दिल्ली डायरी : पंतप्रधानपद आणि कुमारस्वामींची भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>नीलेश कुलकर्णी<<

[email protected]

देशाच्या राष्ट्रीय राजकारणाचा माहोल पुलवामा हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानवर हिंदुस्थानी लष्कराने केलेला हवाई स्ट्राइक यामुळे आता बदलला आहे. साहजिकच 2019 च्या निवडणुकीत ज्यांना ‘खिचडी’ सरकारची अपेक्षा खात्रीने होती त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. याही परिस्थितीत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 2019 मध्ये आपले पिताजीच, म्हणजेच एच. डी. देवेगौडा हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी ठाम भविष्यवाणी केली आहे. मुळात कुमारस्वामींच्याच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे भवितव्य ठीक नाही. तेव्हा देवेगौडांच्या भविष्याचे काय सांगायचे?

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी एक भविष्यवाणी केली आहे. देशाचा माहोल आपल्या वायूदलाने पाकिस्तानवर केलेल्या यशस्वी हवाई हल्ल्यानंतर बदलला असला तरी कुमारस्वामी महाशयांना अजून खिचडी सरकारची स्वप्ने पडतच आहेत. 1996 प्रमाणे आपले वडील एच. डी. देवेगौडा यांना पुन्हा 2019 मध्ये पंतप्रधानपदाची लॉटरी लागेल असे कुमारस्वामींनी म्हटले आहे. 1996 मध्ये तमाम कॉम्रेडनी ज्योती बसूंचा पंतप्रधानपदाचा मार्ग अडवला होता. त्याचवेळी मुलायमसिंग यादव हे देशभरातील समस्त यादवांचे व ओबीसीचे मसिहा होतील या भीतीपोटी लालू यादव यांनी मुलायम यांच्या पायात पाय घालत त्यांना पंतप्रधानपदापासून दूर राखण्यात यश मिळवले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात कसेबसे  मुख्यमंत्रीपद सांभाळत असलेल्या एच. डी. देवगौडांच्या ‘लाभस्थाना’त सर्व शुभ ग्रह आले आणि अचानक धनलाभ व्हावा तसे त्यांना ध्यानीमनी नसताना पंतप्रधानपदाचे घबाड लाभले.

 खरे म्हणजे या कुमारस्वामींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मध्यंतरी डळमळीत झाली होती. त्यामुळे त्यांनी स्वतः ज्योतिषाकडे धाव घेतली होती. त्याबरहुकूम ते शासकीय निवासातही राहायला गेलेले नाहीत. शिवाय ज्योतिषांनीच कुमारस्वामींच्या खुर्चीवर मार्च महिन्यात गंडांतर असल्याचे भाकीत वर्तवले आहे. तरीही कुमारस्वामी आपल्या वडिलांच्या पंतप्रधानपदाचे भविष्य ठामपणे सांगत आहेत. शेवटी सर्जिकल स्ट्राइकचे यश लष्कराचे असले तरी युद्धज्वराचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होतो हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे 2019 नंतर देशात खिचडी सरकार सत्तेवर येईल आणि आपली सत्तेची खिचडी त्यामुळे चांगलीच रटरटेल अशा स्वप्नात असलेल्या मंडळींच्या ‘स्वप्नाचीच खिचडी’ होण्याची चिन्हे आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकासह मध्य प्रदेश व राजस्थानातील विरोधी पक्षाची सरकारे सत्तेवरून खाली खेचून तिथे कमळ फुलविण्याचा भाजपच्या चाणक्यांचे ‘मिशन लोटस’ आकाराला येत आहे. कुमारस्वामींनी या इराद्यांकडे आणि ज्योतिष्यांच्या भाकिताकडे दुर्लक्ष न केलेलेच बरे!

