
>> चैताली कानिटकर
नतीन या रमणीय गावापासून सुरू होणारा हा दयारा बुग्याल ट्रेक. हिमालयाच्या कुशीतल्या ग्रामीण संस्कृतीची, तिथल्या निसर्गसौंदर्याची झलक दर्शवणारा हा ट्रेक.
हमता पास आणि सार पास ट्रेक केल्यानंतर यावेळेस सोपा ट्रेक करायचं ठरवलं आणि दयारा बुग्याल या अनोख्या ट्रेकची निवड केली.स्थानिक भाषेत दयारा म्हणजे ‘जमिनीचा गोलाकार भाग’ आणि बुग्याल म्हणजे उंचावरील गवताळ प्रदेश किंवा प्राण्यांचे चरण्याचे कुरण. नवशिक्यांसाठी उत्तम आहे यात शंकाच नाही. दिवस आणि वेळ वाचावा म्हणून मुंबईहून डायरेक्ट डेहराडूनला फ्लाईटने गेलो. त्या दिवशी डेहराडून फिरून दुसऱया दिवशी 10-12 तासांचा बस प्रवास करत थेट पोहोचलो बेस कॅम्प व्हिलेजला नतीनला!
भारतातील उत्तराखंडच्या चित्तथरारक लँडस्केपमध्ये वसलेले,मनमोहक दयारा बुग्याल हे उंचावरील कुरण आहे. या कुरणाचं नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमींसाठी अगदी योग्य तर हिवाळ्यात बर्फाळ प्रदेशातल्या साहसी ट्रेकसाठी आकर्षित करणारं ठिकाण. उत्तरकाशीहून सहज पोहोचता येणाऱया बारसू अथवा नतीन या रमणीय गावापासून सुरू होणारा हा ट्रेक सुमारे 7,400 फूट उंचीवरून आपले चमत्कार उलगडतो आणि हळूहळू समुद्रसपाटीपासून सुमारे 12,100 फूट उंचीवर असलेल्या दयारा बुग्यालच्या भव्य उंचीवर घेऊन जातो.
सुरुवात केली नतीन गावातून. शब्दही फिके पडतील इतकं सुंदर गाव. गावातले लोकही प्रेमळ. प्रत्येकाच्या घराला कुंपण आहे ते सफरचंदाच्या झाडांचं. आणि जवळपास प्रत्येक कुटुंबाने पाळले आहेत लाख – दीड लाखाचे खेचर! कारण वाहतुकीची सोय गावात फारच अत्यल्प आहे. हे सगळं गाव आम्ही मनसोक्त फिरलो तेही समोर दिसणारे बर्फाच्छादित पर्वत पाहत. दुसऱयाच दिवशी सुरू होणार होता आमचा ट्रेक.
हा ट्रेक वर्तुळाकार आहे. म्हणजे गोल फिरून आपण सुरुवातीच्या नतीन व्हिलेजमध्येच येतो. चार रात्री, पाच दिवसांच्या या ट्रेकचे एकूण अंतर 24 किमी आहे आणि आपण समीटला 12000 फूट उंचीवर पोहोचतो. डेहराडून-नतीन-गुई-चीलापाडा-दयारा टॉप-नायता – नतीन असा ट्रेक आहे. यावेळेस सुद्धा ‘ट्रेक द हिमालयाज्’ याच कंपनीसोबत आम्ही गेलो आणि ट्रेक लिडर होते दीपक! अत्यंत नम्र, हुशार, धाडसी अशा या ट्रेक लिडरने बऱयाच गोष्टी ट्रेकिंगदरम्यान शिकवल्या. हा ट्रेक विंटर किंवा समर कधीही करा, फार सुंदर आहे.
नतीनपासून गुईचा ट्रेक पूर्ण जंगलातून जातो. विविध पक्षी, मोठमोठे वृक्ष, थंडगार वारा आपल्याला अनुभवता येतो. वाटेत एका ठिकाणाहून काला नाग, बंदरपूछ, श्रीखंड महादेव, द्रौपदी का दांडा आणि गंगोत्री या मनमोहक शिखरांचे दृश्यही आम्ही पाहिले आणि चार तासांनंतर पोहोचलो कॅम्प साईट गुईला. मस्तपैकी एकमेकांच्या मदतीनं तंबू उभारले आणि मग थंड वातावरणात गरमागरम जेवणाचा आनंद घेतला. यावेळेस ट्रेकला गेल्यावरही चक्क मोबाईलला नेटवर्क मिळत असल्याने आनंद द्विगुणित झाला. दुपारीच आम्ही गुईला पोहचलो आणि मग छानपैकी आराम करून संध्याकाळी वॉकला गेलो. ट्रेक लिडरने तेथील जंगलं, झाडं याची फार छान माहिती दिली. मग काय रात्रीच्या जेवणावर ताव मारून सज्ज झालो पुढील दिवसासाठी.
दुसऱया दिवशी हिमालयीन फुलंझाडं निळी खसखस, डेझी आणि प्रिमरोझ यांचं दर्शन घडलं. कुरणाच्या सभोवतालचे ओक आणि रोडोडेंड्रॉनच्या जंगलामुळे हे दृश्य अधिकच नयनरम्य दिसत होतं. एका बाजूला भव्य बर्फाच्छादित पर्वत आणि त्याच्यासमोर ही रंगांची उधळण असं ते दृश्य होतं. हा ट्रेकिंग मार्ग विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यात उत्तराखंडचा राज्य पक्षी हिमालयीन मोनलचाही समावेश आहे. हे सर्व पाहत आम्ही थंडगार चिलापाडा कॅम्प साईटवर पोहोचलो. त्या दिवशी ट्रेक लिडरने चक्क थोडं पुढे चालत नेऊन संध्याकाळी बर्फात मजेशीर खेळ घेतले. परत येताना चमकदार तलाव आणि वाहते ओढे पाहून मन भरून आलं.
ती रात्र अविस्मरणीय ठरली. रात्री निसर्गाच्या हाकेला ओ द्यायला मी आणि माझी टेन्ट पार्टनर बाहेर ऊठून आलो तर चक्क हिमालयीन हरणाने दर्शन दिलं आणि आम्ही बाहेर दिसतात टुणकन् अल्पाइन जंगलात पळून गेलं. ही आठवण आजही मनात तशीच आहे. पुढचा दिवस थोडा कठीण होता, कारण आम्ही समीट करणार होतो. ट्रेक लिडरने गीटर्स वगैरे दिले होतेच. जसे जसे समीट जवळ येऊ लागले बर्फाची चादर दिसू लागली. मग काय भन्नाट फोटोसेशन झालं. समीट गाठलं. हातात भारताचा ध्वज घेऊन फोटो काढून तेथून दिसणारे सर्व पर्वत पाहून परतीच्या प्रवासास लागलो. येताना एक आइसस्लाईड केली आणि नतीनकडे परतलो. परतल्यावर छानपैकी प्रशस्तीपत्रक देण्यात आली. दुसऱया दिवशी आम्ही बसने डेहराडूनला परतलो व नंतर मुंबई गाठली.
ट्रेकमध्ये हिमालयीन गावाच्या अद्वितीय संस्कृतीची झलक खूप जवळून अनुभवता आली. पायवाटेवरच्या असंख्य रोडोडेंड्रॉनच्या फुलांना अंतरंगात साठवून हा ट्रेक सुफळ संपूर्ण झाला.






























































