
>> रविप्रकाश कुलकर्णी
तुमचं आमचं आयुष्य चाकोरीबद्ध असतं, पण त्याला एखाद्या कलेचा स्पर्श झाला की सारं आयुष्य सुरेल होऊन जातं. असं भाग्य फारच थोडय़ा जणांना लाभतं. अशा भाग्यवंतांपैकी एक म्हणजे दत्ता पाडेकर.
या पाडेकरांचे अहोभाग्य किती असावे? त्यांच्या पंचाहत्तरीचा सोहळा जाहीरपणे झाला! कोणी म्हणेल त्यात काय, पंचाहत्तरीचे सोहळे अधून मधून होतच असतात. निसर्गकृपेने आयुष्याची दोरी बळकट असली की झाले. ते खरंच. पण चित्रकाराची जाहीरपणे पंचाहत्तरी साजरी झालेली आठवते का? दत्ता पाडेकर हे पहिले असे चित्रकार! असले सगळे सोहळे करायचे म्हटले की कुणीतरी पुढाकार घ्यायला लागतो. पाडेकरांचे भाग्य इतके थोर की प्रदीप बाळगी यासारखा संपन्न जाणता चाहता त्यांना लाभला. त्यांनी हा सगळा घाट घातला आणि यशस्वी करून दाखवला. या सोहळ्यातच त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित झाला!
या गौरव ग्रंथाच्या मुखपृष्ठावर फक्त पांढऱया पार्श्वभूमीवर षटकोनी आकाराची मुद्रा असून त्यावर अक्षर आहे दत्तात्रय आणि खाली लफ्फेदार अक्षरं ‘पाडेकर’, जी त्यांची स्वाक्षरी आहे. जणू काही एवढं असलं की, समजून जायचं, जे काही दिसेल, असेल ते उत्कृष्ट असणार याची हमी! दत्ता पाडेकर गौरव ग्रंथात याची पण प्रचीती येते. वासुदेव कामत, जीएस माजगावकर, अनिल नाईक, सतीश नाईक यासारख्या नामावंत चित्रकारांपासून दीपक घारे, मं. गो. राजाध्यक्ष अशा काही चित्र समीक्षकांनी पाडेकरांच्या चित्र विशेषांकाचे वर्णन केले आहे. तसंच श्रीकांत बोजेवार, श्रीराम सिधये, दिलीप जोशी यासारख्यांनी पाडेकरांचे व्यक्तिविशेष सांगितले आहेत. शिवाय सौ. मंगला पाडेकर, देवदत्त पाडेकर या त्यांच्या कुटुंबीयांचे पण लेख आहेत. या सगळ्यांच्या शब्द कौतुकाच्या समवेत पाडेकरांच्या सगळ्या प्रकारच्या चित्रांची पखरण आहे. त्यातून पाडेकरांच्या कला कारकिर्दीचा अंदाज यावा. या सगळ्याचा ल.सा.वी. सांगायचा तर तो त्यांना मिळालेल्या कृ.रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार मानपत्रात म्हटल्याप्रमाणे, ‘…कलाकार म्हणून आपण स्वतला अनेक पैलू पाडत बोधचित्रे, संकल्पना, दृश्य प्रतिमांकन, सुलेखन, मुद्रा चित्रण, शिल्पकला याबरोबरच पेंटिंगमधील निसर्ग चित्रे, व्यक्तिचित्रे, रचनाचित्रे अशा अनेक आव्हानपूर्ण कला प्रकारात अत्यंत दर्जेदार कलानिर्मिती सातत्याने करत राहिलात. परिणामस्वरूप सत्तरहून अधिक प्रतिष्ठिचे पुरस्कार आपणास प्राप्त झाले आहेत.
जोशपूर्ण आणि लयदार रेषेवरील हुकूमत, त्यातून निर्माण होणाऱया आकाराची समज, या आकारांच्या सुसंवादातून होणारी अनोखी चित्र रचना, जोडीला कलात्मक संयम दर्शविणारे रंगभान आणि पोतांचा अत्यंत प्रभावी वापर या सर्वातून आपली सुस्पष्ट आणि ठाशीव कला निर्मिती होते. ज्यामुळे ‘पाडेकरांची चित्रं’ अशी आपली खास ओळख पाहणाऱयांच्या मनावर कायमची कोरली जाते. या सर्व खाणाखुणा आणि त्याचा प्रत्यय हा गौरव ग्रंथ पाहताना ठसठशीतपणे जाणवतो.





























































