
>> माधव डोळे
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे… दे वरची असा दे… ही संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली कविता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रा. वि. ऊर्फ रामचंद्र विनायक भुस्कुटे यांना तंतोतंत लागू होते. स्वातंत्र्यपूर्वीचा संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतरचा हिंदुस्थान प्रदीर्घकाळ अनुभवणारे जे थोडे स्वातंत्र्यसैनिक आहेत त्यात भुस्कुटे यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. 95 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. पण आयुष्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण त्यांनी लोकांसाठी सार्थकी लावला. स्वातंत्र्यलढय़ाचे बाळकडू त्यांना घरात मिळाले. वडील विनायक हे स्वतः स्वातंत्र्यसैनिक होते. प्रभातफेरी असो की, जुलमी इंठाजांच्या विरोधात सभा. त्यात भाग घेण्यासाठी लहान वयातील रामचंद्र सदैव तयार असायचे. पुढे स्वातंत्र्य चळवळीची धार वाढत गेली आणि रामचंद्र भुस्कुटे यांच्यासारख्या असंख्य तरुणांना एकच ध्यास लागला आणि तो म्हणजे इंठाज चले जाव. विविध सत्याठाहांमध्ये भाग घेत असतानाच त्यांचे लग्न हजारो देशभक्त तरुणांचे प्रेरणास्थान सेनापती बापट यांची मुलगी विमल यांच्याबरोबर झाले. त्यामुळे बापटांचे जावई बनलेले रामचंद्र भुस्कुटे यांच्यातील लढवय्या देशभक्त आणखी जागा झाला. आपल्याला लिखाणाची आवड वडील विनायक व सासरे सेनापती बापट यांच्याकडून मिळाल्याचे ते आवर्जून सांगायचे. स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय भाग घेतल्याबद्दल त्यांना अनेकदा तुरुंगवासही सहन करावा लागला. पण त्यांच्यातील जिद्द आणि देशभक्ती तसूभरही कमी झाली नाही. स्वातंत्र्यलढय़ात भाग घेताना त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. एम.ए.पीएचडीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. महसूल आणि जमीन हा त्यांचा कायमच अभ्यासाचा विषय. याच विषयात त्यांनी डॉक्टरेट केली. विशेष म्हणजे उच्चविद्याविभूषित असतानाही त्यांनी कधीही ‘डॉक्टरेट’ ही उपाधी स्वतःला लावून घेतली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भुस्कुटे यांनी महसूल खात्यात 33 वर्षे नोकरी केली. ते तहसीलदार म्हणून 31 ऑक्टोबर 1983 रोजी निवृत्त झाले. सरकारी अधिकारी असूनही भुस्कुटे यांनी कधीही घमेंड बाळगली नाही. उलट आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच मोठय़ा प्रमाणावर केला. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी तुरुंगाच्या वार्या केल्या. पण स्वातंत्र्यानंतर गरीबांना हक्क मिळावेत म्हणून केलेल्या आंदोलनांमध्येही त्यांना तुरुंगात जावे लागले. जमीन आणि महसूल हा त्यांचा सतत अभ्यासाचा विषय. त्यासंबंधीच्या कायद्यांची भुस्कुटे यांना खडान्खडा माहिती होती. महसूल खात्यातील अनेक मंत्री तसेच वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांचा सल्ला घेतला. त्याचा उपयोग महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यासाठी झाला. जमिनीचे हक्क, वारसा, सरकारी जागा, अतिक्रमण, ब्रिटिशकालीन कायदे, त्यातील सुधारणा अशा विविध विषयांवर भुस्कुटे यांनी पन्नासहून अधिक पुस्तके लिहिली. हादेखील एक विक्रमच म्हणावा लागेल. जमीन व महसूलसारखा किचकट विषय त्यांनी अतिशय सोपा करून सांगितला. त्याचा उपयोग सरकारी अधिकारी, विद्यार्थी तसेच कर्मचारी यांना अजूनही होत आहे. संपूर्ण अंबरनाथमध्ये ते भुस्कुटे काका म्हणून प्रसिद्ध होते. पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे. घर, कुटुंब, देशभक्ती, समाजसेवा, आंदोलने, अभ्यास, लेखन, सरकारी नोकरी अशा सार्या गोष्टी त्यांनी एकत्रितपणे कशा सांभाळल्या असतील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. भुस्कुटे यांचे वडील आस्तिक होते, पण स्वतः मात्र नास्तिक होते. अंबरनाथमधील गजानन महाराज सेवा मंडळाच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करायचे ठरवले. त्यासाठी मंडळाच्या पदाधिकार्यांनी घरी जाऊन आमंत्रण दिले. पण ते म्हणाले, अहो मी तर पडलो नास्तिक. मला कशाला पुरस्कार वगैरे देताय? गोरगरीब जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा.. असेही सांगायला ते विसरले नाहीत. पण अंबरनाथकरांचे प्रेम बघून भुस्कुटे यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. सर्वसामान्यांबद्दलची संवेदनशीलता आणि परखड संघर्षशील योद्धा अशा शब्दांत त्यांचे वर्णन करावे लागेल. वेठबिगारमुक्ती, जमीन हक्क, घराखालील जागेचा हक्क, किमान वेतन, जमिनीच्या नोंदी अशा विविध क्षेत्रांत त्यांनी भरघोस काम केले. विशेषतः ठाणे, पालघर, धुळे या जिल्ह्यांमध्ये केलेले सामाजिक कार्य कोणीही विसरणार नाही. एक स्वातंत्र्यसैनिक, सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, लेखक, विद्यार्थी, कुटुंबप्रमुख आणि प्रखर देशभक्त, आंदोलक असे रा. वि. भुस्कुटे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. रा. वि. यांच्यासारखे लढाऊ आाणि अभ्यासू कार्यकर्त्याची उणीव कायम भासेल.


























































