लोकसंस्कृती- लोककलेतील भजनी मंडळे

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भजनी संप्रदायाच्या वृद्धीत कोल्हापूरचा वाटा मोठा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सर्व लोककला, लोकसंगीतांना राजाश्रय दिलेला होता, ज्यात भजन गायकीसही प्रोत्साहन दिले. भजनसम्राट तुकारामबुवा सरनाईक, पंडितराव करंबेळकर, कृष्णा बागणीकर असे अनेक भजनी गायक शाहूकाळात महाराष्ट्रात प्रसिद्धीस आले. कोल्हापूरची अस्सल स्वनिर्मिती असलेली सोंगाची भजनी मंडळे महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली.

ललित कलांच्या समुदायात संगीत, नाटय़ व चित्रकला ही प्रमुख दालने होत. करवीर नृपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ही कलादालने समृद्ध केली. या सर्व ललित कलांना त्यांनी राजाश्रय दिला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या कलांचे सुवर्णयुग निर्माण झाले. संगीतापुरते सांगायचे झाले तर शाहूपूर्वकालात कोल्हापूर संस्थानात कीर्तन, तमाशा, लावणी, साकी, दिंडी, फटका, पोवाडे, शाहिरी कलगीतुरा, भजन, वाघ्यामुरळीची गाणी, यल्लमाची गाणी इत्यादी लोकसंगीताचे प्रकार अस्तित्वात होते. धूपदधमार, ठुमरी हे शास्त्राrय संगीत राजेरजवाडे, जहागीरदार, सावकार प्रभृतींकडून ऐकले जाई.

करवीर दरबारच्या शारदीय नवरात्रोत्सवात व पंत अमात्यांच्या रामनवमीच्या उत्सवात भजनांसारख्या लोकसंगीत आणि शास्त्राrय संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाई. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात सर्व लोककला, लोकसंगीत तसेच शास्त्राrय संगीत कलेला व कलावंतांना उदारपणे राजाश्रय दिलेला होता. राजर्षी शाहू महाराजांनी शास्त्राrय संगीताबरोबर भजन गायकीसही प्रोत्साहन दिले. भजनसम्राट तुकारामबुवा सरनाईक, पंडितराव करंबेळकर, कृष्णा बागणीकर असे अनेक भजनी गायक शाहूकाळात महाराष्ट्रात प्रसिद्धीस आले.

महाराष्ट्राला समृद्ध अशा पारंपरिक लोककलांची प्रदीर्घ परंपरा आहे. लोककलावंतांनी या परंपरागत लोककला जिवापाड जपल्या आहेत. हे लोककलावंत बहुधा अल्पशिक्षित किंवा अशिक्षित असल्यामुळे या कलांविषयीचे लिखित वाङ्मय फारच थोडे उपलब्ध आहे. मात्र बहुजन समाजाची जडणघडण याच लोककलांच्य संस्कारावर झालेली आहे. विविध प्रकारची भजनी मंडळे, त्यातही मुख्यत कोल्हापूरची अस्सल स्वनिर्मिती असलेली सोंगाची भजनी मंडळे महाराष्ट्रात लोकादरास पात्र झालेली आहेत.

डोंगरकपारीत, वाडय़ावस्त्यात आणि खेडय़ापाडय़ात राहणाऱया अक्षरांची ओळखही नसणाऱया माणसांची ही अक्षर चळवळ. मनोरंजनाचीही साधने नसण्याच्या काळामध्ये भजनी मंडळे हेच कष्टाळू माणसांच्या विरंगुळ्याचे पवित्र साधन होते. टाळ, वीणा, मृदुंग किंवा पखवाज, हार्मोनियम, तर कधी खंजरी, तर कधी दिमडी या वाद्यांच्या साथीने सामुदायिकपणे भजने म्हटली जातात. ‘भजन’ हा भक्तिसंगीतातील एक महत्त्वाचा लोककला प्रकार आहे. या लोककला प्रकाराचा उगम सामवेदात दिसतो. याचा स्पष्ट पुरावा प्राचीन काळातील श्रीमद्भागवताच्या दशमस्कंधात आढळतो. श्रीमद्भागवताचा काळ हा इ.स.पूर्व 300 असा मानला जातो. अर्थात भारतामध्ये हजारो वर्षांपासून मंडळाची परंपरा रूढ आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये ‘भजन’ हा लोककला प्रकार आढळून येतो. त्यामध्ये अनेक प्रकारही आढळून येतात. ही विविध प्रकारची, विविध संप्रदायांतील भजनी मंडळे म्हणजे एक जनसंवाद माध्यम म्हणून रूढ झाली आहेत. त्यातही कोल्हापूरच्या सोंगी भजनांनी व कोकणातील चक्री भजनांनी, तसेच विदर्भ मराठवाडा येथील खंजरी भजनांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

[email protected]