
>> डॉ. ऋतू सारस्वत
मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच कुटुंबाचे अस्तित्व राहिलेले आहे. मात्र त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्याच वेळी ज्या संस्कृतीने कुटुंब व्यवस्था किंवा विचार नाकारण्याचा प्रयत्न केला, ती संस्कृती अस्तंगत झाल्याचे दिसून आले. रोमन संस्कृतीचे पतन होण्यास कुटुंब व्यवस्था इतिहासजमा होणे हे एक महत्त्वाचे कारण मानले गेले आहे. कुटुंबाचा मूळ आधार सामजंस्य, समर्पण, त्याग, जबाबदारी, कर्तव्य असताना वर्तमान काळात ‘हम आप के है कोन’ या श्रेणीत कुटुंबे येत आहेत. परिणामी कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत आहे. भविष्यात त्याचे परिणाम आणखी घातक होऊ शकतात.
आपल्या कुटुंबाला कुरुक्षेत्राचे रूप देऊन बाहेरच्या जगात प्रेम शोधण्यासाठी बाहेर पडतो. या मृगजळाचा शेवट नैराश्य आणि हतबलतेत होतो. आनंदी कुटुंब हे कोणत्याही व्यक्तीसाठी जीवनरेषेप्रमाणे काम करते, परंतु ती आपोआप तयार होत नाही, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. लिओ टॉलस्टॉय यांनी आपल्या पुस्तकात ‘आना करेनिना’मध्ये म्हटल्यानुसार, सर्व आनंदी कुटुंबे एकसारखी असतात, पण प्रत्येक दुःखी कुटुंब हे त्याच्या पद्धतीने दुःखी असते. आनंदी कुटुंबात बऱयाच गोष्टीत साम्य असते. एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांना वेळ देणे, सहकार्य, मदत, पाठिंबा, प्रोत्साहन, प्रेम, मान्यता आणि जबाबदारी या केवळ कृती नसून कुटुंब एकसंध राखणारे बंध आहेत.
कुटुंबप्रधान चित्रपट पाहताना सर्वांनाच मनस्वी समाधान लाभते. आईवडील, आजी-आजोबा, काका-काकू, भावंडे एकत्र खेळताना, बागडताना पाहून आपल्या घरीदेखील असेच वातावरण असावे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. दुर्दैवाने आपण घरातील चित्र पडद्यावर पाहतो खरे, परंतु प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न होतातच असे नाही. संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आणि विभक्त कुटुंबाकडून आता एकल कुटुंबाकडे होणारी समाजाची वाटचाल ही चिंताजनक आहेच. शिवाय संस्कृतीचा पायादेखील अस्थिर करणारी आहे.
‘कुटुंब’ हा नावाप्रमाणेच संपूर्ण शब्द असून या संस्थेवर विश्वास ठेवणारा आणि त्याचे अस्तित्व मान्य करणारी प्रत्येक व्यक्ती यास आकार आणि पूर्णत्व देण्यास सक्षम असते. जगातील कानाकोपऱयात असणारी कुटुंबाची संकल्पना हा समाजाचा पाया समजला जातो. ही संस्था एखाद्या प्राथमिक संस्थेप्रमाणे काम करत असते. या माध्यमातून परंपरा, प्रथा, मूल्य, सांस्कृतिक चालीरीती यांची ओळख, देवाणघेवाण एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे हस्तांतरित होत असते. अर्थात कुटुंबातर्गत व्यवस्था, भूमिका, अपेक्षांचा स्तर वेगवेगळा राहू शकतो आणि तो बहुतांश वेळा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक घटकांवर आधारित असतो.
भूतकाळाचे अवलोकन केल्यास मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच कुटुंबाचे अस्तित्व राहिलेले आहे. मात्र त्याच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्याच वेळी ज्या संस्कृतीने कुटुंब व्यवस्था किंवा विचार नाकारण्याचा प्रयत्न केला, ती संस्कृती अस्तंगत झाल्याचे दिसून आले. रोमन संस्कृतीचे पतन होण्यास कुटुंब व्यवस्था इतिहासजमा होणे हे एक महत्त्वाचे कारण मानले गेले आहे.
प्रसिद्ध तत्त्ववेत्ते सेनेका यांनी रोमन संस्कृतीचे पतन होण्यापूर्वी दिलेला इशारा गंभीर होता. कुटुंब मोडकळीस आल्यास रोमन साम्राज्याचा ऱहास होईल, असे त्यांनी म्हटले होते. सेनेका यांच्या मते, कोणत्याही देशाची शक्ती ही देशातील कौटुंबिक व्यवस्थेच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. कुटुंब ही एक मजबूत आधारशिला असून त्यावर देशरूपी संसार उभा राहतो. फिलिप व्हॅन नेस मायर्स यांनी पुस्तक ‘रोमन ः इट्स राइज अँड फॉल’मध्ये म्हटल्यानुसार, रोमन समाजाचा आधार कुटुंब होता आणि तेच त्याचे मूळ होते, परंतु त्याची शकले उडाल्याने रोमन संस्कृतीचे पतन होण्यास सुरुवात झाली. मायर्स म्हणतात, चांगल्या कुटुंबात मोठय़ा होणाऱया मुलांना हक्काची आणि कर्तव्याची जाणीव असते. स्वाभाविकपणे आपोआप कायद्याचे पालन होते आणि ते सुजाण नागरिक होतात, परंतु यानिमित्ताने एक प्रश्न निर्माण होतो. खंबीर कुटुंब खंबीर देश होण्यास कशा प्रकारचे योगदान देऊ शकतो? याचे उत्तर मायर्स यांच्या पुस्तकातच मिळू शकते. ते म्हणतात, कुटुंबात आईवडिलांच्या अधिकारांची जोपासना केल्याने रोमन जनतेने आदेश कसे द्यायचे, आज्ञा कशी पाळायची याची शिकवण मिळाली. बुद्धिमत्ता, संयम आणि न्यायाच्या आधारे हक्काचा वापर कसा करायचा, याची शिकवण कुटुंब संस्थेतून मिळाली, पण आज कुटुंबाच्या अस्तित्वावरच गंडांतर आल्याने रोमन संस्कृती स्वतःच लुप्त झाली. भारतात कौटुंबिक परंपरा ही नेहमीच पूजनीय आणि अनुकरणीय राहिली आहे, परंतु आजची परिस्थिती पाहता स्नेह आणि त्याग भावना ही कुटुंबाचे संरक्षण करते असे आपण अभिमानाने म्हणू शकतो का? किंवा आत्मचिंतन करायला हवे का?
सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2025 मध्ये मेसमतोलादेवी विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य आणि अन्य या प्रकरणात निकाल देताना म्हटले, भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मान्य करतो. संपूर्ण विश्व हे एकच कुटुंब आहे, परंतु आज आपण स्वतःचेच कुटुंब वाचविण्यासाठी संघर्ष करत आहोत. तेव्हा अशा वेळी जगाचा विचार करणे तर दूरच, कुटुंब ही संकल्पना कमकुवत ठरत आहे. परिणामी एक व्यक्ती एक ‘कुटुंब’ हे मॉडेल नावारूपास येत आहे. ते मॉडेल ऐक्य, परंपरा, प्रथा या मूल्यापासून दूर नेणारे असून तो एक चिंताजनक बदल मानला जात आहे.
औद्योगिकीकरणामुळे भारतीय कुटुंबावर परिणाम झाल्याचे मान्य आहे. संयुक्त कुटुंबाची परंपरा आता कमी झाली आहे अणि विभक्त कुटुंबाची संख्या वाढली आहे. एवढेच नाही तर सिंगल पॅरेंट फॅमिलीचे प्रस्थदेखील वाढले आहे. वास्तविक कुटुंबाचा मूलभूत आधार परस्पर अवलंबित्व आहे. म्हणजेच आपल्या जैविक, भावनिक आणि आर्थिक गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून असणे, परंतु अशा प्रकारचे अवलंबित्व हे तथाकथित आधुनिक विचारांशी मेळ घालणारे नाही.
सशक्तीकरणाचा नवा धडा हा नात्यांपेक्षा सरस ठरत आहे आणि तो स्वतंत्र आणि खासगीपणाला अधिक महत्त्व देतो. कुटुंबाचा मूळ आधार सामजंस्य, समर्पण, त्याग, जबाबदारी, कर्तव्य असताना आता ‘हम आप के है कोन’ या श्रेणीत कुटुंबे येत आहेत. परिणामी कुटुंब व्यवस्था मोडकळीस येत आहे. भविष्यात त्याचे परिणाम आणखी घातक होऊ शकतात. जोनाह गोल्डबर्ग यांनी आपल्या पुस्तकात ‘सुसाईड ऑफ द वेस्टः हाऊ द रीबर्थ ऑफ ट्रायबिलझम, पॉप्युलिझम, नॅशलिझम अँड आयडेंटी पॉलिटिक्स इज डिस्ट्राईंग अमेरिकन डेमोक्रॅसी’मध्ये म्हटल्यानुसार पश्चिम संस्कृतीचे पतन होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुटुंब व्यवस्था नसणे. गोल्डबर्ग म्हणतात, आयुष्यातील पहिले धडे कुटुंबातच शिकवले जातात. नीतिमत्तेचे पाठ दिले जातात आणि त्यानंतर औपचारिक शिक्षणाची ओळख करून दिली जाते, पण जेव्हा हीच व्यवस्था डळमळीत होऊ लागते तेव्हा लोक वास्तविक जगापेक्षा वेगळय़ा आभासी जगात स्वतःचा संसार शोधू लागतात आणि तेथूनच त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागतात. कुटुंबाला कोणताही सक्षम अन्य पर्याय नाही. सर्व काही ‘अहं’पणाभोवती घुटमळत आहे आणि अशा वेळी आपले प्रत्येक काम महत्त्वाचे आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचे काम कमी दर्जाचे आणि त्याची प्रतिक्रियादेखील अमान्य केली जाऊ लागते.
या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. गेल्या काही वर्षांत कुटुंबाचे आर्थिक स्वावलंबन वाढविण्यासाठी महिला अर्थार्जन करत आहेत, परंतु त्यांच्या बदललेल्या भूमिकेला कुटुंबातील अन्य सदस्यांचे पाठबळ मिळत नसल्याचे कटुसत्य आहे. सूर्य उगविण्यापूर्वी घरात काम करणे, ऑफिसला जाणे, घरी आल्यावर जेवण तयार करणे या सर्व जबाबदाऱया महिला वर्ग बिनचूकपणे पार पाडत असतो, परंतु ते न्यायसुसंगत आहे का? कामाचा सतत दबाव हा त्यांच्या मनाला आणि शरीराला आजारी पाडणारा आहे. कदाचित हे सर्वात मोठे कारण असून त्यामुळे शिक्षित आणि नोकरदार महिलांना कुटुंब नकोसे झाले आहे. आता आपल्याला कुटुंब व्यवस्था कशी जोपासायची आहे? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण जर कुटुंबच राहत नसेल तर आपले अस्तित्वही राहणार नाही.
(लेखिका समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)