
>> महेश उपदेव
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या वर्धा जिल्हय़ाचे सुपुत्र असलेल्या दत्ता मेघे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करून विदर्भासह महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा पोहोचवली. राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक दशके दत्ता मेघे हे नाव लोकाभिमुख म्हणून चर्चेत राहिले. त्यांच्या निधनाने या सर्वच क्षेत्रांत पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उभे केलेले अवाढव्य काम महाराष्ट्र, विशेषतः विदर्भ कधीही विसरू शकणार नाही. वर्धा जिल्हय़ातील पवनार येथे दत्ता मेघे यांचा जन्म झाला. बालपण हलाखीच्या स्थितीत गेले. मात्र एका जिद्दीने त्यांनी त्यावर मात केली आणि बीएची पदवी प्राप्त केली. त्यानंतर काही काळ एलआयसीमध्ये डेव्हपमेंट ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. मात्र समाजसेवेची आंतरिक इच्छा असल्याने त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ समाजकारण तसेच राजकारणाला दिला. 1972 मध्ये त्यांनी युवकांचे संघटन करून राजकीय श्रीगणेशा केला. नागर युवक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तसेच दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स यासारख्या संस्था उभारून दत्ता मेघे यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा पोहोचविल्या.त्यांच्या या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना तसेच गरीब आणि वंचितांना मोठय़ा प्रमाणावर शैक्षणिक लाभ झाला. अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालये आणि इस्पितळे उभारून समाजाचे ऋण फेडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करीत असतानाच राजकारणातही त्यांनी जम बसवला. आधी युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी नागपुरात काम केले. नंतर काँग्रेस, पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप या पक्षांमध्ये त्यांनी काम केले. विधानसभेचे आमदार, तर चार वेळा लोकसभेचे खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. तीन मतदारसंघांमधून खासदार निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते होते. त्याशिवाय राज्यसभा सदस्य आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. ग्रामपंचायतीची निवडणूक न लढवलेले दत्ता मेघे हे शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात थेट मंत्रीही झाले. नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शरद पवार यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात एवढय़ा मोठय़ा टप्प्यावर पोहोचूनही दत्ता मेघे यांनी कायम सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेवला. त्यांनी विविध शैक्षणिक संस्था उभारल्या; मात्र त्यांचा उपयोग सामान्य माणसांसाठी होईल याकडे त्यांचा कटाक्ष राहिला. त्यामुळे विदर्भातील अनेक तरुणांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यांची प्रतिमा इतरांसारखी केवळ शिक्षण महर्षी अशी नव्हती. कारण लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थांमधून शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्या जीवनाला नवा आयाम दिला. दातृत्व हा दत्ता मेघे यांचा राजकीय वर्तुळात दिसणारा दुर्मिळ पैलू होता. दानशूर व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यामुळेच विदर्भातील अनेक गरजूंना वेळोवेळी त्यांची सर्वतोपरी मदत झाली. दत्ता मेघे यांच्या वैद्यकीय संस्थांमध्येही अनेक गरीबांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध असे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या संस्थांमार्फत अनेक उपक्रम राबविले गेले. त्याचा मोठा आधार हजारो ज्येष्ठ नागरिकांना मिळाला. त्यामुळे तब्बल पाच दशकांपेक्षा अधिक काळ राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून कर्तृत्वाची मोहोर उमटविणारे दत्ता मेघे यांची प्रतिमा लोकनेता आणि आदर्श राजकारणी अशीच राहिली. राजकीय क्षेत्रात सक्रिय असूनही अजातशत्रू म्हणून दत्ताभाऊंकडे पाहिले गेले. विदर्भातील विकासाच्या राजकारणात त्यांनी कधीही पक्षीय भेद आणला नाही. सर्वच राजकीय पक्ष तसेच सामाजिक क्षेत्रातील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले. दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने पाठविले नाही. मग ती गरज शैक्षणिक असेल अथवा वैद्यकीय उपचारांची. त्यांनी आयुष्यभर गरीबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळे अनेकांसाठी दत्ताभाऊ म्हणजे ‘दाताभाऊ’ असेच राहिले. दत्ता मेघे यांचा स्वभाव साधा आणि सरळ होता. त्यांची कार्यपद्धती पारदर्शक आणि लोकाभिमुख होती. नागरी समस्या समजून घेत त्यावर तत्काळ उपाययोजना करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे सामान्यांपासून मान्यवरांपर्यंत सर्वांशी त्यांची नाळ जुळलेली होती. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंतच्या आदिवासी भागात त्यांनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून सेवाकार्य केले. त्यांच्या निधनाने विदर्भच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.




























































