
>> वैश्विक
तसं पाहिलं तर आपला सूर्य हा विराट विश्वातल्या एका दीर्घिकेमधला सामान्य तारा. त्याच्या ‘परिवारा’तील आपल्या पृथ्वीसारखे ग्रह तर विश्वात नगण्य असेच. तरीसुद्धा या ‘सामान्य’ म्हटल्या जाणाऱया ताऱयाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीची व्याप्ती जाणून घेतली तर तेही किती प्रचंड आहे हे समजेल… आणि असे अक्षरशः अब्जावधी किंवा त्याच्याही अनेक पटींनी ताऱयांनी खच्चून भरलेलं विश्वगण किती विराटाकार किंवा अमर्याद म्हणावं इतकं विशल असेल याची कल्पना करणंही कठीण.
परंतु विश्वाच्याही उत्पत्तीचं आणि मर्यादेचं कोडं विज्ञानाने सोडवलंय. आपल्याला डोळे-दुर्बिण आणि अवकाशी दुर्बिणींमधून दिसणारं ‘विश्व’ हे एकूण विश्वाच्या केवळ चार टक्के असल्याचीही नोंद केली. त्या विश्वाचं वय 13.7 अब्ज वर्षे असल्याचाही निष्कर्ष काढला. त्याविषयी ‘अॅकॅडेमिक’ किंवा अभ्यासपूर्ण चर्चा होतच असतात. विश्वाची निर्मिती ‘बिगबँग’ मानल्या जाणाऱया एका क्षणी एका बिंदूमधून झाली आणि त्याचं वेगाने प्रसारण सुरू झालं हे आता जवळपास सर्वमान्य असलं तरीही ही एकूणच ‘शाश्वत’ विश्वामधील एक अवस्था (फेज) आहे असंही मानणारे आहेतच अशा संशोधनात्मक विवादातूनच विज्ञान सत्याच्या अधिक जवळ जात असतं.
आपल्या ‘सामान्य’ सूर्याचं ‘असामान्यत्व’ एका बाबतीत मात्र मान्य करावंच लागेल. ती गोष्ट म्हणजे आपल्यासारखा प्रगत जीवसृष्टी असलेला दुसरा ग्रह अजून तरी इतर कोणत्याही ताऱयाभोवती फिरताना आढळलेला नाही. एखाद्या ग्रहाच्या वसाहतयोग्य कक्षेत (हॅबिटेबल झोन) एखादा ग्रह सापडला की ‘दुसरी’ पृथ्वी सापडल्याच्या आरोळय़ा उठतात. मात्र त्यावर आपल्यासारखी वैविध्यपूर्ण सजीवसृष्टी आणि माणसासारखे विचार करू शकणारा प्राणी आजतागायत आढळलेला नाही. तसा तो अनेक अब्ज ताऱयांभोवतीच्या कोणा ग्रहावर असणारच नाही असंही नाही. तोपर्यंत आपल्या सूर्यासारखा ‘जीवसृष्टी’च्या ग्रहाचा ‘जनक’ ही पदवी अन्य कोणाला मिळणार नाही, हे आपल्या सूर्याचं मोठेपण.
अशा या सूर्याभोवती आधुनिक खगोल-निकषांना मान्य असलेले आठ ग्रह, त्यांचे अनेक उपग्रह, काही लघुग्रह, अशनींचे पट्टे आणि त्यापलीकडे असलेलं धूमकेतूंचं उगमस्थान असलेलं ‘ऊर्ट क्लाऊड’चं ‘कव्हर’ हा पसारा काही कमी नाही. त्यातल्या ग्रहमालेच्या पलीकडे असलेल्या ‘कायपर बेल्ट’ किंवा कायपरच्या पट्टय़ाविषयी माहिती घेण्याचं कारण म्हणजे ‘जेम्स वेब’सारख्या शक्तीशाली दुर्बिणीने त्याचा घेतलेला वेध आणि उलगडलेली (आपल्यासाठी) नवी रहस्ये.
