लेख : कुटुंब व्यवस्था आणि तिचे महत्त्व

>>विलास पंढरी<<

अनेक विकसित राष्ट्रांना कुटुंब संस्थेचे महत्त्व आता कळले असून जगातल्या अनेक देशांत कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून त्यावर अध्ययन व संशोधन करणाऱ्या संस्था तयार झाल्या आहेत. हिंदुस्थानात मात्र असे कुटुंब अध्ययन केंद्र सुरू झाल्याचे अद्यापपर्यंत तरी ऐकिवात नाही. सरकारी पातळीवर कुटुंब नियोजनया शब्दाऐवजी कुटुंब कल्याणहा शाब्दिक बदल केल्याने फारसे हशील होण्यासारखे नाही. कुटुंबविषयक धोरण म्हणजे कुटुंब नियोजनाचे धोरण नव्हे. कुटुंब व्यवस्था जगवायची असेल, ती काळाभिमुख करायची असेल तर त्यासाठी सर्वांचा हातभार लागायला हवा. या कुटुंबात प्रत्येकाला व्यक्तिविकासाची संधी मिळायला हवी. तरच ही कुटुंब संस्था टिकेल.

कुटुंब हे राष्ट्राचे भवितव्य आहे असे मानणाऱ्या वर्ल्ड फॅमिली कॉंग्रेसची स्थापना 1997 मध्ये डॉ. ऍलन कार्लसन यांनी केली व त्याच वर्षी या संघटनेतर्फे पहिली आंतरराष्ट्रीय परिषद प्राग येथे झाली. दुसरी परिषद 1999 मध्ये जिनिव्हा येथे भरली, तिसरी 2004 मध्ये मेक्सिको सिटी येथे झाली तर चौथी वॉर्सा येथे 2007 साली झाली. या परिषदेत कुटुंब व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या सुमारे 75 देशांचे प्रतिनिधी सामील झाले होते. त्यांनी आपापल्या देशामधे कुटुंब अध्ययन आणि संशोधन केंद्रे स्थापन केली आहेत. हजारो वर्षांचा अभिमानास्पद कुटुंब संस्थेचा इतिहास असलेल्या हिंदुस्थानचा प्रतिनिधी मात्र या परिषदांमधे नसतो. हिंदुस्थानकडून अशा प्रकारचे आयोजनही होत नाही आणि कुटुंबविषयक धोरण ठरवण्यातही त्याचा सहभाग नसतो. आपली कुटुंब व्यवस्था इतकी भक्कम आणि शक्तिशाली आहे की आपल्याला कशाचीच गरज नाही, असा बहुधा आपल्या नेतेमंडळींचा समज असावा.

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. हल्ली बहुधा रक्ताच्या नात्यातील लोक तरी एकत्र राहताना दिसतात.पती-पत्नी हे रक्ताचं नातं समजलं जातं.

कुटुंब संस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंब संस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचाही अंतर्भाव होतो. साधारणतः वडील हे कुटुंबाचे प्रमुख असतात. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावे लागेल, पण असे कुटूंब पाहायला मिळणे हल्ली विरळ होत आहे.

15 मे 1994 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. हिंदुस्थानी लोकांनी कुटुंब व्यवस्था जतन केली आहे म्हणून ते समाधानी जीवन जगत असून मूळ अमेरिकन आणि ब्रिटिश लोक मात्र आर्थिकदृष्टय़ा संपन्न असूनही तेवढे समाधानी नाहीत असे एका सर्वेक्षणाअंती समोर आले आहे. या लोकांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे आज या विकसित देशांत कुटुंब व्यवस्था जतन करण्याचे आवाहन केले जात आहे. जागतिक कुटुंब दिवस पाळण्याची कल्पना त्यातूनच निर्माण झालेली आहे. ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ या घोषणेच्या आजच्या जगात एकत्र कुटुंबांची संख्या कमी झाली आहे. परंतु असं असलं, तरी अलीकडच्या या विभक्त कुटुंब पद्धतीला तडा देत आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू, चुलत भावंडे अशी एकत्रित राहणारी काही अपवादाने आढळणारी ‘मोठी सुखी कुटुंबं’ही आहेतच.

मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात मातृसंस्कृती अस्तित्वात होती. स्त्राr ही कुटुंबप्रमुख होती. तिची मुले आणि इतर पुरुष (भाऊ, पिता, मुलगा) हे या मातृकुटुंबाचे सदस्य असत. हे मातृसत्ताक कुटुंब  पोसण्याची धमक जोपर्यंत स्त्राrकडे होती, तोपर्यंत तिच्या वंशावळीचे महत्त्व टिकून होते. तेव्हा स्त्राrचे स्थान कुटुंबप्रमुखाचे आणि अतिशय महत्त्वाचे होते. जेव्हा केव्हा अपत्यजन्माचा संबंध पुरुषाशी आहे हे लक्षात आले तेव्हापासून पुरुषप्रधान संस्कृतीचा उगम होत स्त्राrवर, विशेषतः पत्नीवर स्वामित्व गाजवण्याची सुरुवात झाली असावी. पुढे शेतीत नांगरासारख्या यंत्रांचा वापर सुरू झाल्यावर पुरुषाची शेतीतील भूमिका दिवसेंदिवस स्त्राrपेक्षा महत्त्वाची होत गेली. पुरुषाच्या हातात सामाजिक सत्ता आली. जमीनदार पुरुषांचे महत्त्व वाढत गेले व नैसर्गिक मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची जागा पुरुषसत्ताक कुटुंबव्यवस्थेने घेतली. प्रारंभिक इतिहासातील महत्त्वाचे शोध उदा. शेती, अन्नप्रक्रिया, अन्न साठवणूक, पशुपालन, बालसंगोपन, शिवणकाम वगैरे स्त्रियांनीच लावले. त्यानंतर शेकडो वर्षे ती सर्व तंत्रे स्त्रियांनीच टिकवत विकसित केली. खरे तर हिंदुस्थानातली बरीचशी कुटुंबे आज स्त्राrच्या त्यागावरच उभी आहेत. इतके करूनही जर कुटुंबामध्ये, समाजात त्यांना मान, आदर मिळाला नाही तर ‘नको तो स्त्राr जन्म, नको ते लग्न आणि नकोच ते कुटुंब’ अशी आधुनिक स्त्राrची प्रतिक्रिया मानसिकता झाल्यास नवल नाही. याचेच प्रत्यंतर म्हणून ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ हा प्रकार समाजात सुरू झाला आहे. पण सहजीवनाची ही पद्धत सामाजिक हिताची नाही. यामध्ये मुलांचा विचार तर केलेला नाहीच,पण कुटुंबातील वृद्ध, अपंग यांचाही विचार होत नाही. आजपर्यंत या सगळय़ा जबाबदाऱ्या घरातील स्त्राrच्या मानल्या गेल्या व तिने त्या निभावल्याही आहेत. पण आता ही गृहिणी या दुय्यम स्थानास कंटाळली आहे. म्हणून आपल्याला कुटुंबसंस्थेचा कणा स्त्राr आहे हे लक्षात घेऊन तिच्या अपेक्षा, तिच्या गरजा आपण समजावून घ्यायला हव्यात. तरच कुटुंब व्यवस्था टिकून राहील. कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे असे नुसते म्हणून चालणार नाही. कुटुंब संस्थेची अधिक मोडतोड होण्यापूर्वीच ती सावरली पाहिजे. म्हणून ‘कुटुंब सर्वांचे आणि सर्वांसाठी कुटुंब’ हा विचार आचरणात आणला पाहिजे. अन्यथा जुनी ग्रीक संस्कृती जशी कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाल्याने लोप पावली, तसेच महान म्हणून मिरवत असलेल्या आपल्या संस्कृतीचेही होऊ शकते.

अनेक विकसित राष्ट्रांना कुटुंब संस्थेचे महत्त्व आता कळले असून जगातल्या अनेक देशांत कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून त्यावर अध्ययन व संशोधन करणाऱ्या संस्था तयार झाल्या आहेत. हिंदुस्थानात मात्र असे कुटुंब अध्ययन केंद्र सुरू झाल्याचे अद्यापपर्यंत तरी ऐकिवात नाही. सरकारी पातळीवर ‘कुटुंब नियोजन’ या शब्दाऐवजी ‘कुटुंब कल्याण’ हा शाब्दिक बदल केल्याने फारसे हशील होण्यासारखे नाही. कुटुंबविषयक धोरण म्हणजे कुटुंब नियोजनाचे धोरण नव्हे. कुटुंब व्यवस्था जगवायची असेल, ती काळाभिमुख करायची असेल तर त्यासाठी सर्वांचा हातभार लागायला हवा. या कुटुंबात प्रत्येकाला व्यक्तिविकासाची संधी मिळायला हवी. तरच ही कुटुंब संस्था टिकेल.