>> विजय पांढरीपांडे
सुनीता विल्यम्सच्या यानाचा बिघाड अन् त्यातून उद्भवणारी गंभीर समस्या खरे तर हिमनगाचे एक लहानसे टोक आहे. अशी अनेक घातक संशोधने आता रोज जन्माला येत आहेत. पुढे वेगाने येणार आहेत. त्याचा बरा–वाईट परिणाम लहान–मोठय़ा, गरीब–श्रीमंत सर्व राष्ट्रांना भोगावा लागणार आहे. तेव्हा सुजाण, विद्वान, प्रामाणिक शास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी एकत्र बसून यावर नीरक्षीर विवेकाने जास्त वेळ न दवडता तोडगा काढायला हवा. विश्व कल्याणासाठी हे गरजेचे आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची गती एकीकडे माणसाला थक्क करणारी आहे, तर दुसरीकडे ती चिंता वाढवणारीदेखील आहे. त्यात अनेक नैतिक, सामाजिक, न्यायिक प्रश्न गुंतलेले आहेत. सुनीता विल्यम्स अन् बॅरी विल्मोर हे दोन अंतराळ तज्ञ गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडले आहेत. त्यांची परतण्याची वेळ टळून गेली तरी यानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते आता कधी परततील, परत येतील की नाही हे सांगणे कठीण आहे. या प्रयोगाचे जनक नासा, बोइंग या संस्थांना व तेथील तंत्रज्ञानांनादेखील याविषयी निश्चित काही सांगता येत नाही किंवा माहिती असले तरी ते उघड करता येत नाही.
अशा वैज्ञानिक प्रयोगाची उद्दिष्टे कितीही चांगली असली, भविष्याच्या दृष्टीने हितकारक असली तरी त्यात गर्भित असलेली रिस्क अतिशय गंभीर आहे. या अन् अशा प्रकारच्या वैज्ञानिक प्रयोगात तंत्रज्ञ, वैज्ञानिक स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत असतात. स्फोटके, अणुऊर्जा, न्युक्लिअर शस्त्रे अशा संशोधन व उत्पादन क्षेत्रात काम करणारे अनेक तंत्रज्ञ, वैज्ञानिक, कर्मचारी प्रसंगी प्राण पणाला लावून सहभागी होत असतात. हे काम करण्यास त्यांची सहमती असली, तो त्यांचा व्यवसायाचा व पोटापाण्याचा उद्योग असला तरी यात गृहीत असलेली प्राणाची रिस्क लक्षात घेता कायद्याच्या दृष्टीने हे कितपत योग्य आहे हे तपासले पाहिजे.
आत्महत्या हा गुन्हा समजला जातो. जाणूनबुजून एखाद्याला मृत्यूच्या खाईत ढकलणे हे त्याचा जाणीवपूर्वक जीव घेण्यासारखेच आहे. हा अधिकार या संशोधन संस्थांना कुणी दिला? यानात जाण्यापूर्वी सुनीता अन् तिच्या सहकाऱ्यांनी संमतीपत्र दिलेही असेल. पण त्यांच्या कुटुंबांना, जवळच्या नातेवाईकांना सारे काही (जीवघेणी रिस्क) माहिती होते का? आपण शस्त्रक्रियेपूर्वी दवाखान्यात एक फॉर्म सही करून देतो. शंभर टक्के लोक न वाचताच सही करतात. ती वेळ, परिस्थितीच तशी असते. पण तीदेखील एक प्रकारची फसवणूकच असते. जीव गेला तर डॉक्टर, हॉस्पिटल त्यास जबाबदार नाहीत हे त्यात आपण लिहून दिलेले असते. शस्त्रक्रियेच्या चांगल्या, वाईट परिणामाला डॉक्टर, हॉस्पिटल नाही तर कोण जबाबदार असणार?
वैज्ञानिक प्रयोगात प्रयोग करताना काय परिणाम होईल हे निश्चित कुणीच काही सांगू शकत नाही. आपण अनेक इंजेक्शन, गोळय़ा घेतो डॉक्टरच्या सल्ल्याने. प्रत्येक डॉक्टर त्याच्या बऱ्या-वाईट परिणामाची, साईड इफेक्टची कल्पना देतातच असे नाही. मेडिसिन्स, लसी तयार करताना आधी प्राण्यांवर, मग माणसांवर प्रयोग केले जातात. तिथेही परिणामाची कल्पना, खात्री नसते. अनेक जण चक्क पैशांसाठी रिस्क घ्यायला अशा प्रयोगांसाठी तयार होतात.
