लेख – वनीकरण : मानवी जिवाचा मुख्य आधार   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. डॉ. प्रीतम भि. गेडाम 

देशात जेवढय़ा वेगाने औद्योगिकीकरण झाले आहे तेवढय़ाच वेगाने वृक्षतोडसुद्धा झाली आहे, पण त्यामानाने वृक्षारोपण झालेले नाही. वननीती 1988 प्रमाणे 33 टक्के भागात वने असायला हवीत. तेव्हाच निसर्गाचे संतुलन कायम राहू शकेल, पण वर्ष 2001 च्या रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली, ज्यावरून लक्षात आले की, देशात फक्त 20 टक्केच वने उरली आहेत. झाडांमुळे वने समृद्ध होतात, वनामुळे जंगले समृद्ध होतात, वन्य प्राणी, जीवजंतू समृद्ध होतात, निसर्गाचा समतोल राहतो, वातावरण स्वास्थ्यदायक होते, जमिनीत पाण्याची पातळी वाढते, शुद्ध प्राणवायू, शुद्ध जल मिळते, पाण्याचे स्रोत वाढतात,  गावे समृद्ध होतात, चांगली शेती पिकायला मदत होते.

पृथ्वीवर जीवन टिकवणे मानवाच्या हातात आहे म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण व संगोपन करणे महत्त्वाचे आहे आणि हे संपूर्ण पर्यावरण झाडांवरच अवलंबून आहे. मात्र माणूस याच झाडांची सर्रास कत्तल करीत सुटला आहे. त्यामुळे आज 90 टक्के लोकांना शुद्ध प्राणवायू मिळत नाही. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध नाही . इंधनाचा, इलेक्ट्रॉनिक साधनांचा अति वापर होत आहे. गाव-खेडी आपली ओळख संपवत आहेत. जंगलाचे क्षेत्रफळ कमी होऊन काँक्रीटची जंगले तयार होत आहेत. अन्नधान्य, खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टीत भेसळ आढळून येते. आज समाजाला नवनवीन गंभीर आजारांनी घेरले आहे. अशा परिस्थितीत जीवनाचे अस्तित्व कसे टिकून राहणार? पुढच्या पिढीकरिता जीवन तर कठीणच असणार. या संपूर्ण समस्येवर एकच उपाय आहे ते म्हणजे वनीकरण, ‘झाडे लावा – जीवन जगवा’!

देशात दरवर्षी जुलै महिन्याचा प्रथम आठवडा  वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. वन महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे सगळीकडे झाडे लावणे आणि झाडांचे कमी होत चाललेले क्षेत्रफळ वाचविणे आहे. वन महोत्सवाला लाखेंच्या संख्येने झाडे लावली जातात, पण दुर्दैवाने त्यातील काहीच टक्के झाडं जगतात. कारण की, त्या झाडांची योग्य काळजी घेतलीच जात नाही. आज देशाच्या तापमानात भयंकर वाढ झालेली दिसते. प्रदूषणात वाढ, अवेळी पाऊस, वादळ, उजाडत चाललेली शेती, घसरत चाललेली पाण्याची पातळी, कमी होत चाललेले वन्य प्राणी, औषधीयुक्त वनस्पती, शुद्ध पाणी व प्राणवायूची कमतरता, वाढत चाललेले नवनवीन आजार या सर्व समस्या झाडांच्या कमतरतेमुळेच निर्माण झाल्या आहेत.

देशात जेवढय़ा वेगाने औद्योगिकीकरण झाले आहे तेवढय़ाच वेगाने वृक्षतोडसुद्धा झाली आहे, पण त्यामानाने वृक्षारोपण झालेले नाही. वननीती 1988 प्रमाणे 33 टक्के भागात वने असायला हवीत. तेव्हाच निसर्गाचे संतुलन कायम राहू शकेल, पण वर्ष 2001 च्या रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली, ज्यावरून लक्षात आले की, देशात फक्त 20 टक्केच वने उरली आहेत.

