
>> दिलीप जोशी
वास्तविक सध्याचे दिवस म्हणजे रात्री निरभ्र आकाशातील हजारो ताऱयांची चमचमणारी सृष्टी न्याहाळण्याचे आणि त्यांचं दुर्बिणीद्वारे दर्शन घेण्याचे आहेत. अनेक अवकाशस्थ वस्तूंची छायाचित्रंही निष्णात अॅस्ट्रोफोटोग्राफर घेऊ शकतात, पण… हा ‘पण’ कोरोनाने निर्माण केलाय हे काही नवीन नाही. आमचा गेल्या वेळचा आकाशदर्शनाचा मोसम ‘कोरोना’ने अर्धा खाल्ला. 21 फेब्रुवारीचं रात्रभराचं आकाशदर्शन उत्तम झालं आणि पुन्हा 21 मार्चच्या आकाशदर्शनाची तयारी सुरू असताना लॉक डाऊनच्या बातम्या येतच होत्या. 22 मार्चपासून सारंच स्थिरावलं. निदान यावेळी तरी विश्वरूप दर्शन घेण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं, परंतु ती शक्यताही धूसर दिसते.
घरातल्या खिडकीतून किंवा ‘कोरोना’ बाबतची मास्क, फिजिकल डिस्टन्स वगैरे पथ्यं काटेकोरपणे पाळून काहींनी थोडं अवकाश पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मर्यादितच होता. शेवटी या सर्व विषयांवर ‘ऑनलाइन चर्चा’, वैज्ञानिक माहितीची देवाण-घेवाण असेही उपक्रम सुरू झाले. येत्या मार्चमध्ये त्याला वर्ष होईल. आता पुन्हा रात्रभराचे कार्यक्रम सुरू करण्याइतपत मोकळं आणि आरोग्यसंपन्न वातावरण कधी निर्माण होतं पाहायचं.
‘कोरोना’ काळामुळेच 21 जूनच्या उत्तर हिंदुस्थानातून दिसणाऱया ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहणाच्या कार्यक्रमाला ‘ग्रहण’ लागलं. अशी संधी आपल्याकडे आता अनेक वर्षांत येणार नाही. चंद्र-सूर्य यांचं दर्शन मात्र कुठूनही सहज होऊ शकतं. त्यापैकी चंद्र नुसत्या डोळ्यांनी पाहता येतो, पण सूर्याकडे तसं पाहणं धोकादायक. त्यासाठी खास सोलर फिल्टर हवं. सध्या मंगळ, गुरू, शनी मात्र संध्याकाळच्या आणि शुक्र पहाटेच्या आकाशात छान दिसतोय.
सूर्याचं चार महिने मेघाच्छादित वास्तव्य संपून आता तो चांगलं ऊन देतोय. थंडीचा मोसम असल्याने आणि सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धावर तळपत असल्याने आपल्याकडची उन्हं जरा सुखद आहेत. खरं तर या काळात पृथ्वी सूर्याच्या जवळ असते. त्यामुळे दक्षिण गोलार्धातला उन्हाळा आपल्यापेक्षा कडक असतो. 21 डिसेंबरनंतर सूर्याचं ‘उत्तरायण’ सुरू होईल. त्या दिवशी सायंकाळच्या आकाशात होणाऱया दोन ग्रहांच्या युतीविषयी नंतरच्या लेखात वाचूया.
आता मात्र सूर्यावर दिसणाऱया एका मोठय़ा डागाविषयी पाहू. संत ज्ञानेश्वरांनी सज्जनांचं वर्णन करताना ‘चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन’ असं म्हटलंय. चंद्राच्या पृष्ठभागावरच्या खड्डय़ांची कल्पना नव्हती, त्या काळात चंद्रावर ‘डाग’ आहेत असं वाटलं. साहजिकच होतं. मार्तंड ऊर्फ सूर्य ‘तापदायक’ आहे हे मात्र सत्यच आहे. त्या ‘तेजोनिधी’वर काळे डाग असू शकतात हे असं आश्चर्यकारक निरीक्षण ग्रीक खगोल अभ्यासक थिओफ्रेटस यांनी 2400 वर्षांपूर्वीच नोंदलं होतं. दुर्बिणीचा वापर वाढल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झालं.
सूर्याच्या गाभ्यातील तापमान सुमारे 105 कोटी सेल्सियस इतपं तर त्याच्या पृष्ठभागावरील (पह्टोस्फीअर) तापमान सरासरी 6000 सेल्सियस इतपं असतं. मात्र सूर्यावरील मॅग्नेटिक प्रक्रियेमुळे पृष्ठभागावरच्या काही भागाचं तापमान कमी होतं. ते काही काळच टिकतं, परंतु त्या काळात तेवढा भाग आपल्या काळ्या डागासारखा दिसतो. थोडक्यात सूर्यावरचा काळा डाग म्हणजे तेथील कमी तापमानाची जागा. अर्थात ‘कमी’ म्हटलं तरी ते तापमानसुद्धा 3000 अंश सेल्सियस इतपं असतंच. याचा अर्थ ‘काळ्या’ सौर डागांमधली उष्णताही प्रचंड असते (सूर्याच्या गाभ्यातील ‘न्यूट्रिनो’चा शोध लावणारे मासातोशी कोशिबा यांचं नुकतंच निधन झालं).
सध्या दिसणाऱया मोठय़ा म्हणजे आकाराने पृथ्वीपेक्षाही 10 पट मोठय़ा असलेल्या सौर डागांचे फोटो खगोल मंडळाचे समीर ठापूर यांनी पॅनडातील घराजवळूनच घेतले आहेत. एरवी यासाठी आम्हाला दिवसाचा कार्यक्रम ठेवता आला असता. इथे एक सूचना अशी की, नुसत्या डोळ्यांनी हे डाग दिसत नाहीत. तेव्हा सोलर फिल्टर नसताना सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न बिलकूल करू नका. या ‘डागांची’ वैज्ञानिक माहिती तेवढी लक्षात ठेवा.
सौर डांगांचं म्हणजे सूर्यावरच्या ‘मॅग्नेटिक ऑक्टिव्हिटी’चं चक्र 11 किंवा 12 वर्षांचं असतं. त्या काळात अभ्यासकांना आपल्या जनक ताऱयाचा चांगला अभ्यास करता येतो. दोन वर्षांपूर्वी अशा सौर डागांचं दर्शन आम्ही लोकांना दुर्बिणीतून डागांची प्रतिमा शुभ्र कागदावर घेऊन घडवलं होतं. पुन्हा केव्हातरी मोकळ्या वातावरणात अशी संधी येईलच. सूर्याचं वय आणखी 5 अब्ज वर्षे बाकी आहे! पृथ्वीही (आपण अबाधित ठेवली तर) बराच काळ त्याच्या भोवती फिरणार आहे. तेव्हा आपल्या दृष्टीने काळ अनंत आणि विश्व अफाट आहे. थोडी प्रतीक्षा करावी लागेल इतकेच.




























































