
>> दिलीप जोशी ([email protected])
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असे दुर्धर संकटातून वाचलेल्यांबाबत म्हटले जाते. असा ‘काळ’ आणि ‘वेळ’ ठरवणे अनेकदा आपल्या हातात नसते. अकल्पितपणे काही गोष्टी घडतात-बिघडतात. बिघडता-बिघडता पुन्हा सावरतात आणि जगरहाटी सुरू असते. या लेखात एका वेगळय़ा, कदाचित फारसे कुणाचे लक्ष गेले नसेल अशा बातमीकडे लक्ष वेधायचेय.
दरवर्षी जानेवारी महिन्यात एका ‘घडय़ाळा’चा आढावा घेतला जातो. हे घडय़ाळ स्वयंचलित नाही. त्यातले काटे माणसाच्या आणि निसर्गाच्या लहरीवर फिरत असतात म्हणण्यापेक्षा जुळवले जातात. एखाद्या गोष्टीचे ‘बारा’ वाजले असा वाप्रचार त्या गोष्टीचा विनाश दर्शवतो. हे घडय़ाळ तसेच आहे. त्याला ‘डूम्स डे ब्लॉक’ किंवा अवघ्या पृथ्वीच्या विनाशाची वेळ दाखवणारे घडय़ाळ असे म्हणतात. त्यात ‘बारा’ वाजले की आटोपलाच या ग्रहाचा कारभार!
अर्थात हे घडय़ाळ केवळ प्रतीकात्मक आहे. त्यात ‘बारा’ वाजू नयेत याची काळजी माणसाने घ्यायची आहे. नैसर्गिक, अकल्पित आपत्तींशीही मुकाबला करण्याचं तंत्रकौशल्य विकसित करायचं आहे. अवकाशातून आदळू शकणारा महापाषाण (अशनी) किंवा सुनामीसारखा सागरी प्रलय अथवा ऍमेझॉनच्या खोऱ्यात नि ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात पेटतात तसे भयावह वणवे ही प्रचंड मोठी आव्हाने आजच्या ‘प्रगत’ मानवी संस्कृतीपुढे आहेत. एका बाजूला चंद्र-मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माणसाला पृथ्वीवरच्याच अनेक समस्यांचे आजवर निराकरण करता आलेले नाही. याचा अर्थ अवकाशप्रगती रोखावी असा नव्हे, परंतु त्याचबरोबर अवकाशाचाच एक भाग असलेल्या पृथ्वीची काळजी आधी घेतली आणि ती सुरक्षित ठेवली तरच पुढचे संशोधन शक्य आहे याची जाणीव पृथ्वीवासीयांना किती आहे?
‘डूम्स डे क्लॉक’ यंदा तरी काही बरे उत्तर देत नाही. गेल्या 73 वर्षांत नव्हती एवढी पृथ्वीच्याच अस्तित्वाची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे हे घडय़ाळ सांगतेय. गतवर्षी या घडय़ाळात ‘बारा’ वाजायला म्हणजे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा विनाश व्हायला दोन मिनिटे असल्याचे दाखवले होते. आता ती वेळ वीस सेकंदांनी कमी करून एक मिनिट चाळीस सेकंद एवढी करण्यात आली आहे. एरवी आपण ‘… आली समीप घटका’ हे शुभकार्यात उत्साहाने म्हणतो, पण ‘डूम्स डे’च्या घडय़ाळय़ातल्या बारा वाजण्याच्या कुमुहूर्ताची घटिका समीप येत असेल तर तातडीने उपाय करण्याची गरज असून जगभरातले सर्व सत्ताधीश त्याबाबत किती जागरूक आहेत त्यावर ते अवलंबून आहे.
1945 मध्ये ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने जपानवर दोन ऍटमबॉम्ब टाकले. तीन दिवसांच्या फरकाने पडलेल्या या विनाशकारी बॉम्बनी जपानची हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे बेचिराख केली. त्यातील नरसंहार आणि विध्वंस पाहून जग भयचकित झाले. त्यानंतर 1947 मध्ये अशा विनाशकारक अस्त्र्ाांपासून जगाला किती धोका आहे हे दाखवणारे ‘घडय़ाळ, ड्रम्स डे क्लॉक’ या नावाने अस्तित्वात आले. या प्रतीकात्मक घडय़ाळाचे काटे, जागतिक सुरक्षेचा अंदाज घेऊन ‘सेट’ करण्याचे काम ‘बुलेटिन ऑफ द ऍटोमिक सायंटिस्टस्’ या संस्थेचे सदस्य करतात. ज्यावेळी हे घडय़ाळ पहिल्यांदा ‘सेट’ करण्यात आले तेव्हा जग विनाशापासून सात मिनिटे दूर होते. म्हणजे तेव्हापासूनच जगातील परिस्थितीत काही सुखावह नाही. या घडय़ाळाचा जगातील सत्तासंघर्षाशी संबंध नाही, पण एकूणच संहारक शस्त्रसाठय़ामुळे उद्या मानवजात कशी धोक्यात येऊ शकते याचे ते निदर्शक मानले जाते. बदलते जागतिक राजकारण, युद्धसदृश परिस्थिती आणि बदलते हवामान, प्रदूषण या सर्वांचा एकत्रित विचार करून ‘विनाशकाला’च्या आपण म्हणजे पृथ्वीवासी किती जवळ आहोत याचा अंदाज घेतला जातो.
एवढे सगळे वाचल्यावर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण त्याने काही फरक पडणार नाही. फरक पडेल तो माणसे सामूहिक सुज्ञपणे वागली तरच. सात अब्ज लोकांची आणि जगातील सर्व सत्ताधीशांची याबाबतची ‘जागृती’ किती आहे त्यावर आपला ‘भविष्यकाळ’ अवलंबून आहे. जगातली ताणतणावाची परिस्थिती सध्या या घडय़ाळ सेट करणाऱ्या संशोधकांना कडय़ाच्या टोकावर आल्यासारखी वाटतेय. त्याला कारण आखातातील युद्ध आणि पृथ्वीला ग्रासणारे भीषण प्रदूषण. त्यातच ‘कोरोना’ किंवा अन्य जीवघेणी रोगराई.
बुद्धिवैभवाने जगात विस्मयकारी गोष्टी निर्माण करणाऱ्या माणसावर इतर जैविक प्रजातींचे रक्षण करण्याची नैतिक जबाबदारी येते. मानवनिर्मित संकटांमुळे त्यांचा नाहक बळी जाऊ शकतो. मग यात काही आशेचा किरण आहे की नाही? जरूर आहे.
1990 मध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यातले शीतयुद्ध संपल्यावर ‘डूम्स डे क्लॉक’चा मिनिटकाटा मागे फिरवला गेला. तो जगाच्या मध्यापासून 17 मिनिटे (11.43) एवढा दूर नेला गेला आणि जगाने निःश्वास टाकला. घडय़ाळाचे काटे उलटे फिरवता येत नसतात असे आपण एरवी म्हणतो, पण या घडय़ाळाचा मिनिट काटा आपल्या सुरक्षेसाठी जास्तीत जास्त ‘मागे’ फिरवणे मानवी हिताचे आहे. आपण तशी अपेक्षा करू शकतो!




























































