प्रासंगिक – मी पाहिलेले व ऐकलेले डॉ. प. वि. वर्तक

2228

>> पु. ना. सामंत

पेशाने डॉक्टर, परंतु विचारांनी अध्यात्ममहर्षी असे डॉ. पद्माकर विष्णू वर्तक यांची अनेक भाषणे व विचार त्यांच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथील सभांना हजर राहून मी ऐकली आहेत. डॉ.वर्तक यांची भाषणे मन लावून ऐकल्यावर काही काळ त्यांनी सांगितलेल्या पुराणांतील गोष्टी व अध्यात्माविषयीचे त्यांचे ज्ञान यावर आपला विश्वास बसतो. पुनर्जन्म या विषयावरील त्यांचे भाषण ऐकल्यावर जरी त्यावर आपला विश्वास नसला तरी त्याबाबत कोणतीही शंका राहत नाही.  मी अनेक थोर व्यक्तींची भाषणे ऐकली आहेत व एक उदाहरण थोडे विषयांतर होत असतानाही इथे देत आहे.

डॉ. राममनोहर लोहिया हे एक थोर समाजवादी व राजकीय विचारवंत नेते होते. आजही त्यांचे विचार जपणारे अनुयायी हिंदुस्थानात आहेत. 1964-65 मध्ये त्यांनी ‘अंग्रेजी हटाव’ या विषयावर पुस्तिका लिहिली व आंदोलन सुरू केलें. या विषयावरील त्यांच्या एका भाषणाला मी हजर होतो. संध्याकाळी सहाची वेळ ठरली असताना डॉ. लोहिया सुमारे सात वाजता आले. सुरुवातीलाच ते म्हणाले की, त्यांना उशीर होण्याचे कारण ते गुजरातेत अंकलेश्वर येथील कच्चे तेल काढण्याच्या खाणींना भेट देऊन आले होते. या खाणी हिंदुस्थानात प्रथमच काढल्या होत्या. हे नवीन तंत्रज्ञान अमलात आणणारे तंत्र युरोपमधील बेल्जियम या देशातील होते. डॉ. लोहियांनी सांगितले की, त्या तंत्रज्ञांनी तेल उत्खननाचे त्यावेळच्या तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांच्याच देशांतील बेल्जियम भाषेत घेतले. आपल्या ‘अंग्रेजी हटाव’ या विषयावरील भाषणाची अशी सुरुवात करून नंतर सुमारे दोन तासांचे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर माझ्यासह प्रत्येक श्रोता म्हणत होता की, इंग्रजी भाषा हटलीच पाहिजे, परंतु आज 50-60वर्षांनंतर आपण या इंग्रजीच्या आहारी एवढे गेलो आहोत की, ‘अंग्रेजी हटाव’ हे डॉ. लोहिया यांचे शब्दही आपल्या आठवणीत नाहीत.

आदरणीय डॉ. वर्तक यांच्या भाषणाचे माझ्या बाबतीत तरी हेच झाले आहे. कारण त्यांच्या बहुतांश विषयांबद्दल मी अनभिज्ञच होतो, परंतु तरीही त्यांची भाषणे मी मन लावून ऐकली आहेत व त्यावर कोणतीही शंका उद्भवण्याचा प्रश्नच येत नाही.

डॉक्टरांच्या ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’   या पुस्तकातील काही माहिती अत्यंत मूलभूत स्वरूपाची आहे. उदाहरणार्थ ऋग्वेद हे जगामधील सर्वात प्राचीन हिंदुस्थानी वाङ्मय आहे व त्यातील खगोलशास्त्राचे ज्ञान हे मूलभूत आहे. समुद्राच्या भरती, ओहोटीच्या अचूक वेळा आपण हिंदू कॅलेंडरवरूनच काढू शकतो, इंग्रजीवरून नाही.

वेदकालात अतिविशाल व अतिसूक्ष्म अशी कालगणना केली आहे. त्यामध्ये 8 प्रहरांचे 24 तास म्हणजे एक प्रहराचे 3 तास मानले आहेत. हीच मापने पुढे नेऊन नाडिका 30 मिनिटे, क्षण 1.6 सेकंद अशी कालगणनामापे नमूद करून शेवटी अणू 0.00019 सेकंद व परमाणू 0.000032 सेकंद असे कालगणनेचे कोष्टक दिले आहे. हे कालमापन सध्याच्या गणितज्ञांना आताच कुठे जमत आहे.  त्याचप्रमाणे दशगुणित अंक हिंदुस्थानमध्येच प्राचीन काळी शोधलेले आहेत. एकं, दहं, शतंपासून कोटी, खर्व, निखर्वपुढे शंख, पद्म, सागर, अंत्य, मध्य व शेवटी परार्ध, जी संख्या 10 या संख्येचा 17 चा वर्ग (100000000000000000) असल्याचे यजुर्वेदात आहे.

शून्य हा अंक वेदकाळी हिंदुस्थानात शोधला असे डॉ.वर्तक यांनी या पुस्तकात नमूद केले आहे. 1 ते 9 हे अंक आणि शून्य याच्या संयोगामुळे परार्ध या विराट संख्येपर्यंत हिंदुस्थानी जाऊ शकले. असे जगात कुठेही घडले नाही. ऋग्वेदाच्या अति प्राचीन काळापासून या संख्या हिंदुस्थानास ज्ञात आहेत. युरोपात ग्रीस हा सर्वात प्रगत देश होता, पण ऍलेक्झांडरपर्यंत म्हणजे इ.सनपूर्व 325 वर्षेपर्यंत ग्रीक लोकांना सर्वात मोठी ज्ञात असलेली संख्या दशसहस्र म्हणजे 10 चा 4 वर्ग हीच होती. हिंदुस्थानात मात्र परार्ध म्हणजे 10 चा वर्ग 17 एवढी प्रचंड संख्या 25000 वर्षे किंवा निदान तैतिरीय संहितेपासून म्हणजे इ.स.पूर्वी 8357 पासून ज्ञात होती. याशिवाय त्या प्राचीन काळात गाई, म्हशी, घोडे, गाढवे, शेळ्या, मेंढय़ा, हत्ती, उंट हे पशू पाळले जात असत. वैदिक संस्कृती एवढी प्रगत होती की किल्ले, गढी, संरक्षक भिंती असलेली नगरे, त्यासाठी लागणारे सुतार, विणकर, चर्मकार, अलंकार बनविणारे व धातूकार, गृहरचना करणारे, सागर पर्यटन करणारे, जहाज बांधणी करणारे, मातीची भांडी बनविणारे कुंभार, केस कापणारे इत्यादी कारागीर होते.

डॉक्टरसाहेब असंही सिद्ध करतात की, लेखनकला अस्तित्वात होती याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहन-जो-दरो येथील लेख हे आहे. ही लिखित वाक्ये कुणीच वाचू शकलेले नाहीत. वेदांतील भाषा पुढील काळी वाचता आली नाही तर त्यावेळचे वेदांचे वाचन होणार नाही या शंकेने वेद मुखोद्गत करण्यात आले व ते 25 हजार वर्षे टिकून राहिले असे त्यांनी ‘वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय’ या पुस्तकात सविस्तरपणे नमूद केले आहे. डॉ. वर्तक यांच्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच होईल एवढे प्रचंड लिखाण त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या