नितीशबाबू बडे मेहनती है…!

nitish-kumar-pm-narendra-mo

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. कायम असतात ते हितसंबंध, असे म्हटले जाते. याची आठवण व्हायचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे सुशासनबाबू मुख्यमंत्री नितीशबाबूंची केलेली तारीफ. वास्तविक 2014 मध्ये मोदींना पर्याय म्हणून काही तथाकथित पुरोगाम्यांनी भरीस घातले म्हणून नितीशबाबूंनी नवधर्मनिरपेक्षतेची लुंगी नेसून भाजपपासून राजकीय घटस्फोट घेतला होता. त्यानंतर सातत्याने नितीशबाबूंनी मोदींविरोधात टीकाही केली होती, मात्र बदलत्या राजकीय हवेचा अंदाज आल्यानंतर नितीशबाबूंनी भाजपसोबत सत्तेचे कमंडलू हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात अगोदर बिहारमध्ये नितीशबाबूंसोबत आघाडी करून भाजपने पहिले पाऊल उचलले. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी व नितीशबाबूंची सुशासनबाबू ही इमेज या जोरावर या आघाडीला यश मिळेल असा भरवसा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत या आघाडीची दमछाक होण्याची चिन्हे आहेत. लालू यादवांच्या कुटुंबकबिल्यात अंतर्गत संघर्ष उफाळला नाही तर लालूंना सहानभूती मिळून तेजस्वी यादव राज्याचे नेते म्हणून उदयाला येऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लालूंचे बिहारच्या राजकारणात ‘कमबॅक’ होऊ नये याची दक्षता सध्या नितीशबाबूंपेक्षाही मोदी व त्यांचे सहकारी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच एकेकाळी नितीशबाबूंवर ‘निक्रिय मुख्यमंत्री’ म्हणून टीका करणाऱ्या पंतप्रधानांना नितीशबाबूंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘तारीफों के पूल’ बांधावे लागत आहेत. यातच सगळे आले.

नरसिंह रावांचे दुर्दैव!

narsingh-rao

दुर्दैव एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतरही त्याची पाठ सोडत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव. देशावर सोने गहाण टाकायची वेळ आल्यानंतर अगदी अल्पमतात सरकार असतानासुद्धा नरसिंह रावांनी त्या वेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या मदतीने आर्थिक उदारीकरणाचे धोरण अवलंबले, देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. आज देशवासीय जी काही रसाळ आर्थिक फळे खात आहेत त्याचे बीज नरसिंह राव यांनी रोवले होते, मात्र त्यांच्याकडे आजच्यासारखी ‘मार्केटिंग स्ट्रटेजी’ नव्हती. त्यामुळे देशाच्या इतिहासात भरीव योगदान देऊनही नरसिंह राव यांना त्यांचा पक्ष आणि देशही विसरला. दुर्दैवाने नरसिंह रावांची पाठ इथवरच सोडलेली नाही. नरसिंह राव यांच्या नावाने दिला जाणारा पहिला राष्ट्रीय पुरस्कार नरसिंह राव यांचे शिष्य डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात आला, मात्र या कार्यक्रमाला सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाणीवपूर्वक दांडी मारली. गमतीचा भाग म्हणजे या पुरस्कार  वितरण सोहळय़ापूर्वी सोनिया व राहुल हे सत्कारमूर्ती मनमोहन सिंग यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी संसदेत हजर होते आणि त्यांचे गुलूगुलूही सुरू होते, मात्र त्यानंतर या मायलेकांनी नरसिंह राव पुरस्कार सोहळय़ाला जाण्याचे टाळले. आता हायकमांडच जाणार नसेल तर इतर काँग्रेसजनांची या कार्यक्रमाला जाण्याची काय बिशाद? फक्त त्याला अपवाद ठरले ते प्रणव मुखर्जी. प्रणवदा हे  स्वतंत्र विचारांचे नेते आहेत. त्यामुळेच त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. वास्तविक, नरसिंह राव यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार समारंभाला हजेरी लावून राहुल यांना आपली इमेज बदलता आली असती, पण त्यांनी ती संधी गमावली. अर्थात काँग्रेस मुख्यालयात नरसिंह राव यांचे पार्थिव ठेवू न देण्याचे गलिच्छ राजकारण करणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार? नरसिंह राव यांना  मृत्यूनंतरही न्याय मिळालेला नाही हेच खरे!