
>> शिरीष कणेकर
मी खारला ‘नवकेतन’च्या कार्यालयात कोचावर देव आनंदच्या शेजारी बसलो होतो. त्याला इतकं खेटून सुरय्याही कधी बसली नसेल. बरोबरच आहे. तो सुरय्याच्या जीवनातून गेला. आमच्या जीवनातून तो कधीच गेला नाही. मग अधिक जवळचं कोण? त्याच्यावर अधिक हक्क कोणाचा? सुरय्याचा की आमचा?
‘सुरय्याच्या वाढदिवसाला तिला फुलांचा गुच्छ पाठवितोस? तिला फोन करतोस?’ मी जुनी ओळख असल्यागत सलगीनं विचारलं. त्याचं वागणंच इतकं खेळीमेळीचं होतं की माझ्यासारखा खुजा व्यक्तिमत्त्वाचा माणूसही बोलताना एवढी मोकळीक घ्यायला धजावला होता.
‘नाही बुवा, फोनबिन काही करत नाही.’ देव आनंद त्याच्या दातातील ती सुप्रसिद्ध फट दाखवत प्रसन्न हसत म्हणाला, ‘याद आती है तो दिलही दिल मे फोन घुमा लेते है, यार.’
आता मला कळलं की सुरय्या अखेरपर्यंत देव आनंदविषयी कौतुकानं का बोलायची ते. तो तिच्याशी खोटं बोलला नसणार, भूलथापा मारल्या नसणार, तिला तोंडघशी पाडलं नसणार. म्हणून तो माझ्यापाशीही मनापासून म्हणाली होती- ‘देव इज सच थरो जंटलमन!’
चित्रपटसृष्टीत हयात काढून असे कौतुकोद्गार वाटय़ाला येणारे कितीसे आहेत? खरं, म्हणजे एकही नाव डोळय़ांपुढे येत नाही.
देव आनंद निःसंशय पडद्यावरचा मदन होता व मधुबाला रती होती. दोघांनी आठ चित्रपटांत एकत्र काम केलं. ‘अरमान’, ‘मधुबाला’, ‘आराम’, ‘नादान’, ‘निराला’, ‘शराबी’, ‘जाली नोट’, ‘काला पानी.’ पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे देव आनंद-मधुबाला ही जोडी हिट ठरली होती. काय हवं होतं, नक्की तत्कालीन प्रेक्षकांना? देव आनंदनं मधुबालावर व मधुबालानं देव आनंदवर पडद्यावर प्रेम केलेलं पाहण्यात प्रेक्षकांना आनंद नव्हता? मग काय सुंदरनं कम्मोवर प्रेम केलेलं व द्वंद्वगीत गायलेलं पाहायला त्यांना आवडायचं…?
‘देस परदेस’च्या प्रकाशनाच्या ‘ताज’ हॉटेलातील पार्टीत मी मधुबालाच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर फडकणारी ओढणी घेतलेल्या दिलफेक फोटोवर, देव आनंदची स्वाक्षरी घेतली तेव्हा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला होता – ‘एखाद् और फोटो हो तो मुझे भी दे दे.’
देव त्याच्या अतिसुंदर नायिकेचा फॅन होता का? असेल बाबा!
देव आनंदचं ऑफिस इमारतीच्या मागील बाजूस होतं. दोन मजले जाणारा सरळसोट लाकडी जिना होता. दिवसातून दोनदा त्या जिन्यावरून वरखाली केलं असतं तर गोपदेखील देवसारखा सडपातळ झाला असता. देव एका दमात धावत जिना चढून जायचा. 88 व्या वर्षी तो कोणाला कळू न देता हार्टच्या इलाजासाठी लंडनला गेला, तेव्हाही एअरपोर्टवर व्हीलचेअर न घेता तो लांब लांब ढेंगा टाकत ताडताड चालतच गेला. लोकांनी म्हणायला हवं- ‘वो देखो, देवसाब जा रहे है.’ त्याला व्हीलचेअरमध्ये बघून लोक अविश्वासानं म्हणाले असते, ‘देवला पण व्हीलचेअर लागू शकते?’ देव म्हातारा झाला… हे देवला कदापि सहन होण्यासारखं नव्हतं. जान दे देंगे, लेकिन बुढ्ढा नही कहेलाएंगे!
त्या दिवशी त्याच्या ऑफिसात बसून त्याची मुलाखत घेताना मी स्वर्गसुख अनुभवत होतो. मी साक्षात देवाशी बोलत होतो. म्हणजे काय ते आमच्या पिढीला विचारा. नट पुष्कळ होते हो, पण देव एकच होता.
सगळं छान चाललं होतं. एकाएकी फोटोग्राफर होशी जालनं त्याला विचारलं – ‘आपल्याकडे दिलीप कुमारसारखी टॅलंट हवी होती असं नाही तुला वाटत?’
मला विजेचा जणू झटका बसला. तो देव आनंदलाही बसला. तो कोचावरून उडी मारून उठला आणि तारस्वरात ओरडला – ‘आय अॅम अॅज टॅलंटेड अॅज एनीबडी एल्स इन धिस कंट्री.’
होशी अशी बावाजीगिरी दाखवेल असं मला वाटलं नव्हतं. वास्तविक त्याचं काम कॅमेऱ्याशी होतं. देव आनंदच्या अभिनय नैपुण्याविषयी तुमचं काहीही मत असेल. माझंही होतंच की, पण त्या महामानवाचा असा सरळ सरळ तोंडावर अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. तो अफाट लोकप्रियतेचा धनी होता. त्याच्या चांगुलपणाची ही फळं त्याच्या पदरात टाकायची? अक्षम्य…अक्षम्य…!
दुसऱ्याच क्षणी देव नॉर्मल झाला, पण आता मी त्याचं जे रूप पाहिलं होतं ते त्यानं पडद्यावर कधीही दाखवलं नाही, हे माझ्या मनात आल्यावाचून राहिलं नाही. म्हणून असेल, तो भूमिका जगला नाही. अभिनय करीत राहिला. पण लाखो करोडो लोकांचा तो देव होता, हे विसरता येणार नाही आणि विसरायचं कशासाठी?




























































