लेख – सण सोन्याचा

477

>> दिलीप जोशी  ([email protected])

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असं म्हटलं जातं. पाऊस ओसरल्यानंतर आणि शेतातली पिकं तरारून आल्यावर साजरा होणारा मराठी वर्षातला महत्त्वाचा सण. म्हणूनच या दिवशी आपट्याची पानं ‘सोनं’ म्हणून परस्परांना दिली जातात. आपले सगळेच सण निसर्गाशी नातं सांगणारे. हाच दिवस सीमोल्लंघनाचा. पावसाळा हा स्वतंत्र ऋतू असलेल्या आपल्या देशात सारे व्यवहार नव्या जोमाने सुरू करण्याचा. या वर्षी मात्र राज्यात आणि देशात कुठे दुष्काळ तर कुठे महापूर या नैसर्गिक संकटांनी कहर केला. त्यामुळे उत्साहात सण साजरा करताना त्याचंही भान ठेवणं, शक्य तितकी सहाय्य आपग्रस्तांना पोहोचवणं हा सोन्यासारखा विचार हे खरं वैचारिक सीमोल्लंघन ठरेल. अर्थात आधीच हजारो हात ते काम करू लागले आहेत. त्यांच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा असं अनेकांना वाटत असेल.

आपट्याच्या झाडाची पानं प्रतिकात्मक ‘सोनं’ म्हणून वाटताना त्यामागे सोन्यासारखा सदिच्छेचाच विचार असतो. या ‘मुहूर्ता’वर खरं सोनंही ऐपतीनुसार घेतलं जातं. एवढं महत्त्व या एकाच धातूला का याचा विचार केला तर सोन्याचं पृथ्वीवरचं दुर्मिळ अस्तित्व हे त्याचं पहिलं उत्तर आणि दुसरं म्हणजे त्याचे अद्वितीय गुणधर्म. सोनं गंजत नाही. मऊ सोन्याचे दागिने सहज घडवता येतात. विद्युत वहनासाठीसुद्धा सोनं चांगला धातू ठरतो, परंतु त्यासाठी तो परवडणारा नाही. सोन्याची झळाळी कायम राहते आणि त्यामध्ये औषधी गुणधर्मही असल्याचं आयुर्वेद सांगतो.

इतका गुणपंडित असलेल्या या धातूचा संग्रह करावा असं माणसाला प्राचीन काळापासून वाटलं नसतं तरच नवल. सोन्याचे दागदागिनेच नव्हे तर मोठी भांडी बनवण्यासाठीही वापर केला जायचा. मात्र अशी भांडी राजवाडय़ातच असायची. त्याच्या खाणाखुणा आजही जगभरच्या म्युझियममधून पाहायला मिळतात. जगाची लोकसंख्या अगदीच कमी होती तेव्हा सोन्याचा तुटवडा भासत नव्हता. आपला देश तर ‘सुवर्णभूमी’ म्हणूनच ओळखला जायचा. इथे ‘सोन्याचा धूर’ निघत असे असं म्हटलं जातं. या गोष्टी लाक्षणिक अर्थाने घेतल्या तरी सोनं हे इथल्या सुबत्तेचं प्रतीक होतं.

तेव्हापासून आजतागायत आपल्याच देशात नव्हे तर जगातही सोन्याची आस कमी झालेली नाही. आपल्याकडे दरवर्षी दागदागिन्यांसाठी टनावारी सोनं खर्ची पडतं. पाश्चात्य देशात या ‘यलो मेटल’पेक्षा हिऱयांना जास्त महत्त्व आहे. तरीसुद्धा तिथेही पूर्वापार ‘सोनं’ हे राष्ट्रीय समृद्धीचं लक्षण मानलं जातं. दोन देशांतील विनियमाचं चलन म्हणून एकेकाळी सोनंच असायचं. सोन्याच्या संचयावर देशाच्या अर्थकारणाचा अर्थ लावला जायचा. राजकोषात जेवढं सोनं जास्त तेवढं ते राज्य सधन असं गणित सर्वमान्य होतं. पुढे हे निकष विस्तारले तरी सोन्याचं महत्त्व कमी झालेलं नाही.

सर्व धातूंमध्ये सर्वाधिक न घनता अणुभार असलेल्या सोन्याने जगाला असं भारून टाकलेलं आहे. सोन्यापुढे सर्व काही फिकं पडतं असं म्हणायची पद्धत आहे. असं हे सोनं पृथ्वी जन्माला आली तेव्हाच निर्माण झालेलं आहे. त्यात कृत्रिमरीत्या वाढ करता येत नाही. त्यामुळे पृथ्वीवर असलेल्या सोन्याच्या खाणींमधून ते मिळवावं लागतं. हिंदुस्थानात दक्षिण भागातच कोलारची कर्नाटकातली खाण पूर्वी प्रसिद्ध होती. आता आपला देश सोनं मुख्यत्वे आयात करतो.

आज जरी सोन्याची दुर्मिळता जाणवत असली तरी पृथ्वी मूलतः सुवर्ण-समृद्ध आहे. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात विपूल असलेलं सोनं त्याच्या घनतेमुळे पृथ्वीच्या गाभ्याकडे खेचलं गेलं आणि ते दुर्मिळ झालं. आता जगात जे सोनं सापडलं ते प्रामुख्याने एकेकाळी पृथ्वीवर आदळलेल्या महापाषाणांमधून (अशनी) आलेलं आहे.

तसं ते आलं असण्याच्या शक्यतेला बळकटी देणारी एक गोष्ट म्हणजे मंगळ आणि गुरू यांच्यामध्ये उसळलेल्या अशनींच्या पट्टय़ात ‘सायकी-16’ नावाचा जो प्रचंड अशनी फिरतोय त्यात सोन्याचा भरपूर अंश आहे. 120 किलोमीटर व्यासाच्या या अंशनीतील सारं सोनं पृथ्वीवर आणता आलं तर पृथ्वीवरचा प्रत्येकजण अब्जाधीश होईल आणि दसऱयाला खरं सोनं वाटता येईल! आपल्या सुवर्ण गुणामुळे सोन्याचा हव्यास असलेल्या माणसाला ‘सायकी-16’ खुणावत असून 2022 मध्ये ‘नासा’चं शोध-यान (प्रोब) तिथे गेल्यानंतर तिथलं सोनं पृथ्वीवर आणता येणं कितपत शक्य आणि खर्चिक आहे याचा अंदाज येईल.

‘सोन्या’चा सण साजरा करताना हा आधुनिक माहिती रसप्रद वाटेल. तोपर्यंत आपण परस्परांना आपट्याच्या पानांचं प्रतिकात्मक सोनं देऊया. हे सदिच्छांचं ‘सोनं’ सर्वात महत्त्वाचं. त्याचबरोबर सद्विचार देणारं वैचारिक सीमोल्लंघनही!

आपली प्रतिक्रिया द्या