खाऊगल्ली- खावं दादरचं गोमांतकीय खाणं

>> संजीव साबडे

मराठी माणसाच्या डोक्यात आणि मनात खरेदीसाठी दादर आणि खाण्यासाठी जुनी, आवडती ठिकाणं आहेत. यातही खास जुन्या जाणत्या मत्स्याहारी, मांसाहारी ठिकाणांना आजही तितकीच पसंती असते. गोमांतक, राजेशाही गोमांतक, आचरेकर मालवणी कट्टा, पूर्वा पंगत, सायबिणी गोमांतक या अशा जुन्या रेस्टॉरंटच्या बाहेर आजही वेटिंगच्या रांगा दिसून येतात.

पूर्वी मोठी खरेदी म्हटली की मुंबईकर दादरला निघत. भाजी घ्यायची चला दादरला, फुलांचा बाजार, चांगली व ताजी फळं दादरलाच, लहान मुलांचे, मोठय़ांचे कपडे, सणासुदीची खरेदी, लग्नाचा बस्ता बांधायला दादरलाच आणि मराठी खाद्यपदार्थ म्हटलं की दादरच असायचं. मुंबईच्या उपनगरातील बाजारपेठा फार विस्तारल्या नसल्याचा तो परिणाम होता. आता चित्र बदललंय, तरी मराठी माणसाच्या डोक्यात आणि मनात खरेदीसाठी दादर आणि खाण्यासाठी मामा काणे, प्रकाश, पणशीकर, आस्वाद, तांबे, तृप्ती, आदर्श, श्रीकृष्ण भोजनालय ही रेस्टॉरंट आहेत. आता एकादशी, तृप्त पोटोबा, मोदकम, मराठी पंगत, मार्तंड, हाऊस ऑफ मिसळ, सात्विक अशी आणखी मराठी रेस्टॉरंट दादरला आहेत, पण मनात असतात ती जुनी, आवडती ठिकाणं.

लस्सी म्हटलं तरी दादर पूर्वेची कैलास लस्सी आणि पश्चिमेला न. चिं. केळकर रस्त्यावरील लस्सी हीच ठिकाणं. वडापाव आठवतो अशोक वैद्य यांचा व कीर्ती कॉलेजचा. नुसता वडा छबिलदाससमोरचा श्रीकृष्णचा.

बॅगा आणि क्रााकरी घेण्यासाठी त्या गल्लीत आताही जातात, पण छबीलदास, दादर सार्वजनिक वाचनालय, वनमाळी हॉल आणि आयडियल बुकमध्ये जाणं कमी झालं आहे. पूर्वी महाराष्ट्र रेडिओ आण्ड वॉच दुकानात कॅसेटमध्ये आपल्याला हवी ती गाणी भरून द्यायचे. कबुतरखान्याच्या समोरचं दादर सुरती फरसाण, सौराष्ट्र फरसाण आणि गोकुळदास गाठीयावाला यांच्याकडे चक्कर होते. पाध्येवाडीचा वडापाव प्रसिद्ध होता. दादर स्टेशनच्या पश्चिमेला बबन चहावाला रात्रभर असायचा. पत्रकार, लेखक वगैरेंचा तो अड्डा. त्याच्याकडे कांदे पोहे, बटाटा पोहे, पनीर पोहे मिळायचे. पहाटे चार-पाच वाजेपर्यंत तो बबन चहा विकायचा. त्याच्या शेजारी बामणेताई खारी, टोस्ट, बिस्किटं आणि वृत्तपत्रं विकायच्या. आता ना बबन  आहे ना बामणेताई. तिथेच जवळ पहाटेपासून फुलांचा घमघमाट सुटायचा. जवळ छोटं खादीचं दुकान, समोर चपला, बूट विकणारे आणि हरिभाऊ विश्वनाथ यांचं वाद्याचं दुकान, शिवाजी मंदिरसमोर आणि प्लाझापाशी ढोलकी बनवणारे आणि जवळच शहाडे आठवले यांचं दुकान. असंख्य मराठी सराफही याच दादरमध्ये.

दादरमधली शाकाहारी ठिकाणं माहीत नाही, असा कोणी नाही. ती तर सर्वज्ञात आहेत. पण इथे अनेक चांगली मांसाहारी रेस्टॉरंट्सही आहेत आणि मांसाहारी लोक रांगा लावून किंवा बाहेर बराच वेळ थांबून आपला नंबर लागायची वाट पाहत असतात. त्यातलं खूप जुनं रेस्टॉरंट म्हणजे गोमांतक! शिवाजी मंदिरसमोरून तुम्ही दुपारी किंवा रात्री जात असाल तर तिथे लागलेली रांग तुम्हाला नक्कीच दिसेल. दुपारी रांग अधिक मोठी असते. उपवासाच्या दिवसांचा अपवाद. नावाप्रमाणे गोमांतक असलेल्या या ठिकाणी कोंबडी वडे आणि मटण, चिकनचे असंख्य प्रकार आहेत. कलेजा, चॉप, भेजा, सुकं मटण वा चिकन, कोंबडी वडे, खिमा चपाती खाणारे अनेक जण तिथे दिसतात. काहीजण अंडा करी किंवा अंडा थाळीच ऑर्डर करतात. पण हे गोमांतक बोर्डिंग हाऊस म्हणजेच भोजनालय लोकप्रिय आहे माशांसाठी. मुंबईच्या समुद्रात सापडणारे सारे मासे इथे येत असावेत. बांगडा, सुरमई, तिसऱया, पापलेट, कोळंबी, माखल्या, मोरी असे किती प्रकार सांगावेत! शिवाय खेकडा मसाला व सुकंही असतं. खेकडा लॉलीपॉपही मेन्यूमध्ये आहे, पण कसा असतो हे पाहिलं नाही. सर्व मांसाहारी पदार्थ आणि चपात्या, वडे यासोबत मिळतात आणि थाळी पद्धतही आहे. तिथे बहुसंख्य लोक थाळीच घेतात.

