दिल्लीचे ‘डेथ चेंबर’; राजकारणाचे ‘प्रदूषण’

869

>> नीलेश कुलकर्णी   

 ‘‘दिल्ली में हवा बहोत खराब चल रही है…’ हे वाक्य आज जवळपास प्रत्येक दिल्लीकराच्या तोंडी आहे. दिल्लीतील प्रदूषण हा ज्वलंत प्रश्न बनला आहे. आधीच देशाची ही राजधानीगॅस चेंबरबनली होती. आता तिचे रूपांतरडेथ चेंबरमध्ये झाले आहे. न्यायालयाने राजधानीतआरोग्य आणीबाणीजाहीर केली आहे. मात्र भाजप आणि आप हे दोन्ही पक्ष याप्रदूषित हवेवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला कारण आहे आगामी विधानसभा निवडणूक. त्यामुळेच प्रदूषणाच्या नथीतून राजकीय तीर मारण्याचा दोन्ही पक्ष प्रयत्न करीत आहेत, पण त्यामुळे राजकारणातले प्रदूषण वाढत आहे याची पर्वा कोणी करायला तयार नाही.

यंदा राजधानी दिल्लीतील प्रदूषण कैकपटीने वाढले आहे. दिल्लीकरांच्या फटाके उडवण्यावर यंदाच्या दिवाळीत ‘प्रदूषणाची टाच’ आणली गेल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले. मात्र त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाच्या पातळीत फार काही फरक पडला असे झालेले नाही. दरवर्षी या काळात दिल्ली अशीही ‘गॅस चेंबर’ होत असते. याला कारण आसपासच्या राज्यांमध्ये जाळले जाणारे तांदळाचे तण. आताही त्याची भर पडल्याने दिल्लीचे रूपांतर ‘डेथ चेंबर’मध्ये झाले आहे.

पंजाब-हरयाणातील तांदळाचे पीक निघाल्यानंतर जे तण जाळले गेले त्याच्या धुराडय़ांनी दिल्ली या काळात नेहमी काळवंडली जाते.  दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांत मोठय़ा प्रमाणावर तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन होते. त्यामुळे तसेच कारखान्यांच्या प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. पंजाब-हरयाणाशिवाय आजूबाजूची इतरही चार-पाच राज्ये त्यासाठी तितकीच कारणीभूत आहेत. मात्र, या राज्यांतील राज्यकर्त्यांना एकत्र बसवून मार्ग काढण्याऐवजी नेहमीप्रमाणे राजकारण पेटवले जात आहे. गौतम गंभीर नावाचे क्रिकेटपटू सध्या भाजपचे खासदार आहेत. आडनाव ‘गंभीर’ असले तरी ते कधीच गंभीरपणे बोलत नाहीत. ‘दिल्लीचे प्रदूषण केवळ केजरीवालांमुळेच वाढले’ असा आरोप या महाशयांनी केला. हे कमी म्हणून की काय, केजरीवालांकडची नौटंकी उसनी घेत भाजपच्या विजय गोयलांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या निषेधार्थ मास्क लावून एक दिवसाचे उपोषण केले. भाजपचे दिल्लीचे प्रमुख मनोज तिवारी यांनीही अशीच नाटकं केली. त्यामुळे भाजपवाले आपले नौटंकीचे पेटंट हिरावून घेतील की काय, या भीतीने मुख्यमंत्री केजरीवालही हळूच बाहेर आले. महिलावर्गाला मोफत बस प्रवासाचे दिवाळी गिफ्ट निवडणुकीपूर्वी देऊन केजरीवाल यांनी फील गुड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात आता प्रदूषण म्हणून लहान मुलांना मास्क देताना त्यांनी ‘कॅप्टन अंकल (पंजाबचे मुख्यमंत्री) और खट्टर अंकल (हरयाणाचे मुख्यमंत्री) इन दोनों को आप पत्र लिखकर दिल्ली को प्रदूषित न करने की रिक्वेस्ट करे’ असे जाहीर आवाहन केले आणि प्रदूषणाचे घोंगडे पंजाब व हरयाणाच्या गळ्यात मारले. दिल्लीतील निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही वास्तविक प्रदूषणापेक्षा राजकीय प्रदूषणाची पातळी वाढतच जाईल. हवामान बदलानंतर दिल्लीतले प्रदूषण काही प्रमाणात कमी होईलही, पण राजकीय प्रदूषणाचे काय? ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची पाळी सध्या दिल्लीकरांवर आली आहे!   

