डॉ. बाळ फोंडके

>> प्रशांत गौतम

मराठीतील प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांचा सहस्रदर्शन सोहळा नुकताच पार पडला. आजपर्यंतच्या प्रवासात फोंडके यांनी रम्य कल्पनासृष्टी आणि वास्तवनिष्ठ विज्ञानसृष्टी यांचा सुरेख संगम साधून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. डॉ. फोंडके यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा संपादन, संशोधन, अतिथी प्राध्यापक, पीएच.डी.चे मार्गदर्शक आणि विज्ञान लेखन या क्षेत्रात उमटवला. प्रसन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या डॉ. फोंडके यांचा जन्म 22 एप्रिल 1939 साली गोवा राज्यात झाला. वाचनाची आवड तर त्यांना लहानपणापासूनच होती. वडील पुरुषोत्तम फोंडके यांना आपल्या मुलाची वाचन आवड माहीत होती. त्यामुळे वडील मुलास खेळणी आणून देण्याच्या ऐवजी मोठमोठय़ा लेखकांची उत्तमोत्तम पुस्तकेच आणून देत असत. बाळ (गजानन) यांना लहानपणापासून वाचनाची आवड असल्याने वडील आणून देत असलेली पुस्तके झपाटून वाचून काढत असत. ह. ना. आपटे, नाथ माधव, ना. धो. ताम्हणकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या साहित्याने तर त्यांना विलक्षण प्रभावित केले. शालेय वयातच वाचनाचे संस्कार झाले. पुढील काळात वाचनाची व्याप्ती वाढत गेली. वाढत्या वयाप्रमाणे त्यांनी आचार्य अत्रे, गंगाधर गाडगीळ, कोल्हटकर, चि. वि. जोशी, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर, पु. भा. भावे यांच्या साहित्याचे वाचन केले. संभाव्य वाचक लेखक असतो, असे म्हणतात. त्यामुळे डॉ. बाळ फोंडके यांनी विज्ञान साहित्य लेखनाचा प्रारंभ विविध वृत्तपत्रांतून केला. अनेक वृत्तपत्रे, विज्ञानविषयक नियतकालिक, मासिक या माध्यमातून त्यांनी विज्ञान साहित्य लेखनाची दमदार सुरुवात केली. लेखक होण्याचे बीज याच प्रवासात दडले होते. महाविद्यालयीन वाटचालीच्या उंबरठय़ावर मारी क्युरी यांचे प्रेरणादायी चरित्र त्यांच्या वाचनात आले. त्यातूनच संशोधक, विज्ञान लेखक व्हावे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पुढील काळात त्यांनी जे मनात ठरवले त्याचा ध्यास घेतला. फोंडके यांनी अनुभौतिकमध्ये एम.एस्सी. यशस्वी पूर्ण केल्यावर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये काही काळ प्राध्यापकी केली आणि नंतर भाभा अणुसंशोधन केंद्राच्या बीएआरसीच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. प्रशिक्षणानंतर वर्षभरात त्या केंद्राच्या जीव वैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीमध्ये असतानाच त्यांनी रोगप्रतिबंधक शास्त्र्ा, जीव भौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र्ा यात संशोधन केले. 1967 च्या सुमारास त्यांनी जीव भौतिकी या विषयात लंडन विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली. पुढील काळात फोंडके यांना याच विषयात सखोल संशोधनासाठी परदेशात अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाण्याची संधी मिळाली. बीएआरसीत तब्बल तेवीस वर्षे सेवा करून डॉ. फोंडके सेवानिवृत्त झाले. तेथील कार्यकाळात त्यांनी विज्ञान कथा लेखनास प्रारंभ केला. विज्ञान साहित्यातून समाजप्रबोधन ही डॉ. फोंडके यांची भूमिका होय. लेखनासाठी मुद्रित प्रसारमाध्यमांसोबतच आकाशवाणी-दूरदर्शन यांचाही मोठा हातभार लागत गेला आणि यामुळे विज्ञान प्रसारही होत गेला. 1983 च्या सुमारास टाईम्स ऑफ इंडिया संस्थेच्या ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादकपद भूषवले. फोंडकेंसारखा विज्ञान दृष्टीचा गुणग्राही संपादकाच्या कार्यकाळात ‘सायन्स टुडे’मध्ये व. दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुरेश जावडेकर, निरंजन घाटे यांच्यासारखे लेखक लिहू लागले. पुढील काळात फोंडके यांच्यावर विज्ञानविषयक मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी विविध संधी प्राप्त होत गेल्या. विज्ञान लेखन ते पूर्वी फावल्या वेळेत करीत असत. पुढे हाच त्यांचा छंद आणि व्यवसाय बनला. डॉ. फोंडके यांनी अंगल देशातील नवल, अखेरचा प्रयोग, अघटीत, अणू रेणू, अंतराळ अंतरिक्ष भरारी, अज्ञात (आईन्स्टाईन विज्ञानविषयक) आपले पूर्वज याचे साक्षेपी संपादन केले. ऑफलाइन, ओसामाची अखेर, खिडकीलाही डोळे असतात, गोलमाल, कर्णपिशाच (कथासंग्रह), कॉम्प्युटरच्या करामती (शैक्षणिक), गर्भार्थ (आरोग्यविषयक), ग्यानबाचं विज्ञान (बालकथासंग्रह), जंतर मंतर विज्ञानविषयक ती आणि तो (मानवशास्त्र्ाविषयक) तीन पायांची शर्यत, दृष्टीभ्रम (वैज्ञानिक) द्विदल, गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील (विज्ञान दीर्घ कथा), पेशीबद्ध जीवन : एक निरंतर प्रवास (अनुवादित) अशी विपुल साहित्य संपदा मराठी विज्ञान साहित्यास दिली. वाचकांमध्ये विज्ञान लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. विज्ञान लेखक, संपादक, पत्रकार अशी त्यांना बहुआयामी ओळख लाभल्याने त्यांचे लेखनही बहुश्रुत, आशयघन होत गेले. पुढील काळातही त्यांच्याकडून अशाच भरीव व ठसठशीत लेखनाची अपेक्षा.