
>> नीती मेहेंदळे
मंडणगडाहून जंगलधारी वाटांनी रात्री निघायचं. डाव्या बाजूला संपूर्ण नक्षत्रांनी भरलेलं चमचमतं ताट वाढून ठेवलेलं दिसतं आकाशात. चांदण्या रात्री आपलं हे सौभाग्य समजून डोळे भरून घ्यायचं. एसटी थडकते ती थेट दापोलीच्या वेशीला. खारट वशट वासापासून हाकेच्या अंतरावर वसलेलं एक सुशिक्षित गोमटं गाव. खरंतर तालुकाच. आसपासच्या हजारो वर्षांच्या इतिहासाला कवटाळून असलेलं. कोकणातलं हिल स्टेशन म्हणून दापोलीने शिरावर जणू राणीसारखा मुकुटच परिधान केलेला आहे.
दापोलीला खेटून असलेल्या गिम्हवणे जवळचं प्राचीन धाटणीचं व्याघ्रेश्वर एक निसर्गरम्य शिवमंदिर मानलं जातं. त्याच्या परिसरात काही भग्न मूर्ती दिसतात. एक सुरेख लहानशी पायऱ्यांची बारवही तिथे आहे. मंदिर साधारण हजारेक वर्षांपूर्वी बांधलंय असं गावकरी सांगतात.
इथून जवळच समुद्राला लगत लाडघरचा अतिशय मनोहर समुद्रकिनारा आहे. त्याच्या सान्निध्यात वेळेश्वर आपलं बस्तान कित्येक शतकं थाटून बसलेला दिसतो. मंदिराचं जोतं चांगलं पुरुषभर उंच, विस्तीर्ण आणि संपूर्ण भक्कम अशा काळ्या दगडाचं आहे. वरील कळसापर्यंतची उभारणीही अतिशय सुबकतेची आहे.
वेळेश्वरासंबंधी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे.
प्राचीन काळी एक गुराखी गायी चरायला देवळामागच्या मोकळ्या जमिनीवर येत असे. त्याबरोबर एक गाय इतर गायींसोबत येत असे. गुराख्याने कुतूहलाने तिचा माग काढला तेव्हा समजले की ही गाय दररोज येऊन रानात असलेल्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करते आणि समोर लाडघरच्या समुद्रात असलेल्या पाषाणामागे निघून जाते. मग ही गोष्ट त्याने तिथे असलेल्या गाईच्या मालकास सांगितली व गाय चारल्याचा मोबदला मागितला. यावर त्या व्यक्तीने शेरभर लाह्या गुराख्याच्या घोंगडीत ओतल्या. गुराख्याला हा मोबदला अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही म्हणून घरी परतताना घोंगडीतल्या त्या लाह्या समुद्रकिनारी झटकल्या आणि घरी पोचल्यावर पाहतो तर काय घोंगडीला चिटकून राहिलेल्या लाह्यांच्या मोहरा झालेल्या.. त्यानंतर गाईचं वाट वाकडी करून येणंही बंद झालं. शिवाय ज्या लहान मुलांना वेळा लागतात (वेळा म्हणजे हातपाय बारीक होऊन तिरपे होणे, पोट वाढणे इत्यादी) अशी लहान मुलं या मंदिरातील तीर्थ घेतल्याने एकदम निरोगी आणि व्यवस्थित होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. वेळा घालवतो म्हणून वेळेश्वर असेही म्हणण्यात येते. 1885पासून या मंदिराला पेशव्यांची सनद येते आहे.
दापोलीहून गावतळ्याला जायच्या मार्गावर डिगेश्वर शिवमंदिर कोळबांद्रे या माड-पोफळी, बारमाही वाहणारी नदी, विरळ लोकवस्तीच्या गावात वसलेलं आहे. हे एक प्राचीन देवस्थान असून पूर्वी या मंदिराच्या जागेत शेती केली जात असे. एकदा या जमिनीत नांगरणी सुरू असताना नांगराचा फाळ जमिनीत एका ढिगामध्ये खोलवर रुतून बसला. ज्या ठिकाणी फाळ रुतला गेला तिथून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. हा प्रवाह वाहत जाऊन नजीकच्या तळीला (गावतळे) जाऊन मिळाला व त्या तळीतील पाणी कधीही आटलेले नाही. ज्या ढिगात नांगराचा फाळ रुतला व प्रवाह सुरू झाला अगदी तिथेच शंकराची पिंडी वर आली. ती एका ढिगातून वर आल्याने ‘ढीग’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘डिग’ असा शब्द निर्माण झाला असावा व त्यामुळेच या मंदिराला ‘डिगेश्वर मंदिर’ असे संबोधले जाऊ लागले, अशी गोष्ट प्रचलित आहे.
वेळेश्वराहून अजून थोडे दक्षिणेत समुद्रालगतच कोळेश्वर हे अजून एक दापोलीचं दैवत. कोळ्यांना सापडला म्हणून कोळ्यांचा ईश्वर तो कोळेश्वर अशी त्याच्या नामाची साधीसुधी उकल आहे.
कोळेश्वर मंदिराला कोकणातल्या देवळाप्रमाणेच समुद्राची पार्श्वभूमी असल्याने देवळाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. मंदिराच्या समोरचा सभामंडप नवीन मोठा आहे आणि देवळाचे बाकीचे बांधकाम मात्र प्राचीन काळातले आहे. आसपास अनेक मंदिरे असल्याने पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर म्हणजे देवांचे संकुलच म्हणायला हवे. गाभाऱ्यातील स्वयंभू पिंडीतून सतत पाणी पाझरत असल्याचा अलौकिक चमत्कार येथे भाविकांना पाहायला मिळतो. मुख्य मंदिर तीन भागांत विस्तारले असून भोवतीची संरक्षक फरसबंदी आजही मजबूत व भक्कम आहे. मंदिरापर्यंत तर चिरेबंदी पाट आहेत. बांधणी मुस्लीम धाटणीची मानली जाते. कोळेश्वर मंदिराच्या आजूबाजूलाच श्रीलक्ष्मी, विष्णू मंदिर, श्री गणपती, मारुती, जाखाय-काळकाय ग्रामदेवता अशी देवळे असल्याने मंदिराचे गाव म्हणून कोळेश्वर परिचित आहे.
आडमार्गी प्रणालक दुर्गाच्या रस्त्यात असलेली प्राचीन पन्हाळेकाजी लेणी, दाभोळचं दुर्गादेवी मंदिर, हर्णेचं समुद्री किल्ल्यांचं आगार अशी अनेक सरस आकर्षणं दापोलीचं वैशिष्टय़ आहेच. पण त्यासोबत दापोलीला संरक्षक कवचासारखं जपणारी काही जुनीजाणती शिवालयंपण आहेत.























































