स्वागत दिवाळी अंकांचे (भाग – 4)

747

मुक्त शब्द

‘मुक्त शब्द’च्या यावर्षीच्या दिवाळी अंकावर ग्रेटा थनबर्नला स्थान देण्यात आले आहे. कारण सध्या जगभरातील सर्वांना ग्रासत असलेल्या पर्यावरणाच्या समस्येवर बोलण्याचे, त्यांना जाब विचारण्याचे धाडस ही अवघी सोळा वर्षांची पर्यावरण कार्यकर्ती करत आहे.  ‘खिडकीत बसणारी माणसं’ ही मनस्विनी लता रवींद्र यांची स्त्रयांवरील कथा, ‘मराठीतील मार्क्सवादी साहित्य समीक्षाः उपसंहार’, शिवाय ‘युगांत की युगांतर’ हा अतुल देऊळगावकर यांचा पृथ्वीच्या भविष्याबाबत भाष्य करणारा लेख अशा विविध विषयांची माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख या अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

संपादक : यशोधन (येशू) पाटील

पृष्ठे : 286, मूल्य : 300 रुपये

हेमांगी

यंदाच्या या दिवाळी अंकात बँकिंग क्षेत्रातील भवितव्याचा वेध घेणारे डॉ. रूपा रेगे – नित्सुरे, डॉ. चंद्रहास देशपांडे, नीलेश साठे आदी नामवंत अर्थतज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. आपल्या आरोग्याशी निगडित अनेक पैलूंचा मागोवा घेणारा ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा खास विभाग वाचकांना मार्गदर्शक ठरणारा आहे. यात मानसिक आरोग्य संवर्धन – डॉ. वाणी कुलहळ्ळी, जेनेरिक औषध उद्योग – डॉ. उर्मिला जोशी, ऑनलाइन औषधांचे परिणाम – प्रा. मंजिरी घरत, स्त्राrरोग आणि प्रसूतिशास्त्रात सकारात्मक बदल घडविणारी अल्ट्रासोनोग्राफी – डॉ. सुजाता वाघ, ‘डॉक्टर गुगल’पासून दूर राहणे हेच रुग्णांच्या हिताचे – डॉ. सलील बेंद्रे आदी तज्ञांचे लेख विशेष उल्लेखनीय आहेत. अंकाचा बराच मोठा भाग कसदार कथा – दीर्घकथा व नामवंत कवींच्या कवितांनी व्यापला आहे. अंकाचे देखणे मुखपृष्ठ अंकाची शोभा वाढविणारे!

संपादक : प्रकाश कुलकर्णी

पृष्ठे : 232, मूल्य : 150 रुपये

आकंठ

केवळ वाङ्मयीन चळवळीला वाहिलेला दिवाळी अंक म्हणून ‘आकंठ’ने एक वेगळे स्थान मिळविले आहे. 40 वर्षांची प्रदीर्घ यशस्वी वाटचाल करणारा हा दिवाळी अंक. या 40 व्या सांगता विशेषांकात 24 हिंदुस्थानी भाषांमधील निवडक कथा आणि कवितांचा खजिना वाचकांसाठी खुला केला आहे. यात उर्दू, सिंधी, तेलुगू, राजस्थानी, असामिया, कश्मिरी, हिंदी, ओडिया, पंजाबी, बंगाली, गुजराती, संस्कृत, इंग्रजी, मणिपुरी, मैथिली आदी 24 भाषांतील दर्जेदार साहित्याचा भरगच्च मजकूर आहे. इतर भाषेतील सर्व कथा – कविता मराठीत अनुवादित असून त्या वाचनीय आहेत.

संपादक : रंगनाथ चोरमुले, कार्यकारी संपादक : डॉ. राम पंडित

पृष्ठे : 688, मूल्य : 400 रुपये

आपली प्रतिक्रिया द्या