तिथेच जवळ राजेशाही गोमांतक. खांडके चाळ परिसरात असलेल्या या ठिकाणीही जवळपास सारे गोमांतकीय पदार्थ मिळतात. मटण, चिकन, मासे, खेकडे, अंडी आणि शाकाहारी व चायनीजही. एखादं कुटुंब आलं की मुलांना अनेकदा चायनीज खाद्यपदार्थ हवे असतात. त्यामुळे ते आता सर्वच ठिकाणी मेन्यूमध्ये आले आहेत. इथला झिंगा कोळीवाडा प्रसिद्ध आहे. पण चोखंदळ लोक नेहमी दोन गोमांतकमधील पदार्थांची नेहमी तुलना करतात. शिवाजी मंदिरच्या खाली आहे कोकण सन्मान. हेही नावाप्रमाणे कोकणी खाद्यपदार्थ देणारे. मात्र इथे पंजाबी आणि काही मुघलाई पदार्थही मिळतात. मालवणी पदार्थ, सोलकढी आणि चिकन लॉलीपॉप, चिकन क्रिस्पी, चिकन तंदुरी हेही मिळतात. जेवण उत्तम असलं तरी तिथे बार आहे.

याच परिसरात डी. एल. वैद्य मार्गावर ‘आचरेकर मालवणी कट्टा’ हे रेस्टॉरंटही नावाप्रमाणेच मालवणी पदार्थांची खासियत असलेला. हेही फक्त जेवणाचं ठिकाण. मटण, चिकन आणि मासे हे यांचं वैशिष्टय़. इथे गावठी चिकन आणि खेकडा लॉलीपॉप मस्त मिळतं. याशिवाय सर्व प्रकारचे मासे इथे मिळतात. विविध मच्छी मसाला, बांगडा व बोंबील फ्राय आणि कोंबडी वडे आणि सुकं मटणच्या प्लेट आणि थाळी यासाठी मालवणच्या, पण दादरमध्ये असलेल्या या आचरेकरांच्या कट्टय़ावर जात असतात. याशिवाय जवळचे कासारवाडी भागात ‘पूर्वा पंगत’ हे रेस्टॉरंट आहे. खरं सांगायचं तर ही गोमांतक रेस्टॉरंट म्हणजे भोजनालय वा खानावळीच आहे. फक्त जेवणच देणाऱया आणि दुपारी व रात्रीच खुल्या असणाऱया. बाकी वेळ बंद. तर पूर्वा पंगत हेही उत्तम गोमांतकीय पद्धतीचं जेवण देणारं ठिकाण. बांगडा, बोंबील, कोळंबी, सुरमई, पापलेट, मोरी, कालवं असा सारा समुद्र. मग त्यांचे फ्राय, सुकं, करी, मसाला असे प्रकार. त्यासोबतच मटण, चिकन व अंडी आणि त्यांचे प्रकार. नॉन व्हेज म्हटलं की काहीसं महाग असणारच. पण इथले दर काहीसे वाजवी आहेत. चपाती, वडे, तांदळाची भाकरी, सोलकढी हे तर लागतंच. शिवाय भात वा प्रॉन्स, मटण, चिकन, अंडा बिर्याणी. गोमांतकीय खानावळीत शिरलं की लगेच अस्सल मांसाहारी माणसाला मेन्यू न पाहताच कोणकोणते मासे इथे मिळतील, याचा वास लागतो. मेन्यू लागतो तो केवळ दर पाहण्यासाठी. अशा ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मागवण्यापेक्षा ते ज्या थाळीत आहेत, ती थाळी मागवणं उत्तम आणि परवडतं.

शिवसेना भवनाकडून माहीमच्या दिशेला चालू लागलो की गोपी टँक मार्केटजवळच लागतं सायबिणी गोमांतक. इथे पापलेट थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी, सुरमई थाळी आणि मटण, चिकन, अंडा थाळी आहेत. शिवाय क्रॅब
लॉलीपॉप, प्रॉन्स कोळीवाडा, कोंबडी वडे असे सारे प्रकार मिळतात. अशा अनेक ठिकाणी कॅरमल कस्टर्ड असतं. पण इथे मस्त केसर फिरणीही मिळते. इतर गोमंतकीय हॉटेलपेक्षा हे थोडं महाग, पण उत्तम आहे. दादर पूर्व आणि सैतान चौकी, पोर्तुगीज चर्च या ठिकाणी नंतर जायचंच आहे.

z [email protected]