ठसा – एक विनम्र योगसाधक

>> डॉ. पंडित विद्यासागर

योग ही प्राचीन हिंदुस्थानी परंपरा आहे. या परंपरेचे पाईक असल्याचा दावाही अनेकजण करतात. मात्र योग पूर्णपणे समजून घेऊन तो पूर्णत्वाने जगणारी व्यक्तिमत्वे दुर्मिळच. डॉ. संप्रसाद विनोद हे मला माहीत असलेले त्या प्रकारचे एक व्यक्तिमत्व. डॉ. संप्रसाद विनोद हे उच्चशिक्षित, विचारवंत आणि समाजाभिमुखता असणारे योगगुरू आहेत. त्यांचा आणि माझा परिचय हा गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ आहे. या कालखंडात आम्ही काही प्रकल्प, संशोधन आणि संस्थात्मक कामासाठी एकत्र आलो. या एवढय़ा मोठय़ा कालखंडात त्यांनी अनेक यशोशिखरे पादाक्रांत केली. असे असूनही त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मृदुता आहे. ते आपले म्हणणे अतिशय शांतपणे मांडतात. त्यामध्ये ठामपणा असला तरी दुराग्रह नसतो. मतभेद झाले तरी मनभेद होणार नाही याची ते काळजी घेतात. वरवर न दिसणारी विचारांची आणि आचरणाची खोली त्यात दिसते. त्यांना योग आणि तत्त्वज्ञानाचा वारसा लाभलेला आहे. तो वारसा त्यांनी समर्थपणे पेलला, परंतु त्याचबरोबर त्याला आधुनिकतेची जोड दिली. त्यामुळेच वृद्ध आणि तरुणांचे ते आकर्षण ठरले आहेत. आसनांवर त्यांचे प्रभुत्व आहे, मात्र त्यांचा कटाक्ष हा योगाचे मर्म समजून देण्यावर असतो. योग आणि वैद्यकशास्त्र्ााचा मिलाफ त्यांनी आपल्या ज्ञानातून आणि अनुभवातून उत्तमरीत्या साधला आहे. ध्यानावस्थेत योगासने करण्याची पद्धत त्यातूनच विकसित झाली. मन सोबत असल्याशिवाय शरीर योग्य रीतीने प्रतिसाद देत नाही हे त्यांनी खूप पूर्वीच जाणले. जागतिक पातळीवर आता त्याचा स्वीकार होत आहे.

योगाचे वैज्ञानिक कसोटीवर मूल्यमापन करता येईल का, असा विचार मागील शतकात सुरू झाला. पाश्चिमात्य जगाला योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जशी याची गरज होती तशीच ती योगाचा उपयोग वैद्यकीय उपचारासाठी होऊ शकेल का, या शक्यतेतून निर्माण झाली होती. महेश योगी यांनी या बाबतीत उल्लेखनीय कार्य केले. गॅल्व्हानिक स्किन रिस्पॉन्स या पद्धतीचा वापर करून ध्यानामुळे शरीरक्रियांवर होणारे परिणाम त्यांनी सप्रमाण दाखवले. याच कल्पनेतून 1980 च्या दशकात मी आणि संप्रसाद विनोद यांनी एक प्रकल्प राबवला. तरुणांच्या एका गटाला योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामधील अस्वस्थता कमी होते का, हे पाहण्याचा त्यामागे हेतू होता. डॉ. ऋजुता विनोद यांचाही त्यात सक्रिय सहभाग होता. त्या दोघांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून योगाची तत्त्वे समजावून सांगितलीच, पण त्याचबरोबर मानसिक संतुलन कसे राखावे याचे उत्तम मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात घडणारे प्रसंग, येणाऱया अडचणी आणि त्यांना सामोरे जाताना शारीरिक आणि मानसिक प्रतिसाद याचे सुंदर विवेचन ते करीत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील कॅलगिरी विद्यापीठाच्या सहकार्यातून कॅलगिरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यात येत असे. त्यानुसार त्या विद्यापीठातील विद्यार्थी पुण्यात तीन ते चार महिने राहून शिक्षण घेत. याचाच भाग म्हणून ते एखाद्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने प्रकल्प करीत. या कार्यक्रमांतर्गत माईक क्लेरे नावाच्या विद्यार्थ्याची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली. या विद्यार्थ्याचे कुणाशीच पटत नव्हते. माझ्याकडे येण्याअगोदर त्याने काही मार्गदर्शकही बदलले होते. संयोजकांनी याची कल्पना मला दिली नव्हती. या विद्यार्थ्याचे वेगळेपण मला पहिल्या भेटीतच जाणवले. त्याच्याशी केलेल्या चर्चेतून त्याला योगविषयक अभ्यास करणे आवडेल असे वाटले. त्यानुसार योगाचे तत्त्वज्ञान, योग अभ्यास आणि वैज्ञानिक परिमाण यांचा अभ्यास करण्याचे ठरले. डॉ. बहुलीकर यांनी तत्त्वज्ञानाची, मी विज्ञानविषयक आणि डॉ. संप्रसाद विनोद यांनी योगाभ्यासाची जबाबदारी घेण्याचे ठरले. डॉ. संप्रसाद विनोद यांच्याबरोबर झालेल्या चर्चा आणि प्रबोधनामुळे त्याच्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला. प्रत्येक गोष्टी विषयी तक्रार करण्याची त्याची वृत्ती बदलली. त्याने आसनाचा उत्तम सराव करून ती आत्मसात केली. ज्या विद्यार्थ्याचा प्रकल्प कसा पूर्ण होणार अशी काळजी संयोजकांना होती, त्याच विद्यार्थ्याने सर्वात आधी आणि सर्वात चांगला प्रकल्प पूर्ण केला. त्याने कृतज्ञता व्यक्त करताना हिंदुस्थानातून योग ही मला मिळालेली सर्वांत सुंदर गोष्ट अशी भावना व्यक्त केली होती.

योग संशोधनाला चालना देण्यासाठी डॉ. विनोद यांनी महर्षी विनोद रिसर्च फाऊण्डेशन ही संशोधन संस्था स्थापन केली. या संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली. या संस्थेत मी सल्लागार या नात्याने काही वर्षे कार्य केले. हे करताना काही मतांबद्दल मतभेद आम्ही मान्य केले होते. त्यामुळे आमच्यातील संबंध हे नेहमीच स्नेहमय राहिले आहेत. डॉ. संप्रसाद विनोद आणि डॉ. विनोद यांनी प्रबोधनाचे, ज्ञानदानाचे, संशोधनाचे आणि सौहार्द निर्मितीचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. ते त्यांचे जीवनध्येय आहे. झगमगाटापासून ते अलिप्त आहेत. माणसांना जोडण्याचे कार्य ते करतात. सत्तर वर्षांचे त्यांचे आयुष्य हे चालता-बोलता ’योग अनुभव’ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या