
>> डॉ. शेखर दीक्षित
दातांची स्वच्छता. आपल्या शारीरिक स्वच्छतेतील सगळ्यात महत्त्वाचा भाग. पाहूया दातांची सुरक्षा आणि काळजी कशी घ्यावी…
आपले दात सुंदर आणि चमकदार दिसावेत असं प्रत्येकाला वाटतं. पण दातांची नीट काळजी घेतली, त्यांची व्यवस्थित स्वच्छता राखली, तरच ते शक्य होईल आणि दात पांढरेशुभ्र राहतील. प्रत्येकाने आपले दात स्वच्छ ठेवलेच पाहिजेत. तरच दातांचे कोणतेही विकार होत नाहीत. सर्वात प्रथम पेस्ट वापरून ब्रश करणे महत्त्वाचे. पेस्ट वापरल्यामुळे तोंडात फेस तयार होतो. त्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना तो शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा असेल तर उत्तम…
दातांच्या सफाईसाठी काहीजण टूथपीक वापरतात. पण त्याने दात पूर्ण स्वच्छ होत नाहीत. दोन दातांच्या मधील भाग स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. हा दोरा निर्जंतुक केलेला असतो. शिवाय तो मजबूत असतो. त्या दोऱ्याने दोन दातांमधला भाग स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे बाहेर काढावा. लगेच धुऊन दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंगनंतर व्यवस्थित चुळा भराव्यात. तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एकावेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा. त्यानंतर 15 दिवसाचा ब्रेक घ्यावा. दातांच्या स्वच्छतेसाठी दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. सकाळचा चहा, नाश्ता करण्याआधी ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करणे, जीभ घासणे महत्त्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा, असे केल्याने दातातील 95 टक्के अन्नकण निघून जातात.
दात किडू नयेत म्हणून…
- ब्रशिंग व गुळण्या याद्वारे दात स्वच्छ ठेवावे. रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे.
- गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. सकस आहार घ्यावा.
- दात कोरू नये. डेंटल फ्लॉस वापरावा.
- कृत्रिम दातांची योग्य काळजी घ्यावी.
- वेडेवाकडे दात असल्यास अन्नकण अडकून कीड लागू शकते. तेव्हा दात सरळ करण्याची ट्रिटमेंट करून घ्यावी.
- एखादा दात काढलेला असल्यास त्याजागी दुसरा दात न बसवल्यास कालांतराने इतर दात त्याजागी सरकतात व कीड लागणे, हिरडय़ा सुजणे असे त्रास उद्भवतात.
- दातांच्या डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे.
कवळी केव्हा…
सर्वच दात खराब झाले असतील तर किंवा ज्येष्ठ नागरिकांचे सगळेच दात वयोमानानुसार पडून गेल्यावर कवळी बसवता येते. पण एकही दात शिल्लक नसेल तर खाल्लेले अन्न चावून पचवता येणे शक्य होत नाही. यासाठी कवळी बसवणे गरजेचे असते. जेवण पचले नाही तर अनेक प्रकारचे पोटाचे विकार होऊ शकतात. तोंडाचेही काही विकार अन्न पचले नाही म्हणूनच होतात. कवळी लावल्याने तोंडाचे स्नायू योग्य प्रकारे कार्य करू लागतात.
