
इंडस्ट्री 4.0 म्हणजे पुन्हा एकदा 1980 च्या दशकात हिंदुस्थान लोटला जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी ज्या प्रकारे बेरोजगारी होती आणि सामाजिक – आर्थिक परिस्थिती बिघडलेली होती तशीच काहीशी किंवा त्याहून वाईट परिस्थिती नजीकच्या भविष्यात येऊ शकेल. त्यावेळी नुसतीच बेरोजगारी होती. जी 90च्या दशकातील उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सुधारली. अनेक जण जे शारीरिक आणि थोडीफार बौद्धिक मेहनत करू शकत होते. ते तरले, तगले. पण इंडस्ट्री 4.0 मुळे नुसती बेरोजगार लोकसंख्या निर्माण होणार नाही, तर बेकार (Useless Population) निर्माण होईल. कारण आता शारीरिक मेहनतीचं महत्त्व संपुष्टात आले असून नुसती बौद्धिक मेहनतसुद्धा कामाला येणार नाही, तर सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची कास धरून शिकत राहणे अत्यावश्यक होणार आहे आणि त्यातूनही कोणतीही शाश्वती निर्माण होणार नाही.
हिंदुस्थानसारख्या देशात जिथे अजूनही मागासलेली शिक्षण पद्धती आहे, शिकण्याचे विषय कालानुरूप बदललेले नाहीत आणि घोकंपट्टी व सर्टिफिकेटला महत्त्व आहे, तिथले तरुण देशाची तांत्रिक प्रगती कसे करतील? हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे.
जगातला तरुण देश म्हणून जो आज आपण तोरा मिरवीत आहोत, त्यासाठी तर ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. जर आपल्या मुलांना शाळेमध्ये बदललेले तंत्रज्ञान शिकवत नसतील तर त्यांची शाळा आजच बंद केलेली बरी. कारण उद्या त्यांचे भविष्य कोणीच वाचवू शकणार नाहीत. जे काही शिक्षणाचे पैसे वाचतील ते तरी तगण्यासाठी उपयोगी पडतील.
आज हॉटेल्समध्ये रोबोट्स जेवण बनवीत आहेत, वेटरचे काम रोबोट करीत आहेत. अमेरिकेत सामानाची ने-आण करण्यासाठी विनाड्रायव्हरचे ट्रक रस्त्यांवर धावत आहेत. रोबोट वृत्तनिवेदक बातम्या देत आहेत. छापील वर्तमानपत्राच्या जागी डिजिटल स्वरूपाचे वर्तमानपत्र आले आहे, जे एकदा इंटरनेटशी जोडले की, रोजच्या ताज्या बातम्या त्यात दिसतील. गावागावांमध्ये शेताला ठरावीक वेळेत आवश्यक तितके पाणी घालण्याचे काम रोबोट करीत आहेत. विमानामध्ये दोनऐवजी एक पायलट आणि एक रोबोट येत आहे.
थ्रीडी प्रिंटिंगद्वारे मोठमोठय़ा इमारती माणसांशिवाय हव्या त्या डिझाइनमध्ये बनवल्या जात आहेत. चारचाकी गाडय़ा बनविल्या जात आहेत, विमाने बनविली जात आहेत.
हे सर्व आपल्या आजूबाजूला घडत आहे! एक ना अनेक बदल हे तंत्रज्ञान घडवीत सुटले आहे. यातून आपला निभाव कसा लागणार आहे?
कविता लिहिण्याचे काम रोबोट करीत आहेत, गाण्यांना चाल लावण्याचे काम रोबोट करीत आहेत, चित्र काढण्याचे काम रोबोट करीत आहेत आणि या सर्व कलांसाठी हे रोबोट माणसांसोबत स्पर्धा करून जागतिक दर्जाची पारितोषिकेसुद्धा जिंकले आहेत.
हे रोबोट आता स्वतःच शिकत आहेत. जसे आपले आईवडील आणि नातेवाईक आपल्याला लहानपणी शिकवत होते तसे आता या रोबोटच्या सोबत डीप लार्ंनग, मशीन लार्ंनग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असे नातेवाईक आहेत, जे अक्षरशः क्षणाक्षणाला नवनवीन गोष्टी शिकवत आहेत.
ऍमेझॉन आणि अलिबाबासारख्या जगातील मोठय़ा इ-कॉमर्स कंपन्यांमध्ये गोदामांची आणि सामानांची देखभाल रोबोट करीत आहेत.
माणसांसाठी अवघड असलेली ऑपरेशन्स रोबोट लीलया करू लागले आहेत. जगभरात हॉस्पिटल्समध्ये नर्सचे काम आणि औषधे देण्याचे काम रोबोट करीत आहेत. कुठल्याही वेबसाईटवर किंवा फोनवर उत्तर देण्याची कामे रोबोट करीत आहेत.
आपल्या गरजेनुसार उपलब्ध पैशांमधून विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये सुयोग्य गुंतवणूक कशी करावी, त्यात किती जोखीम आहे, किती परतावा अपेक्षित आहे यांची माहिती रोबोट्स देत आहेत. फक्त पुनः पुन्हा करावी लागणारी कामेच नाही, तर सर्वच प्रकारची कामे, ज्यात बुद्धीचा वापर करावा लागतो ती कामेसुद्धा रोबोट करू लागले आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त नोकऱ्या आणि व्यवसाय नष्ट होणार आहेत. जर बदललेले तंत्रज्ञान अवगतच नसेल तर नवीन येणाऱ्या नोकऱ्या व व्यवसाय आपण करू शकणार आहोत का ? रोजचे जीवन जगण्यासाठी लागणारे पैसे कुठून आणणार आहोत ?
बदललेल्या तंत्रज्ञानाच्या उधळलेल्या अश्वाला लगाम घालून त्यावर स्वार होण्याचे नैतिक बळ आपल्या मानवी मनगटामध्ये आहे का?



























