या कायपर पट्टय़ाची निर्मिती सूर्यजन्मानंतर लगेच झाली. सूर्याचं वय सध्या पाच अब्ज असेल तर त्याच सुमारास एकेक ग्रह कायपर बेल्ट आणि त्यातील किमान लाखभर ‘वस्तूं’ची निर्मिती झाली. एवढा मोठा पसारा घेऊन हा पट्टय़ा एखाद्या कडय़ासारखा (रिंग) सूर्यापासून 7 अब्ज 50 कोटी किलोमीटर अंतरावर फिरत आहे. तो सूर्यापासून सुमारे 4 अब्ज 50 कोटी किलोमीटरवर सुरू होतो. त्याची रुंदी, मंगळ आणि गुरू ग्रहाच्या मध्यभागी असलेल्या अशनी-पडद्याच्या 20 पट असून त्यातील वस्तुमान (दव्य) या पट्टय़ाच्या 200 पट आहे. त्यातील 70 हजारांहून अधिक गोलक 100 किलोमीटर व्यासाचे आहेत.
या ‘पट्टय़ाचा’ विचार 1930 मध्ये क्लॉइड टॉम्बो यांनी ‘प्लूटो’चा शोध लावला तेव्हाच सुरू झाला होता. केनेथ एखर्थ यांनी तशी शक्यता मांडली होती. त्यानंतर 1951 मध्ये जेरार्ड कायपर (किंवा किपर) यांनी त्याविषयी ठोस संशोधन केल्याने या पट्टय़ाला त्यांचंच नाव दिलं गेलं. ज्युलिओ फर्नांडेस यानीही प्लूटोपलीकडच्या (आता प्लूटोसह) असलेल्या या अशनींच्या ‘वसाहती’विषयी मत नोंदलं होतंच.
1992 मध्ये या पट्टय़ात अल्बियन हा लघुग्रह सापडला आणि प्लूटो-शेरॉन यांच्यापासून सुरू झालेली ‘कायपर’ शोधमोहीम योग्य दिशेने होत असल्याचं लक्षात आलं. प्लूटोचा सहयोगी शेरॉन याचा शोध 1978 मध्ये लागला आणि ही जोड-ग्रहांची ‘सिस्टिम’ कायपर बेल्टचाच भाग असल्याचं लक्षात आलं. त्यातूनच 2006 मध्ये प्लूटोचं ‘ग्रहपद’ गेलं.
सुरुवातीच्या काळात कायपर पट्टा हे सूर्याच्या दिशेने येणाऱया कमी वेळेच्या (शॉर्ट टर्म) धूमकेतूचं उगमस्थान असल्याची कल्पना होती. ती 1990 मध्ये बदलली. असे (हॅलीसारखे) धूमकेतून कायपर पट्टय़ाच्या विस्तारित अशा भागातून किंवा 4.5 अब्ज किलोमीटरवरून येतात हे सिद्ध झालं. मोठे धूमकेतू येतात तो ऊर्ट क्लाऊड मात्र कायपर बेल्टच्याही पलीकडे हजार पट दूर म्हणजे सूर्यापासून 1400 कोटी किलोमीटर अंतरावर असल्याचं संशोधन पुढे आल्यावर ‘ऊर्ट क्लाऊड’ हा एखाद्या ‘डिस्क’ किंवा ‘कडय़ा’सारखा नसून तो सूर्यमालेभोवती संपूर्ण गोलाकार आकारात (स्फेरिकल पद्धतीने) पसरलेला आहे याची जाणीव थक्क करणारी ठरली.
कायपर बेल्टमुळे नेपच्यूनपलीकडच्या अशनी पट्टय़ाच्याही पलीकडे आपल्या सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कशी पसरली आहे आणि ती जिथे संपते त्या ‘हेलिओपॉज’ सीमेवर आंतरतारकीय गुरुत्वाकर्षण कसं सुरू होते तिथपर्यंत संशोधनची कक्षा रुंदावली आहे. कायपर पट्टय़ातील अनेक ‘गूढ’ गोष्टींचा शोध लागणं बाकी आहे.
‘न्यू होरायझन’ प्रकल्पाने त्यात आघाडी घेतली असून त्याने कोणतं संशोधन जगासमोर ठेवलंय तेही यानंतर जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. आपण 1979 मध्ये पाठवलेलं व्हॉयेजर-1 यान हे प्रचंड अंतर पार करून ‘अजुनि चालतेचि वाट’ या जिद्दीने पुढे सरकत आहे. माणसाच्या रचनात्मक, संशोधक बुद्धीचं हे देणं. त्याविषयीची जाण छोटय़ाशा आयुष्यात कमालीचं गुरफटलेल्या किती ‘विचारशील’ माणसांना असेल?































































