
आहार कोणता करावा आणि किती करावा यावर अनेकदा लिहिले जाते वा विचार मांडला जातो.त्यामुळे या गोष्टींमध्ये शिरण्याऐवजी आपण आहार करताना कसा करावा याबद्दल आज थोडा विचारविमर्श करू.
सर्वप्रथम आहाराची वेळ ही निश्चित असावी. सकाळी शक्यतो स्नान झाल्यानंतर, पूजाअर्चा झाल्यानंतर आणि थोडाफार व्यायाम झाल्यानंतरच सकाळची न्याहारी घ्यावी. दुपारी बारा-साडेबाराच्या सुमाराला दुपारचे जेवण घ्यावे आणि नंतर संध्याकाळचा नाश्ता किंवा जेवण हे शक्यतो सूर्यास्ताच्या आसपास घ्यावे. सूर्यास्ताच्या आसपास शक्य नसेल तर कमीत कमी रात्री नऊच्या आधी तरी जेवण अवश्य घ्यावे. रात्रीचे भोजन सीमित असावे, पचायला हलके असावे.
आहार करताना शक्यतो जमिनीवर कापडी किंवा लाकडी पाट घालून त्यावर मांडी घालून स्वस्तिकासनात बसावे. भोजनाची थाळी ही शक्यतो चांगल्या धातूची पिंवा केळीच्या पानातून किंवा पत्रावळ्यांमधूनही जेवण घेता येईल.
चित्राहुती / प्रार्थना – जेवणासाठी बसताना मन प्रसन्न असावे. एकटय़ाने जेवण घेण्याऐवजी सहपरिवार सहकुटुंब, अर्थात सर्वांनी एकत्र बसून जेवावे. भोजनाला प्रारंभ करायच्या आधी हात जोडून, डोळे मिटून ईश्वराची प्रार्थना करावी. आपल्याकडे जेवणाच्या पूर्वी चित्रावत किंवा चित्राहुती नावाचा प्रकार आहे. त्यामध्ये आपण ईश्वराची प्रार्थना करतो आणि नंतरच भोजनास प्रारंभ करतो.
अन्नं ब्रह्म रसं विष्णु भोक्ता देवो महेश्वरः । अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तम् पचाम्यनं चतुर्विधम्
अन्न हे ब्रह्म आहे. त्यातील रस किंवा उदकाचा अंश विष्णुतत्त्व आहे आणि या सर्वांचा आस्वाद घेणारा हा स्वयं महेश्वर आहे अशी कल्पना करावी. हा महेश्वरच वैश्वानर होऊन प्राण आणि अपान यांच्या सहाय्याने या अन्नाचे पचन करत असतो आणि आपल्या शरीराला आवश्यक ती ऊर्जा त्या अन्नातून शोषून घेत असतो. म्हणून ईश्वराचे आभार मानावे. ईश्वराचे स्मरण करून नंतरच भोजनाचा आस्वाद घ्यावा.
जेवताना पोटामध्ये थोडी जागा ठेवावी. जेवणापूर्वी अर्धा तास शक्यतो पाणी पिऊ नये. त्यामुळे भूक चांगली लागते. जेवण झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास शक्यतो पाणी पिऊ नये. अगदीच आवश्यकता भासल्यास थोडेसे पाणी प्यावे. त्यामुळे पचन चांगल्या प्रकारे होते.
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
सीए अभिजित कुळकर्णी
योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
www.bymyoga.in




























































