
>> रविप्रकाश कुलकर्णी
एखादा आठवडा असा येतो की, त्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. येता आठवडा हा असा भरगच्च असेल. 23 तारखेला संत गाडगे महाराज जयंती आहे. 24 तारखेला जागतिक मुद्रण दिन आहे. 26 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी आहे. 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे. आणि 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. या प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य म्हणून आहेच आणि त्या निमित्ताने या सर्वांची उजळणी होतेच. सगळ्या दिवसांमध्ये एकसमान गोष्ट आहे, ती म्हणजे त्यानिमित्ताने आपल्या भाषेवरचे प्रेम. ते कसे टिकेल आणि वर्धिष्णूदेखील होईल याचा विचार होतो. ही गोष्ट, सध्याच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींमुळे मराठीवर जे अतिक्रमण होताना दिसते आहे, त्याला आवर घालण्याचे काम अशा वातावरणामुळे नक्की होते. म्हणूनच या गोष्टी उदासीनता वा आळस न करता करायच्याच. अशा वेळी संत ज्ञानेश्वरांनी, अमृताला मागे सारणाऱया आमच्या मराठी भाषेच्या प्रशस्ती सुरुवात होते. संत तुकाराम महाराजांनी तर तमाम मराठी लोकांच्या मनातले प्रकट केलं आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रs यत्न करू
शब्दचि आमुच्या जिवांचे जीवन
शब्द वाटू धन जनलोका
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव
शब्देंची गौरव पूजा करू पाहे
या गोष्टीचे पुनः पुन्हा स्मरण करायचे.
आता कोणी म्हणेल याचा विज्ञान दिनाशी काय संबंध?
प्रगत विज्ञानदेखील आमच्या माय मराठी भाषेत येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते होतही आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे लोक वाङ्मय गृह प्रकाशित हेमंत साने लिखित ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ हे पुस्तक. ‘हे पुस्तक खरोखरच ज्ञानाचा एक उजळ दीपस्तंभ आहे. 118 मूलद्रव्यांची माहिती एवढ्या सोप्या, प्रवाही आणि रसास्वादक मराठीत देऊन त्यांनी विज्ञान सामान्यांच्या दारी नेले आहे. शास्त्राrय अचूकता, सुस्पष्ट मांडणी आणि उपयुक्त परिशिष्टांमुळे हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, विज्ञानप्रेमी आणि सर्वसाधारण वाचक सर्वांसाठीच अमूल्य ठरते,’ असं डॉक्टर रघुनाथ माशेलकर म्हणतात यावरून या पुस्तकाचे महत्व किती आहे हे कळते.
तर विज्ञान प्रसारक आणि लेखिका डॉक्टर मानसी राजाध्यक्ष या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात-
ज्याला ठाऊक ‘आवर्त सारणी’ तो घाली विश्वाला गवसणी!
असे असतानादेखील मराठी भाषेमध्ये आवर्त सारणी (Periodic Table) या अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेला साकल्याने समोर मांडणारे पुस्तक क्वचितच आढळते, किंबहुना तसे ते नाहीच, असे माझे तरी मत आहे. या पुस्तकामध्ये लेखकाने तो प्रयत्न अगदी उत्तम प्रकारे केला आहे.
आवर्त सारणीचे महत्व विशद करताना राजाध्यक्ष बाई म्हणतात, ‘आवर्त सारणी हा काही चिन्हे आणि आकडे यांची जंत्री असलेला साधा तक्ता नाही, तर या विश्वात ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो, स्पर्श करतो, अनुभवतो, त्या साऱया मूलभूत द्रव्यांची पूर्ण ओळख देणारा एक विशाल दस्तऐवज आहे. कारण त्यात असलेल्या 118 मूलद्रव्यांच्या माहितीमध्ये संपूर्ण निसर्गाची जडणघडण सामावलेली आहे. या सर्वांचा सखोल अभ्यास करून मुद्देसूद आखणी आणि मांडणी केल्याने हे पुस्तक सर्व गटातील विद्यार्थी, रसायन विज्ञानाचे अभ्यासक आणि या विषयाबाबत कुतूहल असणाऱया सामान्य वाचकांसाठी संदर्भ ग्रंथ ठरेल.
विशेष म्हणजे शालेय अभ्यासक्रमात असलेल्या संकल्पनांचाच उपयोग करून सहज भाषेची एकवाक्यता सांभाळलेली आहे. विज्ञानाची गुंतागुंत सहजपणे उलगडून दाखवणारा हा ग्रंथ एक नवा दिशादर्शक ठरावा.


























