खगेन मुर्मूंची ऑनलाइन फसवणूक

‘मेरा देश बदल रहा है..’ हे गाणे आपल्या कानावर अनेकदा पडते. ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट इंडिया’, ‘न्यू इंडिया’च्या मार्‍याने तर आपण नेमके कोणत्या ‘इंडिया’त राहत आहोत? असा प्रश्न सामान्य माणसाला पडावा अशी स्थिती सामान्य माणसाची बनली आहे. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘डिजिटल इंडिया’चा ढोल मोठमोठय़ाने वाजवला गेला. पण हा ढोल फुटका आहे आणि त्यात पाणी शिरले आहे याची जाणीव करून देणारी घटना नुकतीच बंगालमध्ये घडली. ऑनलाइन फसवणुकीचा अनुभव देशातील सामान्य माणूस दर दिवशीच घेत असतो. मात्र, मामला एका खासदार महोदयांचा आहे. पश्चिम बंगालमधील मालदा येथील भाजपचे खासदार खगेन मुर्मू यांनी एक चांगला मोबाईल फोन ऑनलाइन बुक केला. या स्मार्टफोनचे पार्सल मुर्मू यांच्या पत्नीने स्वीकारल्यानंतर मूर्मंचेही डोळे पांढरे व्हायची वेळ आली. या पार्सलमध्ये चक्क दगडाचे दोन तुकडे व्यवस्थित पॅकिंग करून पाठविण्यात आले होते. खासदाराचीच ‘ऑनलाइन स्मार्ट फसवणूक’ झाल्याने प. बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खासदारांनी इंग्लिश बाजार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार वगैरे केली आहे तसेच केंद्रीय उपभोक्ता मंत्रालयाकडेही ते दाद मागणार आहेत. ते सगळे ठीकच आहे, पण देशातील खासदारांचे ऑनलाइन व्यवहार सुरक्षित नसतील तर सामान्य माणसांचे काय? याचा विचार डिजिटल इंडियाचे ढोल वाजविणार्‍यांनी आता करायलाच हवा. ‘भाजपचे खासदार असल्यामुळे खगेन मुर्मू यांचे पार्सल बदलून ममतादीदींनीच त्यात दगड घातले’ असा आरोप आता होऊ नये म्हणजे झाले!

डाव्यांचेनीतिमत्तेचे टायरफुटले..!

दुसर्‍याला फुकटचा उपदेश करण्यात आणि नाकाने कांदे सोलण्यात डाव्या पक्षांचा कोणी हात धरू शकणार नाही. प्रामाणिकपणा आणि नीतिमत्तेचा रोखठोक ठेका फक्त आपल्याकडेच आहे अशा आविर्भावात ते वावरत असतात. जुन्या पिढीतले काही डावे नेते नक्कीच निःस्पृह आहेत. मात्र केरळचे ऊर्जामंत्री के. के. मणी यांच्या ‘टायर प्रकरणा’ने डाव्यांच्या नीतिमत्तेचे ढोंग उघडे पडले आहे. मणी महाशय वापरत असलेल्या महागडय़ा गाडीचे (ही महागडी गाडी डाव्यांना कशी चालते? हाही प्रश्नच आहे) टायर गेल्या तीस महिन्यांत 34 वेळा बदलल्याचे उघड झाल्यानंतर केरळमधील राजकारण तापले आहे. तिथले मुख्यमंत्री विजयन यांनी दोन वर्षांत केवळ अकरा टायर बदललेले असताना मणी यांनी आपल्या बॉसला चांगलेच पिछाडीवर टाकले. जवळपास महिन्याला मणी यांनी टायर बदलल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देताना सरकारची आणि या ‘टायर’फेम मणी महाशयांची फेफे होते आहे. जवळपास महिन्याला टायर बदलून मणी यांनी नेमके काय साध्य केले? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यावर मणी यांनी दिलेले स्पष्टीकरणही मनोरंजक आहे. मंत्रीमहोदय फिरतात पुष्कळ. त्यामुळे हे टायर बदलण्यात आले. शिवाय टायर बदलण्यामागे मंत्र्यांचा कोणताही हात नसून परिवहन विभागानेच ते बदलून दिले आहेत. मणी 1 लाख 24 हजार किमी फिरले आहेत. अशी गमतीदार कारणे मणी यांच्या वतीने देण्यात आली असली तरी मुख्यमंत्री विजयन यांच्यापेक्षा आपण अधिक ‘कार्यक्षम’ आहोत हे तर या मणींना टायरच्या माध्यातून दाखवून द्यायचे नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारणे काहीही असोत, नैतिकतेचा टेंभा मिरवणार्‍या डाव्यांच्या ‘नैतिकतेचे टायर’ केरळातच फुटले हेच खरे!  

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या