लेख  – ‘दिन’ किंवा ‘डे’ औपचारिक बनले आहेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप देशपांडे

अनेक दिन आणि डे आपल्या देशात आपण साजरे करतो. तो दिवस एक उपचार म्हणून साजरा केला जातो ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. थोडक्यात त्यात औपचारिकता आली आहे. त्या दिवशी त्या दिवसाचे महत्त्व विषद करून गुणगान गायचे. खूप फोटो काढायचे, प्रसिद्धी, मिळवायची. मग वर्षभरासाठी त्या विचारांचे गाठोडे बांधून ठेवायचे. ते परत वर्षभरानेच सोडायचे ही मोठी शोकांतिका आहे. असेच वर्षानुवर्षे सुरू आहे. असा एक दिवस साजरा करून काही होणार नाही. कुठेतरी शासकीय आणि सामाजिक पातळीवर विचार करण्याची वेळ आली आहे असे वाटत नाही का?

आपण सर्वच मंडळी खूपच उत्सवप्रिय आहोत. अनेक उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करीत असतो. मग त्यात अनेक महापुरुषांचे जन्मतिथी दिवस, पुण्यतिथी दिवस असतात. एकूणच विचार केला तर वर्षभरात आपण असे अनेक दिन-दिवस आणि डे साजरे करत असतो.बर्‍याच वेळी आपण हा दिवस का साजरा करतो, त्यामागची भूमिका काय आहे, त्या दिवसाचं महत्त्व काय आहे या गोष्टीही बर्‍याच जणांना, आजच्या तरुण पिढीला, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहीत नसतात. आपण साजरे करीत असलेल्या दिन-दिवस आणि डेची यादी बघितली तर खूपच मोठी होईल.

पत्रकार दिन, मातृभाषा दिवस, मराठी भाषा दिवस, जागतिक महिला दिन, जागतिक ग्राहक दिन, राष्ट्रीय ग्राहक दिन, जागतिक वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, स्वच्छता दिवस, जागतिक आरोग्य दिन, नववर्ष दिन, वाचक दिन, जागतिक पुस्तक दिन, शिक्षक दिन, पालक दिन, पालक-शिक्षक दिन, कुटुंब दिन, मातृदिन, पितृदिन, जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र दिन, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन, राष्ट्रीय कन्या दिन, व्हॅलेंटाईन डे, जागतिक रंगभूमी दिन, राष्ट्रीय बालक दिन, हुतात्मा दिन, किसान दिन, फ्रेन्डशिप डे, रोज डे असे बरेच आहेत. महापुरुषांचे जन्म-पुण्यतिथी दिवसांत स्वा. वीर सावरकर, म.गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आदींचे जन्म, पुण्यतिथी दिवस आपण साजरे करीत असतो.

महापुरुषांचे जन्मदिन-पुण्यतिथी दिन साजरे करण्यामागे त्यांचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या पवित्र स्मृती जागवून, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल व्हावी, त्यांच्या साहित्य, विचारांची उजळणी व्हावी हाच हेतू असतो. ते स्फूर्तिदायक, प्रेरणादायी असते, पण आपण फक्त मिरवणुका काढूनच जास्त उत्सव साजरे करतो, त्यातच समाधान मानतो. नाही म्हणायला काही ठराविक ठिकाणी चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. तो भाग अल्प आहे. काही महत्त्वाचे दिन-दिवस आणि डेमध्ये स्वातंत्र्य दिन-15 आँगस्ट 1947 रोजी हिंदुस्थानला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. हा एक विशेष राष्ट्रीय सण आहे. या दिवशी राष्ट्रध्वज फडकवला जातो. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो.

26 जाने. 1950ला आपली लोकशाही राज्यघटना अस्तित्वात आली. प्रजेची सत्ता अर्थातच लोकशाही अस्तित्वात आली. म्हणूनच तो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी मराठीतले पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरू केले. तोच त्यांचा जन्मदिन ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो.

