
>> प्रज्ञा कुलकर्णी
श्री दत्तात्रेय हे दत्त संप्रदायाचे मूळ प्रवर्तक आहेत. गुरुस्वरूपात पुजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच ‘‘श्री गुरुदेव दत्त’’ असा दत्तात्रेयांचा जयघोष केला जातो. दत्तात्रेय हे योगी आहेत. गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरूप आणि योगसाधनेचे उपास्यदैवत आहेत. शैव, वैष्णव आणि शाक्त या तिन्ही संप्रदायांत दत्तात्रेयांची उपासना श्रद्धेने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. श्री विष्णूंचा अंश असलेली दत्तदेवता ही शाश्वत देवता आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून दत्ताने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला आहे. सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या या देवता मानल्या जातात.
दत्तात्रेयांनी आपले पिता अत्री ऋषी यांच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून योगसिद्धी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केले. दत्तात्रेयांची तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचा समन्वय दाखविणारी आहे. या त्रिदेवांचे प्रत्येकी दोनप्रमाणे सहा हात आहेत. ब्रह्माच्या हातातील जपमाला व कमंडलू हे सत्त्वाचे, तपस्याचे प्रतीक आहे. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रज तत्त्वाची प्रतीके आहेत. तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तम तत्त्वाचे म्हणजेच संहाराचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांचा वेश हा मस्तकावर जटाभार, पायात खडावा, अंगाला विभूती लावलेला, काखेत झोळी लटकविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती म्हणजे दत्तात्रेय अवधूत दिगंबर असल्याचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांच्या मागे उभी असलेली कामधेनू हे पृथ्वीचे, तर त्यांच्या आजूबाजूला असलेले चार श्वान हे वेदांचे प्रतीक आहेत. दत्तात्रेयांचे वर्णन करताना संत तुकाराम महाराज म्हणतात,
तीन शिरे सहा हात । तया माझे दंडवत
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान
माथा शोभे जटाभार । अंगी विभूती सुंदर
शंखचक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार
दत्त म्हणजे देणे. ज्यांनी आपल्या परमभक्तांना सर्वकाही दिले आहे. दत्तात्रेयांचे दुसरे नाव अवधूत आहे. अवधूत म्हणजे सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकणारा आणि भक्तांना निर्गुणची अनुभूती देणारा. दत्तात्रेय ही सर्वव्यापी सर्वत्र संचारी, स्मर्तृगामी, युगानुयुगे, शतकानुशतके अखिल मानवजातीचा उद्धार करणारी आणि परमभक्तांना वरदान देऊन दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी जागृत देवता आहे. दत्तात्रेयांची उपासना गुरूस्वरूपात केली जाते म्हणून ते गुरुदेव आहेत. परमार्थ मार्गात गुरूसंस्थेला अतिशय महत्त्व आहे. दत्तात्रेय हे परमगुरू असल्यामुळे सर्व संप्रदायांत ते श्रेष्ठ मानले जातात. दत्तसंप्रदाय हा सर्वांत महान संप्रदाय मानला जातो. योगशास्त्र, मंत्रशास्त्र आणि उपासना शास्त्र यांचे संवर्धन करण्याचे महान कार्य श्रेष्ठ दत्तसंप्रदायाने केले आहे. उपनिषदकारांनी प्रभू दत्तात्रेयांना ‘विश्वगुरू’ म्हणून गौरविले आहे. दत्तसंप्रदाय हा प्राचीन आणि सर्वसमावेशक संप्रदाय आहे. नाथसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय अशा इतर संप्रदायांनीही श्री दत्तात्रेय यांना गुरू मानून त्यांची भक्ती, उपासना करून दत्त संप्रदायाला सर्वोच्च स्थान प्रदान केले आहे.




























































