मुद्दा – दिवाळीचे आर्थिक बजेट : पूर्वीचे आणि आताचे!

2142

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

दिवाळी हा सण लहानांपासून थोरांपर्यंत आणि गरीबापासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण आनंदाने, उत्साहाने साजरा करत असतो. काळाबरोबर राहणीमान आचारविचार संदर्भाचे सर्वच संदर्भ बदलत जाणार ही वास्तविकता स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, पण संवेदनशील मन हे जगले पाहिजे. मग त्यात किती  बदल झाले तरी सणामागचा मूळ हेतू आणि उद्देश हरवता कामा नये. बदलती परिस्थिती आणि जीवनशैली यामध्येसुद्धा आमूलाग्र बदल होत चालले आहेत

साधारणतः तीस/चाळीस वर्षांपूर्वीची दिवाळी आणि अलीकडे साजरी होणारी दिवाळी यामध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार दिवाळीचे आर्थिक बजेटसुद्धा वाढत  आहे. त्यावेळेस मिळणाऱ्या मासिक उत्पन्नाव्यतिरिक्त दिवाळीसाठी सरकारी, निमसरकारी, खासगी अशा अनेक कार्यालयांतून कंपन्यांमधून दिवाळी बोनस दिला जात असे आणि तो सर्वसाधारण नफ्याच्या   टक्केवारीवर असे. इतकेच नव्हे, तर बोनससंदर्भात युनियन व्यवस्थापन यांच्यात करार केले जात असत. तेव्हा सर्व साधारण कुटुंबात 6/7 माणसे असायची. मिळणाऱ्या या बोनस रकमेतून सर्वांसाठी एका विशिष्ट रकमेची तरतूद करून घरातील सामान, दिवाळी फराळ,पैपाहुणा, कपडालत्ता, भेटवस्तू, फटाके, पाडवा, भाऊबीज या सर्व खर्चाचे योग्य पद्धतशीरपणे नियोजन आयोजन केले जात असे. जमा आणि खर्च या संकल्पनेतून कुशल गृहिणी काही रक्कम शिल्लक ठेवायच्या. कारण खरेदी करतानाच योग्य भाव वस्तूचा दर्जा बघूनच मग ती वस्तू खरेदी केली जायची, परंतु अलीकडच्या काही वर्षांत आणि वाढत चाललेली कॉर्पोरेट संस्कृती यामुळे आर्थिक चलन व्यवहारात मोठे बदल होत चालले आहेत

कॅशलेस व्यवहार, डेबिट कार्ड, पेटीएम, ऑनलाइन, डेबिट कार्ड यामुळे रोख रकमेचे व्यवहार कालबाह्य होऊ लागले आहेत. आकर्षक मिळणारी मंथली पेपॅकेज यामुळे बोनस ही संकल्पनासुद्धा आता मागे पडत चालली आहे. त्याच बरोबरीने कुटुंबातील सदस्य संख्यासुद्धा आता कमी होऊ लागली आहे. सरासरी  मासिक पन्नास ते लाखापर्यंत मिळणाऱ्या पॅकेजमुळे आता तसे पाहिले तर खरेदीची अपूर्वाई राहिली नाही. जी पूर्वी फक्त दिवाळीच्या वेळीच होत असे. त्यामुळे त्याबद्दल नवलाई वाटत असे. आता बसल्या जागेवरून स्मार्ट फोन ते लॅपटॉपच्या माध्यमातून  आपल्याला हवी ती वस्तू आपण रास्त दरात मागवू शकतो. माहिती  तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या या क्रांतीमुळे आपण अगदी जगाबरोबर आहोत ही जरी वास्तविकता असली तरी सर्वांनी एकत्र येऊन, एकत्र राहून खरेदी कुतूहल हा जो काही मानसिक आनंद होता तो हळूहळू कमी होत चालला आहे. ही वस्तुस्थितीसुद्धा नाकारून चालणार नाही. तेव्हा कुटुंबाचे उत्पन्न कमी होते, सदस्य संख्यासुद्धा जास्त होती तरीसुद्धा आनंद होता, उत्साह होता, स्पर्धा नव्हती, सुखीसमाधानी जीवन होते, परंतु अलीकडे मासिक उत्पन्न भरपूर, कौटुंबिक सदस्य कमी, ताणतणावाची जीवनशैली, पैसा आहे, पण वेळ नाही. सतत धावपळ आणि स्पर्धा त्यामुळे जरी आर्थिक गणित हे सुखीसमाधानाचे असले तरी कौटुंबिक आर्थिक गणितांचे बजेट मांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पैसा आहे, पण सुखसमाधान, मानसिक शांती, हरवत चालली आहे आणि या वास्तविकतेचासुद्धा विचार झाला पाहिजे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या