दत्तगुरू दिसले!

परवा दत्तजयंती. दत्तगुरू म्हणजे ज्ञानीयांचेही गुरू. पण ते स्वतःही गुरूकृपा मानतात. दत्तगुरूंच्या गुरूंविषयी…

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त! ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची अनन्यसाधारण एकरूपतेचे प्रतीक. भगवंताला आई नाही. त्याला जेव्हा स्वतःचे लाड करवून घ्यावेसे वाटते, तेव्हा तो अवतार घेतो. राम आणि कृष्ण ही सर्वश्रेष्ठ उदाहरणे. ‘जगद्उद्धारार्थ परमेश्वर। अत्रींच्या घरी धरी अवतार।’ तो हा दत्तराज एक कधीही समाप्ती न होणारा अवतार. दत्तप्रभू म्हणजे गुरूंचे गुरू महागुरू! त्यांचे गुरू कोण? हा प्रश्न यदूराजाने विचारला. त्याचे उत्तर विस्ताराने दिले असून हा केवळ सारांश आहे.

महर्षी अत्री आणि महासत्ती अनसूया यांचा मानसपुत्र म्हणजे दत्तात्रेय! या यादवकुळाचा मूळपुरुष यदूराजा याने आपल्या असामान्य भक्तीने दत्तराजाला प्रसन्न करून घेतल्यावर अध्यात्मज्ञान प्राप्तीसाठी राजाने विचारले, “आपले गुरू कोण?’’

“हे तत्त्वज्ञान जाण! म्या चौवीस गुरूंपासून। यत्ने केले संपादन। ते सांगेन तुज आता।।’’

(दत्तमहात्म्य/1.76) असा प्रश्न पडण्याचे एक कारण असेही होते की, स्वतःचा संसार नसून दत्तगुरू मोठे हसरे, प्रसन्न आणि आनंदी दिसत होते. याउलट यदूराजा असून अस्वस्थ, चिंतित आणि सतत दुःखी होता. त्याला वाटत होते, संसारी माणूस सुखी असायला हवा. ज्याला घरदार नाही, मालमत्ता नाही, तो भटक्या संन्यासी सुखी दिसतो कसा?

दत्तप्रभूंनी जे उत्तर दिले, त्याचे सार असे, “हे यदूराजा माझे गुरू असंख्य असून मुख्य चोवीस गुरू आहेत – 1) पृथ्वी, 2) पवन, 3) आकाश, 4) पाणी, 5) अग्नी, 6) चंद्र, 7) सूर्य, 8) कबुतर, 9) अजगर, 10) समुद्र, 11) पतंग, 12) भ्रमर, 13) हत्ती, 14) मधुसंचयक 15) मृग, 16) मासा, 17) वेश्या, 18) टिटवी, 19) बालक, 20) कंकण, 21) सर्प, 22) शरकार, 23) पेशस्कार 24) कोळी.

अमृतप्राय गोड बोलता। सर्व वळती तत्त्वता। उदकाला गुरू करिता । ये हाता हा गुण।। (एकनाथी भागवत)

पाण्याची मृदुता मनात बिंबली की, बोलण्यात गोडवा येतो. भक्ताने मधुर बोलावे, असे दत्तप्रभू सांगतात. अग्निदेवता सगळे ‘स्वाहा’ करते. कर्म देहाचे मूळ। ते ज्ञाने जाळी समूळ।। असे नाथ म्हणतात, अर्थात सोडावे देहाचे ममत्व। चंद्राचा कोणता गुण घेतला? देहरूपाने जरी आत्मा विकारमान वाटला तरी तो तसा नसतो. ‘अलिप्तता’ हा चंद्राचा गुण आता सूर्याचे काय? पाण्यात सूर्यबिंब पडते. पाण्यावर तरंग उठतात ते बिंब हलते का? नाही. सूर्य पाण्याची वाफ करतो. पावसाळ्यात त्या वाफेचे पाणी टाकतो. चराचराला तृप्त करतो. स्वतःसाठी काही ठेवत नाही. योग्याने निरंकार राहून परोपकार करावा. याउलट कबुतराचे वागणे असते. पतिपत्नी देहभान विसरतात. विषयविकारातच जगतात. ईश्वरास विसरल्यावर असेच घडते. म्हणून सर्वसंग परित्याग करण्यापेक्षा चिरंतन आनंद, कशातही मन न गुंतण्यात आले.

अजगराचा गुण म्हणजे तो विषयवासनेत गुंतत नाही. समाधानी वृत्ती हे त्याचे वैशिष्टय़. धरूनी पडावे न निजता। स्वरूपी दृष्टी लावूनी।। (दत्तमहात्म्य) तर समुद्राचा गुण आहे अनुकूल वा प्रतिकूल काळात शांत व गंभीर राहावे. सदा पूर्ण समुद्रापरी। प्रसन्नता दावादी बाहेरी।। नंतरचा गुरू आहे पतंग। नाथमहाराज म्हणतात, दीपाचिया अंगसंगा। कोण सुख आहे पतंगा। बळे आलिंगू जाता पै गा। मरण मार्गा लागले।। विषयवासनेच्या आहारी जाऊन दुर्लभ मनुष्यजन्म वाया घालवू नये. मायामोह टाळून सार्थक करावे.

सर्व शास्त्रांमधील केवळ सार म्हणजे आत्मज्ञान घ्यावे, गुण भ्रमराचा आहे. फूल कुठलेही असो. मध घ्यावे उडून जावे. ज्ञानी असो, अज्ञानी असो, सर्वांत भगवद्भाव पहावा.

परमार्थात एकच गुरू असतो, जो आत्मज्ञान देतो. विद्येचा उपदेश करतो, मग इतके गुरू कशाला?  हे काय गुरू आहेत? तेव्हा गुरुदेव उत्तरले, राजा, पृथ्वी ही वृक्ष, पर्वतांची असून ती आईप्रमाणे प्रेम करते. म्हणजे नम्रता, परोपकार आणि सहनशीलता या गुणांचा मी स्वीकार केलाय म्हणून धरणीमाता ही मला गुरुस्थानी आहे. वायूबाबत सांगायचे तर क्षमेला विरक्तीची जोड दिल्याने काय घडते? अन्न सेवनाच्या बाबतीत नखरे न करता जे मिळेल ते गोड मानून घ्यावे. शरीरातील वायू म्हणजे प्राण! हे हवे, ते नको असे प्राण म्हणत नाही. ही अनासक्ती महत्त्वाची. बाह्य वायू गंध वाहून नेतो. सुगंध आणि दुर्गंध त्याला सारखेच वाटतात. योग्याने असेच सुखदुःखाच्या बाबतीत निर्लेप असावे. विषमी असून समत्व। संगी असूनी असंगत्व।। हा गुण दत्तराजाने आकाशाकडून घेतला. जे बाहेर ते मडक्यात असते. मातीचे मडके फुटले, तरी आकाश तेच राहते. आत्मा आकाशासारखा असतो. तो देहात असतो, चराचरातही वास करतो.

श्रीपाद वल्लभांची बारा अभयवचने

 • माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो.
 • मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यांत तेल घालून संभाळ करतो.
 • श्री पिठीकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्याह्न काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.
 • सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
 • (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
 • मी श्रीपाद श्री वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
 • तुमचे अंतःकरण शुध्द असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
 • तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सदगुरुंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
 • तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते. माझा अनुग्रह वा आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सदगुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.
 • श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.
 • श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिध्दपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
 • तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.
आपली प्रतिक्रिया द्या