15 मार्च जागतिक ग्राहक दिन आणि 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांचे हक्क, कर्तव्य, जबाबदारी काय आहे याची माहिती व्हावी, बाजारपेठेत त्याची फसवणूक होऊ नये यामागील हेतू आहे. ग्राहक जागृती हा महत्त्वाचा भाग आहे. उद्देश आहे. शासकीय पातळीवर दोन्ही दिवस साजरे होतात, पण त्यात औपचारिकता असते. फारच कमी ठिकाणी हे दिवस व्यवस्थित साजरे होतात. शासकीय पातळीवर प्रसार आणि प्रचाराचा अभाव असल्यामुळे ग्राहक तसेच अधिकारी यांची उपस्थितीचा अभाव असतो. तो दिवस सरकारी पातळीवर साजरा करून मोकळे व्हायचे, बस्स! केवळ फोटो आणि वृत्त छापून येते इतकेच. साध्य काही होत नाही.

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तो दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण केले जाते. कामगारांचे होणारे शोषण थांबावे, न्याय मिळावा म्हणून कामगार एकत्रित आले, आंदोलन उभे राहिले आणि 1मे 1891 पासून कामगार दिन पाळला जाऊ लागला. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. 5 जून पर्यावरण दिन, 22एप्रिल वसुंधरा दिवस साजरे करत असतो. पर्यावरणाचा ऱहास थांबविणे, वृक्षारोपण करणे, जंगलतोड थांबविणे, प्रदूषण कमी करणे यासाठी उपक्रम राबविले जातात. वृक्षारोपण करतानाचे फोटो वर्तमानपत्रांत भरभरून बघायला मिळतात. त्यानंतर वर्षभरात अनेक शहरांत सुशोभीकरणासाठी, रस्तेरुंदीकरणासाठी शंभर-दीडशे वर्षे वयाची डेरेदार वृक्षांची कत्तल होते, शे-दोनशे वृक्ष एका महिन्यात कापले जातात ही सत्यता आहे. असा विरोधाभास बघायला मिळतो. त्यामळेच पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस दिवस अनियमित होत आहे. हाच आहे निसर्गाचा कोप. 31 मे तंबाखू विरोधी दिन, 7 एप्रिल आरोग्य दिन, 2 ऑक्टोबर स्वच्छता दिवस हे सर्व आरोग्याशी संबंधित आहेत. 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात केली. आज अनेक कायदे करूनही तंबाखू, गुटखा आणि स्वच्छता अभियानाची काय स्थिती आहे आपण बघतो. अर्थातच याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत.

जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअरचा जन्म-मृत्यू दिन 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा होतो. वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी अनेक साहित्यिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जातात. कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकरांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील मराठी माणूस हा दिवस साजरा करतो. महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढय़ाच्या स्मरणार्थ 8 मार्च महिला दिन साजरा केला जातो. वर्षात सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान केला जातो. त्यानंतर वर्षभरात किती प्रकारे महिलांवर अत्याचार होतात हे आपण वाचतोच. केवळ एक दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करून भागणार नाही.

14 नोव्हेंबर व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. कोण होता व्हॅलेंटाईन हेसुद्धा अनेकांना माहीत नसते. रोममधील संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ हा दिवस आहे. आपल्याकडे प्रेमप्रकटीकरण दिवस मानून साजरा करता. हाच दिवस वीर शहीद भगतसिंह यांचा स्मृतिदिन मात्र कोणाला लक्षात राहत नाही. तसेच 31डिसेंबरच्या धुंदीतच 1 जानेवारी नववर्षदिनाचे स्वागत करून शुभेच्छा देतो, पण आपल्या संस्कृतीत गुढीपाडवा ही नववर्षाची सुरुवात आहे हेच आपण विसरत आहोत ही आपल्या सर्वांसाठीच कमीपणा आणणारी गोष्ट आहे.

अशा प्रकारे इतरही अनेक दिन आणि डे आपल्या देशात आपण साजरे करतो. तो दिवस एक उपचार म्हणून साजरा केला जातो ही सत्य परिस्थिती नाकारून चालणार नाही. थोडक्यात त्यात औपचारिकता आली आहे. त्या दिवशी त्या दिवसाचे महत्त्व विषद करून गुणगान गायचे. फोटो काढायचे, प्रसिद्धी, मिळवायची. मग वर्षभरासाठी त्या विचारांचे गाठोडे बांधून ठेवायचे. असेच वर्षानुवर्षे सुरू आहे.

[email protected]