दर दोन वर्षांनी केंद्रीय शासनातर्फे वन सर्वेक्षण विभाग आपला रिपोर्ट सादर करतो. केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे 12 फेब्रुवारी 2018 रोजी ‘हिंदुस्थान वन स्थिती रिपोर्ट -2017’ सादर करण्यात आला. या रिपोर्टप्रमाणे आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळमधील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. वनक्षेत्राच्या बाबतीत हिंदुस्थान जगातील उच्च 10 देशांमधे येतो. हिंदुस्थानच्या भूमीवरील 24.4 टक्के भाग झाडांनी घेरला आहे, पण तो जगाच्या संपूर्ण भूभागाच्या फक्त 2.4 टक्के इतकाच आहे. बाकीच्या 9 देशांचे लोकसंख्या घनत्व 150लोक/वर्ग किलोमीटर आहे आणि हिंदुस्थानात 382 लोक/वर्ग किलोमीटर आहे व यावर 17 टक्के मानवी लोकसंख्या व 18 टक्के पशुसंख्यांची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.

वृक्षतोडीचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आहे. ज्या प्रकारे प्रचंड वेगाने लोकसंख्या वाढत आहे, त्या मानाने लोकांच्या गरजासुद्धा वाढतात. म्हणून लोकांच्या खाण्यापिण्याच्या, राहण्याच्या, कामाच्या गरजा भागविण्याकरिता झाडे कापली जातात.

आलिशान घर, फर्निचर, खिडक्या, दारं, सजावटी वस्तू, इतर गोष्टीत लाकडांचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. मौल्यवान व औषधीयुक्त झाडांपासून होणारे फायदे असल्याकारणाने अशी झाडे स्वार्थापोटी कापली जातात. मोठय़ा प्रमाणात अवैध उद्योगधंद्यांना लाकडांची गरज असते. मानवी भोगविलासाच्या वस्तूंकरिता आणि व्यवसायाच्या कच्च्या मालाकरिता तसेच विकास, उद्योग, नवीन योजना आखण्याच्या नावाखाली मोठय़ा संख्येने झाडे कापली जातात.

जंगलांमुळे पृथ्वीवर निसर्गाचा योग्य सांभाळ होतो. झाडांची मुळं मातीला धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही व पावसाचे पाणी जमिनीत मुरते. झाडांद्वारे शुद्ध प्राणवायू मिळतो जो प्रत्येक जिवासाठी गरजेचा आहे. झाडे कार्बन डायऑक्साईडसारखे विषारी वायू अवशोषित करतात व प्रदूषणावर नियत्रंण ठेवतात. झाडांद्वारे औषधी व चंदनासारखे मौल्यवान लाकूड मिळते. पशुपक्ष्यांना राहायला घर मिळते. ग्लोबल वार्ंमगची समस्या दूर करण्यास मदत होते.

झाडांमुळे वने समृद्ध होतात, वनामुळे जंगले समृद्ध होतात, वन्य प्राणी, जीवजंतू समृद्ध होतात, निसर्गाचा समतोल राहतो, वातावरण स्वास्थ्यदायक होते, जमिनीत पाण्याची पातळी वाढते, शुद्ध प्राणवायू, शुद्ध जल मिळते, पाण्याचे स्रोत वाढतात,  गावे समृद्ध होतात, चांगली शेती पिकायला मदत होते, अन्नधान्य वाढते, महागाई कमी होण्यास मदत होते, नैसर्गिक संकटे कमी होण्यास मदत होते. मानवाचा विकास होतो, तर चला आपण माणुसकीच्या नात्याने सर्व एक शपथ घेऊया की, जास्तीत जास्त झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरणाचे रक्षण करू, परिवाराच्या सदस्याप्रमाणे झाडांचा सांभाळ करू आणि आपली पृथ्वी जंगलांनी समृद्ध करू.