
>> वैश्विक
‘इस्रो’ या आता जागतिक कीर्तीच्या ठरलेल्या अवकाश अभ्यास आणि उपग्रह अवकाशात सोडणाऱया संस्थेची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली असली, तरी अगदी त्याचा विचार हिंदुस्थानी संशोधकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 पासून सुरू केला होता. वैज्ञानिक एस. के. शर्मा त्यादृष्टीने कोलकाता येथे करत होते. ते प्रयोग अंतराळातील रेडिओ लहारींसंबंधी असत. त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रमण आणि मेघनाद साहा यांच्यासारख्या नामांकित वैज्ञानिकांनी अवकाश-संशोधनाविषयी सखोल विचार सुरू केला आणि पुढे 1945 मध्ये डॉ. होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांनी त्याला मूर्तस्वरूप देण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केले.
1950 मध्ये ‘डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी’ या संस्थेची स्थापना डॉ. भाभा यांच्या नेतृत्वात झाली. ते या संस्थेचे पहिले सचिव. तत्पूर्वी अशा वैज्ञानिक संस्थांची परंपरा 1823 मध्ये स्थापन झालेली कुलाबा वेधशाळा. 1957 मधली हैदराबादजवळची रंगपूर वेधशाळा वगैरे अस्तित्वात होत्या; परंतु 4 ऑक्टोबर 1957 रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनचा (रशियाचा) पृथ्वीवर बांधणी झालेला जगातला पहिला कृत्रिम उपग्रह स्पुतनिक-1 अवकाशात झेपावला आणि जग (विशेषतः अमेरिका) विस्मयचकित झाले.
आपल्या देशानेही स्वनिर्मित पृत्रिम उपग्रह अवकाशात सोडावा अशी आपल्या संशोधकांची इच्छा असणे स्वाभाविक होते. त्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याइतकी सक्षम, ज्ञानी संशोधक मंडळीही होती. परंतु प्रश्न होता तो पैशाचा. एकवेळ कृत्रिम उपग्रहाची बांधणी प्रयोगशाळेत करता येईल, पण तो अवकाशात सोडण्यासाठीचे शक्तीशाली रॉकेट आणि त्यासाठी लागणारे इंधन याचा अफाट खर्च आपल्या त्यावेळच्या अर्थव्यवस्थेला सोसणारा नव्हता. मात्र त्याच काळात आपली सोव्हिएत युनियनची असलेली मैत्री लक्षात घेता हिंदुस्थानात घडवलेला उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी रशियाने दाखवली. त्यानुसार ‘इस्रो’ बाल्यावस्थेतच असताना बनवलेला पहिला-वहिला देशी कृत्रिम उपग्रह, सहाव्या शतकातील नामवंत हिंदुस्थानी अवकाश-अभ्यासक वैज्ञानिक ‘आर्यभट’ यांच्या नावे 19 एप्रिल 1975 रोजी यशस्वीरीत्या अवकाशात पाठवण्यात आला. सोव्हिएतच्या काॅस्मॉस-3एम या रॉकेटवरून तो रशियातल्याच कॅप्युस्सिनयेर या अंतराळस्थानकावरून अवकाशात झेपावला. यू. एन. राव यांनी 1972 मध्येच यासंबंधीचा करार रशियाशी केला होता. ‘आर्यभट’ उपग्रह पृथ्वीभोवती 619 ते 563 किलोमीटर अंतरावरच लंबवर्तुळाकार कक्षेत फिरू लागला आणि अवघा देश आनंदला.आपल्या भावी अंतराळ कार्यक्रमाची ही नांदी होती. ‘आर्यभट’वरील उपकरणांद्वारे एक्स-रे खगोलशास्त्र, तसेच सौर भौतिकशास्त्राच्या उपग्रहाचा पहिलाच प्रयोग असल्याने तो अवकाशात गेल्यावर नेमके काय होणार याची पूर्वकल्पना वैज्ञानिकांना असणे शक्य नव्हते. उड्डाणानंतर लगेचच हा 1.4 मीटरचा उपग्रह थोडा थरथरू लागला. पृथ्वीवरच्या तंत्रज्ञांनी त्याची ताबडतोब दुरुस्ती केली. त्याचे पृथ्वीभोवती फिरणे सुरू झाले. अशा 60 फेऱयांनंतर मात्र पाच दिवसांनी त्याचा संपर्प तुटला. एका महत्त्वाकांक्षी प्रयोगाला धक्का बसला.
त्या वर्षी मी पत्रकारितेत नवखा होतो. आर्यभट अवकाशात झेपावल्याचे वृत्त आम्ही आमच्या साप्ताहिकात अभिमानाने दिले होते. मात्र त्यात ‘बिघाड’ झाल्याचे वृत्त येताच ‘फॉलो-अप’ बातमी म्हणून त्यात काहीतरी गडबड झाल्याचा लेख तयार करावा लागला. विज्ञानात असे अपयश सुरुवातीला जगभरच्या अनेक प्रयोगांमध्ये येते. याचा अनुभव विजेचा दिवा शोधणाऱया एडिसन यांनी तर अनेकदा घेतला. अशा अपयशातून पुढचे यश मिळेल असा काही लेख लिहिल्याचे आठवते. परंतु त्या काळात (1975) अशा बातम्या वृत्तपत्रांकडे यायलाही वेळ लागत असे. ‘आर्यभट’ उपग्रहासंबंधी पूर्ण विचारांतीच काही सांगणे शास्त्रज्ञांनी ठरवले ते योग्यच होते. कालांतराने ती बातमी आली आणि थोडय़ा निराशेनेच त्याबद्दलचा लेख लिहावा लागला. तोपर्यंत देशात आणबाणी (जून 1975) आली आणि वृत्तपत्रांवर ‘सेन्सॉरशिप’ लादली गेली.
‘आयभटा’विषयीचे वैज्ञानिक सत्यसुद्धा ‘पास’ करताना या सेन्सॉरबोर्डाला अडचणीचे वाटले. ‘हा उपग्रह बिघडलाय असे म्हणू नका, वेगळं शीर्षक द्या.’ असे सांगण्यात आले. मग आम्ही ‘आर्यभट उपग्रह रुसलाय’ असे शीर्षक दिले ते ‘पास’ झाले. सगळाच विनोद. पण ‘आर्यभट’ उपग्रहाचा प्रयोग आणि तो अवकाशात पाठवण्याचा निर्णय या सगळय़ाचे कौतुकच होते. आता या तो पाच दिवसांत अपयशी ठरलेल्या प्रयोगाला 50 वर्षं झाली. त्याचेही महत्त्व अमूल्य आहे. संशोधनाच्या क्षेत्रातले अपयशही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे ते दडवता येत नाही. त्यातूनच नवे मार्ग सुचतात हा त्याचा फायदा. बाकी ‘आर्यभट’विषयक माहिती सर्वत्र उपलब्ध आहेच. तसा तो 1981 पर्यंत पृथ्वीभोवती नुसता फिरत होता. शेवटी ‘ऑर्बिट डीके’ म्हणजे कक्षेत बदल होत 10 फेब्रुवारी 1972 रोजी पृथ्वीच्या वातावरणात शिरला. हे सर्व खरे असले तरी त्याच अपयशातून पुढे ‘भास्कर’ हा उपग्रह आणि नंतर देशातूनच ‘रोहिणी’पासून आता चंद्रयान, मंगळयानापर्यंत 127 उपग्रह ‘इस्रो’ने सोडलेत. या महिन्यात तर आपला अंतराळयात्रीही अवकाशात जातोय. हे यश मोठे आहे.