
हा एक अनुभव ऐका…‘अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राच्या टाफरागांव आणि आमलियांग इथल्या शाळांमध्ये पोहोचण्यासाठी एक छोटीशी नदी पार करून जावे लागत असे. त्या नदीचे नाव होते ‘दिघारू’ नदी. पण आम्ही तिला ‘पगली नदी’ असेच म्हणायचो. कारण एरवी कोरडय़ा असणाऱया या नदीत पावसाळ्यात एवढे पाणी असायचे, की होडीतूनही ती पार करणे शक्य होत नसे. नदीची खोली तशी फार नव्हती, जास्तीत जास्त सहा सात फूट. पण पावसाळ्यात पाण्याचा वेगच एवढा प्रचंड असायचा की होडीतून जाणे कठीण होत असे.
सुरुवातीला पोस्ट खात्याने त्यांच्या टपालाच्या थैल्या नदीच्या एका किनाऱयावरून दुसऱया किनाऱयावर पाठवण्यासाठी दोन हत्ती ठेवले होते. नागरिक त्यांना पोस्टल एलिफंट असे म्हणायचे. पावसाळ्यात मग या पोस्टल एलिफंटचाच उपयोग सर्व लोक पगली नदी क्रॉस करायला करीत असत. एका हत्तीवर पुरुष तर दुस्रया हत्तीवर स्त्रिया बसून नदीपार करीत असत.
हत्तीचे माहूत हत्तीवर बसणाऱयांना बजावून सांगत, की नदी पार करताना खाली नदीच्या पाण्याकडे अजिबात पाहू नका. कारण तुफान वेगाने वाहणारे पाणी पाहून डोळे फिरायचे व लोक घाबरून जायचे. मी असाच एकदा एका पोस्टल हत्तीवरून नदी पार करत होतो. स्त्रिया असलेल्या दुसऱया हत्तीवर एक स्त्राr तिच्या लहान बाळाला घेऊन बसली होती. खाली पाण्याकडे बघू नका, अशी सक्त ताकीद माहुताने दिली असतानाही या स्त्राrने चुकून म्हणा किंवा मुद्दाम म्हणा खाली पाहिले. ती घाबरली व त्या तिच्या हातातील मूल निसटून पात्रात पडले. आरडाओरडा झाला. पण तेवढय़ात पुरुष बसलेल्या हत्तीने ते मूल आपल्या सोंडेने पकडून वर काढले, म्हणून ते मूल वाचले.
मुक्या प्राण्यांच्याही संवेदना कशा तीव्र असतात, हे यातून लक्षात आलेच. पण महत्त्वाचे म्हणजे अरुणाचल प्रदेशाच्या अत्यंत दुर्गम भागातही विवेकानंद केंद्राच्या शाळा कार्यरत आहेत, तिथले शिक्षक सजग आहेत हे इथे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.’
हे परिणामकारक निवेदन ऐकून कुणीही म्हणेल की या गोष्टी तुम्ही लिहा म्हणजे इतरांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रेरणा मिळू शकते. यावर सांगणाऱयाचे म्हणणे, ‘मला लिहिता येत नाही. पण सांगू शकतो.’
तेव्हा अनुभवाचे महत्त्व जाणून ते शब्दांकित करण्याची जबाबदारी दिलीप महाजन यांनी स्वीकारली. त्यातून आकाराला आले, ‘अरुण’रंग हे पुस्तक आणि निवेदक विश्वास लपालकर. असे हे अनुभव संपृक्त पुस्तक विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांनी प्रकाशित केले आहे.
संघाचे संस्कार असलेला, नागपूरच्या महाविद्यालयात प्राध्यापक असलेला विश्वास लपालकर निवडक विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहल म्हणून कन्याकुमारीला जातो काय आणि तेथे त्यांची विवेकानंद शिला स्मारक उभारणाऱया एकनाथजी रानडे यांची भेट होते काय आणि त्यामुळे विश्वास यांच्या साऱया आयुष्याला वेगळेच वळण लागते काय. विवेकानंद केंद्रात त्यांचा सक्रिय सहभाग वाढू लागतो. एका भेटीत एकनाथजी रानडे त्यांना म्हणतात, ‘तू इथे नोकरी करतो आहेस, त्याऐवजी अरुणाचल प्रदेशात का नाही नोकरी करत? अरुणाचल प्रदेशात केंद्राने सुरू केलेल्या शाळा आहेत, आपल्याला चांगले शिक्षक तिथे हवे आहेत. इथल्या प्रमाणेच तुला तिथेही पगार मिळेल.’
विश्वास या गोष्टीसाठी तयार होतो. पण त्याच्या निर्णयामुळे घरात मात्र हाहाकार उडतो. वेगवेगळ्या कारणांनी ते या संकल्पात खोडा घालतात. परिणामी अरुणाचलला जाणे रहित होते. या सर्व समस्या पार केल्यानंतर विश्वास अरुणाचल येथे दाखल होतात आणि चक्क तीस वर्षे रमतो. त्याबद्दल ते म्हणतात, “या वाटचालीत माझे जीवन एवढे अनुभव संपन्न झाले की त्या आनंदाच्या बळावरच मी आता जगतो आहे.’’ हे अनुभव एकेरी नसून वैविध्यपूर्ण दुसऱयाला समजून घेण्याचा वृत्तीमुळे एखाद्याच्या आयुष्याला केवढे चांगले वळण लागते याची उदाहरणे देतात.
चिकाटी आणि कणखरपणामुळेच प्रसंगी ते आसाममधील दहशतवादी उल्फा संघटनेच्या लोकांना यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतात. तर प्रसंगी शाळेतल्या अॅडमिशनसाठी आलेल्या एकाला त्याने चीफ मिनिस्टरची चिट्ठी आणलेली असते तरी दडपण न येता ते कसे वागतात हे मुळातून वाचायला हवे. त्याच्याही पुढे चीफ मिनिस्टर यांचा खुलासा भारी आहे. विश्वास सांगतात, चीफ मिनिस्टर म्हणाले, ‘उसकी चिंता आप मत करो. मै राजकीय नेता हू. जो कोई चिठ्ठी मागने आता है, देनी ही पडती है. हम उसको नही कैसे कह सकते है? और चिठ्ठी मे भी लिखा होता है की यदि संभव हो तो करना. तो आप उसकी चिंता मत करो. अगर मुझे ऐसा लगा की वो करनाही है, तो मै डायरेक्टली आपसे बात करुंगा. आप बिलकुल चिंता मत करो.’ असा दिलखुलासपणा या पुस्तकाच्या पानोपानी आहे.



























































