी एक पोकळ नळी सरळ हातात घ्यावी, तर सूर्यकिरणे त्यातून आरपार जाऊन नळीची सावली काळय़ा कडय़ासारखी (रिंग) दिसते. मे महिन्यात असा प्रयोग आम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतो, परंतु या वेळच्या सगळय़ाच खगोलीय कार्यक्रमांना ‘कोरोना’चं ग्रहण लागलं. जुलै महिन्यात पुन्हा सूर्य डोक्यावर येईल, पण आपली पायात पडणारी सावली अनुभवता येणार नाही. कारण मोसम पावसाचा असेल. 21 जूनचं कंकणाकृती सूर्यग्रहण मात्र डेहराडूनला चांगलं दिसलं.
कर्कवृत्त दाखवणारी एक भिंत जयपूरचे राजे सवाई जयसिंग यांनी उज्जैनला बांधली आहे. ती फार पूर्वी पाहिली. अठराव्या शतकात जयपूरच्या या वैज्ञानिक दृष्टी असलेल्या राजाने जंतरमंतर (यंत्रमंत्र) नावाने पाच वेधशाळा उभारल्या. ‘जंतर’ म्हणजे येंतर. म्हणजे यंत्र आणि मंतर म्हणजे मंत्र. यापैकी यंत्रचा अर्थ अर्थातच मशीन किंवा मॉडेलद्वारे केलेली रचना. मंतर म्हणजे मंत्रणा किंवा विचारयंत्र-विचारातून केलेल्या या पाच रचना, जयपूर, उज्जैन, काशी, मथुरा आणि दिल्ली अशा पाच ठिकाणी होत्या. यापैकी जयपूरचे ‘जंतरमंतर’ उत्तम स्थितीत असून त्यातील ‘सम्राट यंत्र’ आजही जयपूरची वेळ सावलीच्या सहाय्याने अचूक दाखवते. ते प्रचंड आकाराचे सावलीचे घडय़ाळच आहे. आपल्या देशात खगोलशास्त्र्ााचा त्या त्या काळाला अनुसरून सखोल अभ्यास केला होता. त्यातील दृश्य प्रयोगशाळेच्या स्वरूपात ‘जंतरमंतर’, कोणार्कचे सूर्यमंदिर अशा गोष्टी पाहायला मिळतात.
सूर्य दक्षिणेकडे निघाला आणि माथ्यावर तळपला तरी या काळात पृथ्वी सूर्यापासून तिच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे लांब असते. शिवाय आपल्याकडे आकाश मेघाच्छादित असल्याने उन्हाचा फारसा त्रास होत नाही. आता 21 सप्टेंबरला सूर्य पुन्हा विषुववृत्तावर पोहोचेल आणि मग दक्षिण गोलार्धात जाईल तिथे त्याचा मुक्काम 21 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. मग त्याचा परतीचा प्रवास. याचा अर्थ आपण राहतो त्या पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर सूर्य 21 मार्च ते 21 सप्टेंबर असे सहा महिने तर दक्षिण गोलार्धावर 21 सप्टेंबर ते 21 मार्च असे सहा महिने तळपतो. म्हणून आपल्याकडे 21 जून हा सर्वांत मोठा दिवस तर दक्षिण गोलार्धात 21 डिसेंबर हा सर्वांत मोठा दिवस.
मात्र दक्षिण गोलार्धावर सूर्य तळपत असताना पृथ्वी तिच्या भ्रमणकक्षेत सूर्याच्या जवळ असल्याने तिथला उन्हाळा अधिक कडक असतो. आता सूर्याचे दक्षिणायन सूरू झाले असले तरी तो 21 सप्टेंबरपर्यंत उत्तर गोलार्धातच असेल. त्यामुळे पावसाळय़ात ढगाळ वातावरणातही आपल्याला मेघातून फिल्टर झालेला सूर्यप्रकाश बराच वेळ मिळत असतो.
सूर्य-पृथ्वीच्या नात्याची ही अशी कहाणी. पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा, साडेतेवीस अंशाचा कललेला अक्ष यातून आपले ऋतुचक्र बहरते. सप्टेंबर ते मार्च या काळात दक्षिण गोलार्धातील सागराचे पाणी तापते. प्रखर सूर्यप्रकाशाने निर्माण झालेली पाण्याची वाफ पावसाळी ढग निर्माण करते आणि मेअखेरीस उत्तर गोलार्धाकडे मेघांचा प्रवास सुरू होतो. जूनमध्ये पाऊस केरळमध्ये आणि जुलैपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानात दाखल होतो.
ऋतुमानातला पावसाळय़ाचा काळ हे आपल्या ग्रहांचं वैशिष्टय़ आहे. कारण पृथ्वीसारखा पृष्ठभागावरचा 75 टक्के जलाशय इतर कोणत्याही ग्रहावर नाही. त्यामुळे तेथे पाऊस नाही. पृथ्वी नावाच्या सुंदर ग्रहावर असल्यानेच आपल्याला अनेक ऋतुंच्या सौंदर्याचा आणि कधी कधी रौद्र रूपाचाही अनुभव येतो. महाराष्ट्राला तडाखा देऊन गेलेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ हा निसर्गाचा असाच एक रौद्रभीषण अवतार.
संपूर्ण विश्वातील अनेक गोष्टी आपल्याला अगम्य आहेत, अशी एकदा चर्चा चालली असताना तिथे असलेले ज्येष्ठ फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ उद्गारले, ‘आपल्या पृथ्वीचा तरी संपूर्ण परिचय आपल्याला अजून कुठे झालाय.’ खरंच आहे ते. विराट निसर्गाची लहर लक्षात घेऊनच आपल्याला अंदाज बांधावे लागतात. त्यासाठी आधुनिक यंत्रे उपयुक्त ठरतात. निसर्गातील अगम्यतेचा शोध घेणं हे विज्ञानाचं एक कार्य आहे.



























































