
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
विसंवादाची समस्या सध्याच्या घडीला अनेक जोडप्यांमध्ये दिसून येत आहे. करीअर सांभाळण्याच्या नादात तरुण जोडपी ‘कुटुंबसंस्था मॅनेजमेंट’मध्ये अगदीच काठावर पास होत आहेत. स्पेस, वर्क लाइफ बॅलन्स आणि संसार या गोष्टी सांभाळायच्या असतील तर एकमेकांमध्ये संवाद, पारदर्शकता असावी व त्यात तर्काचा अभाव असावा. पण जोडप्यांच्या हे लक्षात येत नाही की, नात्याला आधी समर्पणाची गरज असते. आहुतीची नाही. या दोन शब्दांमध्ये गल्लत झाली की, आयुष्यभर ही झळ सोसावी लागते.
‘‘तुला का समजत नाहीये सोनाली? मला तुझी गरज आहे ते आणि तू फक्त दुनियादारी करत बस. तुझ्या नवऱयाला तुझी जास्त गरज आहे ते तुला कळणार कधी?’’ तेजस (दोघांची नावे बदलली आहेत) तावातावाने सत्रामध्ये सोनालीशी बोलत होता आणि सोनाली शांतपणे कुठलीही प्रतिक्रिया चेहऱयावर न दाखवता शांत बसली होती. “बघावं तेव्हा ही समाजसेवा करत बसेल, पण घराकडे थोडं बघितलं तर घरालाही बरं वाटेल.’’ तेजस न थांबता सोनालीबद्दल बोलतच होता. त्याने तिच्या घरात लक्ष न देण्याची बरीच कारणे सांगितली. ज्यामध्ये त्याने मुख्य कारण मोबाईल असल्याचे सांगितले.
“झालंय तुझं बोलून आणि माझी नालस्ती करून?’’ सरतेशेवटी सोनाली पुन्हा कमालीच्या शांत स्वरात म्हणाली. तेजस गप्प बसला. त्याच्या चेहऱयावरचा राग कमी झालेला नव्हताच.
सोनाली आणि तेजस ही दोघेही त्यांच्या वैयक्तिक व विवाह समुपदेशनासाठी येत होती. त्या दोघांच्या वैवाहिक जीवनावर गेले वर्षभर ताणतणाव होता, ज्याचा परिणाम त्यांच्या कामजीवनावरही झाला होता. त्यामुळे दोघेही वेगळे होण्याचा विचार करत होते. पण दोघांनाही माहीत होते की, एकमेकांपासून वेगळे होणे हा पर्याय नव्हता तर ती पळवाट ठरली असती आणि सोनाली या सगळ्याला तयार नव्हती. म्हणून त्या दोघांनीही समुपदेशनाचा मार्ग पत्करला.
दोघांमधली मुख्य समस्या होती ती म्हणजे ‘एकमेकांबद्दलचा पराकोटीचा गैरसमज.’ हा गैरसमज होण्यामागचीही कारणे बरीच होती. ऑफिसच्या व्यग्र वेळामुळे दोघेही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते. त्या दोघांनाही स्वतची स्पेसही तितकीच महत्त्वाची वाटत होती आणि त्यातल्या त्यात विशेषत सोनालीला. म्हणून ती ऑफिसमधून घरी आली की, मोबाइलवर वेब सीरिज बघायची. नंतर थोडा वेळ पुन्हा मेल्स चेक करून रात्रीच्या जेवणाला लागायची. तोपर्यंत तेजस घरी यायचा.
‘ऑफिस आणि घर वेगळं ठेवायचं’ या मताचा तो असल्याने ऑफिसमध्ये थोडे उशिरा थांबून, सगळी कामे करून तो घरी रिलॅक्स मूडमध्ये यायचा. तेव्हा सोनालीचा पुन्हा ‘स्पेस टाइम’ सुरू व्हायचा.
“मी तेजसबाबतीत स्वतला अॅडजस्ट करून घेतलं आहे मॅम. तो वर्कोहोलिक आहे. मला वर्कलाइफ बॅलन्स ठेवायला आवडतं. त्यामुळे मी घरीही ऑफिसचं काम करते आणि हा येईपर्यंत स्वतला निरनिराळ्या गोष्टींमध्ये अडकवून घेते व आता हेच याला पटत नाही. पण त्याला हे लक्षात येत नाहीये की, जेव्हा तो ऑफिसच्या कामात भरपूर बिझी असतो तेव्हा रात्री अकरा वाजेपर्यंत मी एकटीच असते. आता थोडा लवकर येतो तेव्हा मी त्याला त्याच्यासाठी अव्हेलेबल नसते तेव्हा याची चिडचिड होते.’’ सोनालीने मूळ मुद्दय़ाला हात घातला.
