आभाळमाया : क्ष-किरणीय विश्वकप

86

> > वैश्विक ([email protected])

खगोलशास्त्रातील संशोधन अव्याहत सुरू असतं. तसं ते असायलाच हवं, कारण आपल्याला कितीही वाटलं की, आता विश्वाचा आवाका आपल्याला कळलाय, तरी ते काही खरं नव्हे. उलट, बरंच काही समजायचं राहून गेलंय ही जाणीव नव्या संशोधनाला उद्युक्त करते. अजूनपर्यंत आपल्याला आपल्या पृथ्वीचा पूर्णपणे शोध लागलेला नाही. नित्य नवे फॉसिल (जीवाष्म) किंवा घनदाट अरण्यातील नव्याने ओळख होणारे कीटक, प्राण वगैरेंचा शोध पूर्णत्वाला गेलेला नाही. कित्येक वनस्पती, समुद्री जीव आपल्याला आजही चकित करीत असतात. ही जर आपलं वस्तीस्थान असलेल्या पृथ्वीची कथा तर साऱ्या विश्वाचा धांडोळा साध्य झाल्याचं कसं म्हणणार? वैज्ञानिक तसं कधीच म्हणत नाहीत.

परंतु असं कितीतरी विस्मयकारी शोध रोज लागतायत. आता एका ताऱ्याभोवती फिरणारा एक नवा ग्रह संशोधकांना आढळलाय. हा उपग्रह नेपच्यूनपेक्षा लहान असला तरी पृथ्वीच्या तिप्पट आकाराचा आहे. त्यावर वातावरणही असून तो त्याच्या ताऱ्याभोवती अवघ्या दीड दिवसात फिरतो. मात्र त्याचा वेग इतका की वर्षभरात पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेवढं अंतर कापतो. पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग सेकंदाला सुमारे तीस किलोमीटर या हिशेबाने मिनीट, तास, दिवस आणि एक वर्षाचं अंतर कॅलक्युलेटरवर काढून बघा. शिवाय नेपच्यूनी डेझर्टमधल्या ग्रहांचं वस्तुमान पृथ्वीच्या वीस पट आहे आणि तापमान 1000 अंश सेल्सियस! ‘नेपच्युनियन डेझर्ट’ म्हणजे सूर्याव्यतिरिक्त एखाद्या ताऱ्याभोवती नेपच्यूनच्या आकाराचा ग्रह न सापडण्याची जागा. आजवर तिथे असा ग्रह दिसला नव्हता. त्याचा आता शोध लागलाय. एनजीटीएस 4 बी असं त्याचं तांत्रिक नाव आहे. हा ग्रह आतापर्यंत ठाऊक नसण्याचं कारण म्हणजे तो या परिसरात नुकताच म्हणजे 10 लाख वर्षांपूर्वी आला असावा. खगोल अभ्यासातील ही गणिती मांडणी विस्मयकारी असते.

एका बाजूला परताऱ्याभोवती भिरभिरणारा परग्रह सापडल्याचा आनंद साजरा करतानाच ‘नासा’च्या ‘न्यूटोनिअन स्टार इंटिरिअर कॉम्पोझिशन एक्सप्लोरर किंवा एनआयसीईआर या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील उपकरणाने संपूर्ण अवकाशाचा एक सुंदर फोटो प्रसिद्ध केलाय.

पल्सेलिंट स्टार्स किंवा पल्सार ताऱयांचा विस्फोट होणाऱ्या काळातील शिल्लक (लेफ्टओव्हर) क्ष-किरण यांचा नुसत्या डोळय़ांना न दिसणारा तेजस्वी गुंता असलेला हा फोटो म्हणजे एखाद्या सुंदर पेंटिंगसारखा वाटेल. त्यात ठिकठिकाणी तेजस्वी तारे आणि त्यांच्या जन्मकाळी घडलेल्या उत्पातातून विखुरलेल्या किरणांची मनोहारी नक्षी दिसतेय. ‘व्हिजिबल लाइट’ म्हणजे आपल्याला विश्वात सर्वत्र सहज दिसू शकणारा प्रकाश. मग तो सूर्याचा, इतर ताऱयांचा किंवा अगदी काजव्याचा का असेना नजरेत भरतो.

मात्र दृश्य किरणांपलीकडची अवकाशातील क्ष किंवा गॅमा किरणांसारखी किरणं त्याचा शोध घेणाऱ्या दुर्बिणींनाच दिसतात. नंतर त्याची दृश्य प्रतिमा बनवून आपण ती पाहू शकतो. अशाच प्रकारे तयार झालेलं ‘नासा’ प्रसारित हे विश्वरूप. एकूणच आपल्या विराट (परंतु मर्यादा ठाऊक असलेला) विश्वातील आपल्याला दिसू शकणारा भाग अवघा 4 टक्के. बाकीच्या 96 टक्के विश्वाचा वेध घेणाऱ्या एक्स-रे, गॅमारे दुर्बिणी अस्तित्वात आल्या आणि काळोखात दडलेली अज्ञात किरणं विशिष्ट प्रक्रियेनंतर आपल्याला दिसू लागली.

पृथ्वीभोवती 93 मिनिटांत ‘आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक’ पृथ्वीची परिक्रमा करत असतं. त्या काळात त्यावर अनेक प्रयोग सुरू असतात. काही वेळा संध्याकाळच्या आकाशात या ‘स्पेस स्टेशन’चं सरकत्या तेजस्वी ठिपक्यासारखं दर्शन घडतं. आमच्या आकाशदर्शन कार्यक्रमात आम्ही अनेक उपग्रह आणि अवकाश स्टेशनसारख्या कृत्रिम वस्तू प्रेक्षकांना दाखवतो. सूर्यास्तानंतर थोडा वेळच त्या दिसतात. आता पावसाळा आल्याने आकाशदर्शनाचा आनंद चार-पाच महिने थांबणार. परंतु अवकाशातील हबल किंवा स्पेस स्टेशनवरचे कृत्रिम डोळे आपल्याला विश्वरूप दाखवत राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या