किल्लेदार – राजस गड

12782

>> विशाल देवकर, [email protected]

बेलाग… बिस्तीर्ण सह्याद्रीतले आपले गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे शिववैभव. आज या दुर्गांना मजबुत किल्लेदाराची आवश्यकता आहे. हा किल्लेदार आपल्यापैकी प्रत्येकातच आहे.

राजा शिवछत्रपती व सह्याद्री म्हणजे या महाराष्ट्राचे निर्विवाद शक्तिपीठ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तो दुर्गावरचा. राजकारण, रणकारण, स्वराज्य विस्तार करत परकीय शाह्यांशी दोन हात केले ते या दुर्गांच्या ताकदीवर. उभी हयात घालवली ती दुर्गांच्याच अंगाखांद्यावर

अफाट सह्याद्रीला पडलेले बेलाग स्वप्न. स्वराज्याची चिमुकली पावले जिथे दुडदुडली, रांगली आणि त्याच पावलांची दमदार लाथ गुलामी सुलतानीच्या छाताडावर बसली. राजाच्या राजेपणाचा आणि माणूसपणाचा सोहळा अनुभवलेला अलम हिंदुस्थानचा वास्तुपुरुष म्हणजे राजगड होय. जिथे कल्याणचा खजिना, सुरतेची लूट पावती झाली, जिथे महाराजांच्या वज्रचुडेमंडीत सईबाईसाहेब निवर्तल्या, ज्या गडाच्या कुशीतल्या धाराऊच्या दुधावर आलमगिराला धडकी भरवणारा सिंहाचा छावा पोसला, जिथे जेध्यांनी वतनावर पाणी सोडले हाच तो गड जिथे मराठय़ांची स्वराज्यलक्ष्मी कडाडली, इथे बालेकिल्ल्यात बत्तीस दातांच्या बोकडाचे औक्षण झालेय…या राजगडाच्या सदरेवर राजाचा जिवाभावाचा तानाजी घरचे लगीनकार्य टाकून देवाघरचा शिपाई व्हायला गेलाय तोच हा किल्ला राजगड होय.

मात्र आजघडीला या दुर्गाचे मोल ते काय आणि कित्येकांना? दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड, राजगड, सिंहगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी नामवंत किल्ले वगळता इतर किल्ले मात्र दुर्दशेच्या गर्तेत सापडले असून इथला एक-एक चिरा शेवटच्या घटका मोजत आहे. जेथे पूर्वी राजप्रसाद होते, राजे, शूर लढवय्ये यांचा राबता होता तेथे आज एका रात्रीच्या निवाऱ्यालादेखील सुरक्षित जागा उरलेली नाही.  प्राचीन चिरेबंदी वाडे ढासळले आहेत. गडावर जाणारे मार्ग दिवसागणिक कठीण होत चालले आहेत.  ऊन, वारा, पाऊस अन् वादळ यांच्या जोडीला अव्यवस्था, मानवी आक्रमण अन् उपेक्षा यामुळे हे दुर्ग अक्षरशः धुळीला मिळू पाहत आहेत.  आज या किल्ल्याच्या अवस्थेला सर्वस्वी कारणीभूत कोण ? दुर्गसंवर्धन, जतन होणे ही जरी वरवर खर्चिक बाब असली तरी अशक्य अजिबात नाही. आजही गडकिल्ल्यांच्या व शिवरायांच्या आस्थेपोटी गडसंवर्धनासाठी अनेक दुर्गप्रेमी उभे ठाकले आहेत आणि हेच या किल्ल्याचे आजचे खरे किल्लेदार आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर आज जेवढे काही अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण संवर्धनकार्य सुरू आहे ते सर्व काम संस्थात्मक पद्धतीने लोकबिरादरीतून होत आहे. म्हणजे गडकिल्ल्यांप्रति प्रेम असणारी काही टाळकी एकत्र येऊन, एखादी संस्था सुरू करून त्याअंतर्गत ते स्वतः श्रमदान करतात, स्वतः पै पै जोडतात आणि संवर्धनकार्याचा जगन्नाथ रथ ओढतात.  शासनाचेदेखील काही किल्ल्यांवर संवर्धनाचे उत्तमरीत्या कार्य सुरू आहे. त्यातच गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्यास बंदी हा महत्त्वपूर्ण स्वागतार्ह निर्णय शासनाने घेतला ही निश्चितच आनंददायी बाब आहे. आज दिवसागणिक किल्ल्यांना भेटी देण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र किल्ल्यांना भेटी देत इतिहास, पर्यावरण, लोकजीवन यांच्या प्रति आदर आणि जबाबदारी बाळगून वावरणे गरजेचे आहेत. पर्यटकांमुळे प्लॅस्टिक कचरा हादेखील दिवसागणिक गंभीर प्रश्न होत आहे. याला वेळीच आळा घातला पाहिजे.

गडकिल्ले, लेणी, मंदिर, स्मारके इत्यादींचा सर्वांगीण विकास झाला तर पर्यटनाला ऊर्जा प्राप्त होईल. आजही गडकिल्ल्यांच्या परिसरात राहणारे अनेक लोकही शेतीबरोबरच किल्ल्यांना भेटी देणाऱ्या पर्यटकांवर आश्रित आहेत. आज आपण गडकिल्ल्यांवर निर्धास्तपणे वावरत असताना आल्यागेलेल्यांची आपुलकीने काळजी घेणारे हेच लोक असतात. अगदी माफक दरात जेवण, राहणे इत्यादींची सोय करणारी मंडळी पाहिली की वाटते शहरी जीवनात औषधालाच उरलेल्या माणुसकीचा मात्र इथ कुबेराचा खजिना इतपतच संचय आहे. प्राथमिक पातळीवर का होईना, दुर्गाच्या पायथ्याशी असलेल्या गावागावात जनजागृती करून किल्ल्यांचे महत्त्व व त्यातून गावाचा कसा विकास होईल हे पटवून देण्यात आपण यशस्वी झालो तर गडकिल्ल्यांचेच वैभव जरी परत येणार नसले तरी आहे ते टिकून राहण्यासाठी नक्कीच मदत होईल.सर्वास पोटास लावणे आहे या हिंदवी स्वराज्याचा वचननाम्यास अनुसरून जर गडकिल्ल्यांबरोबरच त्या परिसरातील लोकांचादेखील विकास झाला तर इथली रयत पुन्हा या गडकिल्ल्यांमुळे पोटास लागू शकेल, किंबहुना हीच मंडळी गडकिल्ल्यांची पोटतिडकीने आपल्या राहत्या घरागत काळजी घेतील आणि हेच या गडकिल्ल्यांचे आजचे खरे किल्लेदार ठरतील.

आपली प्रतिक्रिया द्या