दातांचे विकार व उपचार
दातांची योग्य काळजी घेतली नाही तर अनेक प्रकारचे विकार होऊ शकतात. यात हिरडय़ांचे विकार असतात, दाताला कीड लागणे, दात वेडेवाकडे असणे, तोंडाला दुर्गंध येणे असे बरेच प्रकार असू शकतात. हिरडीच्या सर्वसामान्य आजारांना ‘जिंजीवायटीस’ म्हणतात. यात हिरडीला सूज येऊन हिरडीतून रक्त येणे, हिरडीत कचरा साठून त्यात पू होणे असे प्रकार होतात. याला ‘पायोरिया’ म्हणतात. हे आजार एकदा निश्चीत झाले की लगेच त्यावर उपचार करावे लागतात. असे विकार दृष्टीस पडले तर डॉक्टर दातांच्या नसांवर उपचार करतात. त्याला ‘रूट कॅनल ट्रीटमेंट’ म्हटलं जातं. काहीवेळा दातांमध्ये दातांच्याच रंगाचे सिमेंट भरले जाते. दात वेडेवाकडे असतील तर ते सरळ करावे लागतात. पिवळे पडलेले दात काही विशिष्ट उपचारांनी पांढरेशुभ्र करता येतात. आणखी एक उपचार म्हणजे दातांमध्ये असलेल्या फटी भरून काढल्या जातात. आजकाल रुट कॅनालसाठी ‘प्रोटेपर’ नावाचे एक आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. या उपचाराने जंतूसंसर्ग कमी होऊन ठणका थांबतो आणि दात किडलेला असूनही वाचतो.
दातांची कीड
दातांची कीड हा एक तोंडातील जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. तोंडात असलेले जीवाणू दातावर साठलेल्या अन्नकणांमधील साखरेवर प्रक्रिया करून ऍसिड तयार करतात. या ऍसिडमुळे दाताच्या पृष्ठभागावरचे आवरण विरघळायला सुरुवात होते. ही प्रक्रिया हळूहळू पण सतत सुरू राहते. या आवरणाला पडलेल्या छिद्रामध्ये आणखी अन्नकण अडकतात, अधिकाधिक जीवाणू ऍसिड हल्ला सुरू ठेवतात, छिद्र वाढत राहते, दाताचा पृष्ठभाग पोखरला जातो आणि मग दाताला मोठा खड्डा पडतो. यालाच कॅव्हिटी म्हणतात. ही दाताची कॅव्हिटी आकाराने लहान असतानाच ती डेन्टिस्टकडून भरून घेणेचांगले असते.
हे करून पाहा
- दिवसभरातून दोन वेळा म्हणजे सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ करा. यासाठी चांगला टुथब्रश वापरा. तीन ते चार महिन्यातून तो बदला. कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरडय़ांना इजा होते.
- दात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरा. टुथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरवा.
- दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंतमंजन वापरा.
- जेवणानंतर पाण्याची गुळणी करून दात स्वच्छ केल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.
- माऊथवॉशचा प्रयोग आठवडय़ातून दोन ते तीन वेळा केला पाहिजे. त्यामुळे तोंडाची दुर्गधी येत नाही.
- जेवणानंतर फ्लॉसनेही दातांची पूर्ण स्वच्छता केली पाहिजे. फ्लॉस वापरण्याची एक वेगळी पद्धत असते.
- जिंजीवायटिसचा आजार दूर करण्यासाठी ‘क’ व ‘ड’ जीकनसत्त्व तसेच लवंगाचे तेल यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला पाहिजे.
- दातांच्या स्वच्छतेसाठी काकडी, गाजर, मुळा तसेच सफरचंद चावून चावून खाल्ल्याने फायदा होऊ शकतो.
दातदुखीवर उपाय…
- लवंगेचे तेल हा दातदुखीवरचा सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय आहे. लवंगेचे थोडे तेल काळीमिरींसोबत घेऊन ते कापसाच्या बोळ्यावर घेऊन दुखणाऱ्या दातावर ठेवा.
- मोहरीच्या तेलानेही दातदुखी कमी होते. हे तेल व मिठाचे मिश्रण हिरडीच्या दुखऱ्या भागावर चोळा.
- लिंबाच्या रसाच्या थेंबांनीही दातदुखी कमी करता येते.
- दुखऱ्या दातावर किंवा हिरडीवर कांद्याचा ताजा कापलेला तुकडा ठेवल्याने दातदुखी कमी करता येते.
- दुखऱ्या दाताला बाहेरील बाजूने बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.
- अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. नाहीतर दुखणे वाढेल.
- आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाव्यात. याबरोबरच जंक फूड खाणे टाळले तर दातदुखी दूर ठेवता येते.



























