आता तर इन्फो, बायो, नॅनो अन् संगणक हे तंत्रज्ञान परस्परात इतके मिसळले आहे की, त्यापोटी आपण कल्पनाही करू शकणार नाही असे संशोधन जन्माला येते आहे. हवी तशी संतती निर्माण करणे, विचार भावनाशी खेळणे, शस्त्र न वापरता युद्धसंहार करणे, माणसाच्या आत शिरून त्याचा शोध घेत त्यावर पूर्ण बाह्य नियंत्रण मिळवणे असे अनेक चमत्कारिक शोध उघडपणे, गुप्तपणे सुरू आहेत. यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग याची जोड मिळाल्याने अभूतपूर्व क्रांती होऊ घातली आहे.
आतापर्यंतचे सर्व शोध हे मानव नियंत्रित होते. म्हणजे आपण प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. यावर काय प्रिंट करायचे हे आपल्या हातात आहे. ही मशीन स्वतः पुस्तके लिहीत नाही. आपण बॉम्बचा शोध लावला. हा बॉम्ब कुठे टाकायचा हे आपण म्हणजे मानव ठरवीत होता. एआय अन् मशीन लर्निंगमुळे पुढचा चमत्कारिक, गंभीर टप्पा गाठला आहे. आता हे नियंत्रण आपल्याकडे न राहता मशीनच्या हातात गेले. आता एआयचे अल्गोरिथम स्वतःहून बदलेल. स्वतःहून निर्णय घेईल. ते निर्णय आपल्यासाठी हितकारक असतील, योग्य असतील, न्याय्य असतील याची खात्री नाही आहे. ते निर्णय संहारक असू शकतील, भयंकर विनाशकारी असू शकतील.
मग या विनाशाची, मनुष्यहानीची, निसर्गहानीची, असुंतलनाची नैतिक जबाबदारी कुणाची? इथे एका संस्थेचा, एका राष्ट्राचा प्रश्न उरत नाही. याचा परिणाम विश्वव्यापी असू शकतो. म्हणूनच या आधुनिक संशोधनाकडे, तंत्रज्ञानाच्या घोडदौड प्रगतीकडे सर्व देशांनी एकत्रितपणे, गांभीर्याने पाहिले पाहिजे. प्रत्येक देशाला, संशोधकाला ज्ञान विस्ताराचे स्वातंत्र्य आहे हे खरे. पण या संशोधनाचे अनैतिक नंग्या नाचात रूपांतर होणार असेल तर तो विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रामुख्याने, गांभीर्याने चर्चिला पाहिजे.
सुनीता विल्यम्सच्या यानाचा बिघाड अन् त्यातून उद्भवणारी गंभीर समस्या खरे तर हिमनगाचे एक लहानसे टोक आहे. अशी अनेक घातक संशोधने आता रोज जन्माला येत आहेत. पुढे वेगाने येणार आहेत. त्याचा बरा-वाईट परिणाम लहान-मोठय़ा, गरीब-श्रीमंत सर्व राष्ट्रांना भोगावा लागणार आहे. तेव्हा सुजाण, विद्वान, प्रामाणिक शास्त्रज्ञांनी, राज्यकर्त्यांनी एकत्र बसून यावर नीरक्षीर विवेकाने जास्त वेळ न दवडता तोडगा काढायला हवा. विश्व कल्याणासाठी हे प्राथमिक गरजेचे आहे. कोणत्याही संशोधनाचे, नवीन तंत्रज्ञानाचे भविष्यकालीन परिणाम, त्याचा मानवी मूल्याशी असणारा संबंध, त्यातून उद्भवणारे नैतिक, कायदेशीर प्रश्न हे सखोल तपासल्या नंतरच अशा संशोधनाला हिरवा झेंडा दाखवावा, परवानगी द्यावी. यासाठी जागतिक स्तरावर जागतिक न्यायालयासारखी वैज्ञानिक संस्था हवी सर्व देशांचे प्रतिनिधी असलेली. ते निर्णय, नियम सर्व देशांतील वैज्ञानिक संशोधकांना, तंत्रज्ञानांना, संस्थांना बंधनकारक असावेत.
आता संहार केवळ देशाच्या सीमेवरील रणभूमीपुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाने हे क्षेत्र चोहीकडे विस्तारले आहे. ही धोक्याची घंटा वेळीच ओळखलेली बरी. नाहीतर माणसाच्या हातात काहीच उरणार नाही नियंत्रित करण्यासाठी!