वास्तविक पाहता, दोघेही स्वकेंद्रित होते. म्हणूनच त्यांच्यामध्ये ‘अहं’ होता आणि तोच त्यांच्या नात्याला सुरुंग लावत होता. सोनालीने वर्कलाइफ बॅलन्सच्या गोंडस नावाखाली स्वतची एक जगण्याची चौकट आखून घेतली होती. ज्यामध्ये तिच्या आवडीनिवडी यांना तिने प्राधान्य दिले होते. तेजसला आपल्यासाठी वेळच नाही हेही ती ठरवून मोकळी झाली होती. दुसरीकडे तेजस महत्त्वाकांक्षी होता आणि घर ऑफिस वेगळे ठेवण्याच्या नादात तो ऑफिसला प्राधान्य देऊन मोकळा झाला होता. पण त्याचा मूळ स्वभाव हा परफेक्शनिस्ट असल्याने घरी आल्यावर घर आणि घरातल्या गोष्टी असा काहीसा अवास्तविक आडाखा बांधून तो वागायचा. त्यामुळे घरी आल्यावर त्याला सोनालीचे
ऑफिसच्या कामांमध्ये राहणे किंवा तिचे सामाजिक काम करणे पटत नव्हते.
“हो, मी बाहेर असताना तिने ही सगळी कामं करावीत. मी घरी आल्यावर आमचा वेळ आम्हाला मिळायला हवा.’’ असं एका सत्रात तो म्हणून गेला.
‘‘मी घरी आल्यावर म्हणजे काय?’’ असा प्रश्न त्याला करताच थोडा तो चपापला. ‘‘म्हणजे घर आणि ऑफिस हे वेगळं ठेवायला नको का मॅम? ही घरीही ऑफिसचे मेल्स बघत बसली तर काय अर्थ होतो?’’ असं बोलताना तेजस थोडा अडखळला आणि सोनाली गालातल्या गालात हसली.
‘‘अरे पण तू ओव्हरटाइम करतो आहेस. म्हणजेच घरासाठी द्यायचा वेळ तूही ऑफिससाठी वापरतोच आहेस ना?’’ हे वाक्य कुठेतरी त्याला लागले आणि तो एकदम गप्प झाला. ‘‘हेच मी त्याला समजावलं होतं मॅम, पण याचा इगो काही मान्य करत नव्हता. शेवटी मी त्याला एंटरटेन करणं बंद केलं.’’ सोनाली पुन्हा मध्ये बोलली. ‘‘अगं पण मी जमेल तेव्हा तुला वेळ द्यायचा प्रयत्न करतोच ना.’’ तेजसने असं म्हणताच ती पुन्हा हसली. “तुम्हाला दोघांनाही असं वाटत नाही का की, हे विसंवादावर बोलणं सुरू झालं आहे ते?’’ असे म्हणताच दोघांनीही मान डोलावली.
विसंवाद हा फक्त तेजस आणि सोनाली या जोडप्यापुरताच मर्यादित नाहीये, तर माझ्याकडे येणाऱया प्रत्येक जोडप्यामध्ये हा प्रश्न यक्षप्रश्न बनून राहिला आहे. आताच्या करीअर सांभाळण्याच्या नादात तरुण जोडपी ‘कुटुंबसंस्था
मॅनेजमेंट’मध्ये अगदीच काठावर पास होत आहेत. कित्येकांना तर आपला पार्टनर आज कसा आहे ही साधी चौकशीही करता येत नाही हे सत्य आहे. आज बऱयाचशा जोडप्यांमध्ये ‘तू तुझं मी माझं’ हा फंडा जास्त चालला आहे आणि कुटुंब व्यवस्था जर आपल्याला टिकवायची असेल तर हा फंडा सगळ्यात घातक आहे. आज समुपदेशनाला आलेल्या बऱयाच जोडप्यांना एकमेकांच्या गोष्टी माहीत नसतात आणि ही जोडपी एकमेकांची तेवढी जबाबदारी उचलताना दिसत नाहीत. ‘तिचं ती बघून घेईल. मी त्यात ढवळाढवळ केलेली तिला आवडणार नाही कदाचित’ हे सरसकट निदान मनाशी आखून संसार केला जात आहे. तो टिकणार कसा?
दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं एकत्र येऊन संसार करतात आणि त्या वेळी भांडणं होणारच. हे वास्तव आहेच, पण या सर्वात ही भांडणं कधी टोकाला पोहोचतात याचा विचार केला जात नाही. मग कधीतरी जोडीदाराची गरज लागते तेव्हा एकमेकांबद्दलच्या अपेक्षा अवास्तव होऊन जातात आणि मग अहं दुखावतो, पण जोडप्यांच्या हे लक्षात येत नाही की नात्याला आधी समर्पणाची गरज असते. आहुतीची नाही. या दोन शब्दांमध्ये गल्लत झाली की, आयुष्यभर ही झळ सोसावी लागते.
सुदैवाने तेजस आणि सोनाली योग्य वेळी आले आणि महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांनाही एकमेकांच्या साथीने राहायचे होते. त्यामुळे दोघांवरही काम करणे सोपे होत होते. स्पेस, वर्क लाइफ बॅलन्स आणि संसार या गोष्टी सांभाळायच्या असतील तर एकमेकांमध्ये संवाद, पारदर्शकता ज्यात तर्काचा अभाव असला पाहिजे या मुद्दय़ांवर समजावले गेले. तसेच सोनालीला जास्तीत जास्त बोलते होण्यास सांगितले गेले, ज्यायोगे तेजसला गैरसमज होणार नाहीत. दोघेही स्वतवर आणि एकमेकांसाठी या सांगितलेल्या गोष्टी कटाक्षाने पाळत आहेत. मागच्या सत्रात तेजसने हेही आवर्जून सांगितले आहे की, ती दोघेही सध्या दोघांचे तीन होण्याचा विचार करत आहेत.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)