लेख – समाज परिवर्तन घडविणारे ‘योगिराणा’

833

>> प्रा. शरयू जाखडी

संतांच्या अनुभूतीची व्याप्ती अमर्याद असते. जेव्हा जेव्हा समाजाची घडी विस्कटते तेव्हा तेव्हा संतांना भूतलावर अवतार घेण्याची योजना जगन्नियंता करीत असतो. आपल्या महाराष्ट्राचे भाग्य खूप थोर आहे. ज्ञानेश्वरांपासून संत गजानन महाराजांपर्यंत अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. या संतांच्या प्रेरणेतून अठरापगड जातीतून थोर भगवदभक्तांचे भरघोस पीक या भूमीवर आलेले आहे. या संतांनी आपल्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटवून वेळोवेळी समाजजागरण केले आहे.

श्री संत गजानन महाराजांचा 142 वा प्रकटदिन 15 फेब्रुवारीला आहे. महाराजांच्या चरित्राच्या माहितीने परिपूर्ण असा ग्रंथ म्हणजे संतकवी दासगणू महाराज विरचित ‘श्री गजानन विजय’ महाराजांच्या व त्यांच्या भक्तांच्या चरित्रामृताने भरलेला असा तो अमृतकुंभ आहे. या ग्रंथातून श्री गजानन महाराजांच्या दिव्य आदर्श पुरुषाचे दर्शन घडते. संत हे समाजातील आदर्श पुरुष असतात आणि पुरुषाने पुरुषोत्तमापर्यंतचा प्रवास कसा करावा याचा ते मार्गदर्शक दीप असतात. श्री गजानन महाराज हे उच्च कोटीचे संत होते. श्री  दासगणूंच्या विवरण शैलीने अभिमंत्रित झालेल्या या प्रासादिक कथा मनोवेधक आहेत. त्यातून भक्तांची मने जिवंत होऊन आपल्याशी संवाद साधतात. या उत्कट भक्तिग्रंथातून गजानन महाराजांचे बोधात्मक विचार मनावर मनोरम ठसा उमटवून जातात. महाराजांचे हृदगत आपल्या मनाशी हितगूज साधते. हा महात्मा प्रथम शेगावच्या भूमीवर अवतीर्ण झाला. शेगावकर पौरजनांनी त्यांना भावभक्तीच्या हृदयसिंहासनावर विराजमान केले. त्या सुदृढ नात्याची नाममुद्रा ‘शेगावचा योगिराणा’ अशी झाली. महाराज कुठून आले, त्यांचे मूळ नाव-गाव काय? अशी कसलीही विचारणा न करता शेगावकर पौरजनांनी त्यांच्यासाठी भावभक्तीची पखरण केली. त्यांची चैतन्यप्रभा ओळखून बंकटलाल, पितांबर यांसारख्या सात्त्विक निरागस भक्तांनी महाराजांना पाहताक्षणी समर्पणाचा धूप त्यांच्या पायी लावला. महाराजांना काही मंडळींच्या विरोधाचाही सामना करावा लागला. त्याच्याही उद्बोधक कथा आपल्याला वाचायला मिळतात. महाराज प्रकट झाले तेव्हा त्यांच्या योगसामर्थ्यामुळे काही अद्भुत कथा घडल्या गेल्या. संतांच्या अनुभूतीची व्याप्ती अमर्याद असते. जेव्हा जेव्हा समाजाची घडी विस्कटते तेव्हा तेव्हा संतांना भूतलावर अवतार घेण्याची योजना जगन्नियंता करीत असतो. आपल्या महाराष्ट्राचे भाग्य खूप थोर आहे. ज्ञानेश्वरांपासून संत गजानन महाराजांपर्यंत अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. या संतांच्या प्रेरणेतून अठरापगड जातीतून थोर भगवदभक्तांचे भरघोस पीक या भूमीवर आलेले आहे. या संतांनी आपल्या कार्याचा ठसा समाजमनावर उमटवून वेळोवेळी समाजजागरण केले आहे. म्हणूनच आपण कृतज्ञतेच्या भावनेतून संतांचे प्रकटदिन साजरे करतो.

गजानन महाराजांनी आपल्या जीवनकार्यात व्याख्याने, प्रवचने दिली नाहीत, पण त्यांच्या कृती व उक्तीतून परिवर्तनाची पहाट भक्तांच्या मनात उमटत असे. अतिंद्रिय ज्ञानामुळे हा योगी भक्तांच्या मनाचा वेध घेत आणि त्यांच्या कुवतीनुसार त्यांचे प्रबोधन करीत असे. भक्तांना या चैतन्यसूर्याच्या भोवती भ्रमण करण्यात परमानंद वाटत असे. महाराजांच्या अस्तित्वाने सात्त्विक श्री-पुरुषांच्या संवेदना विश्वात प्रेमरसाचे नंदनवन निर्माण झाले. तरीही काही सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी महाराजांना निर्णय घ्यावे लागले. मुख्य म्हणजे शेगावात त्यावेळी दुफळी होती. त्यातून गावात संघर्ष निर्माण होत होते. सत्तासंपत्तीच्या धुंदीतून अन्याय घडत होते. महाराजांनी अशावेळी आपल्या योगसामर्थ्याचा उपयोग करून मुजोर व्यक्तींना नामोहरम केले. त्यांच्या सत्तासंपत्तीला विधायक वळण दिले. सामाजिक कर्तव्ये आणि नीतिन्यायाबद्दल त्यांच्या मनात सकारात्मक बदल घडवले. मोठमोठे सत्ताधीश या फकिराच्या चरणी विनम्र झाले. महाराजांचे बोलणे कोमल, कुशल, स्नेहार्द्र होते. त्यामुळे कमळात भृंग अडकून पडावेत तसे त्यांचे भक्त महाराजांच्या पेमात पडले. महाराजांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण झाला. समाजात साहचर्याचे वातावरण निर्माण झाले. त्याचे पडसाद आजही आपल्याला शेगावच्या समाधी मंदिरात पाहायला मिळतात. पैशांचा योग्य विनियोग करून निस्पृह भावनेने मठाचा कारभार पाहणारी मंडळी तिथे आहेत. महाराजांना दांभिकता, परमार्थातील खोटेपणा आणि भ्रष्टाचार चालत नसे. असे लोक मठात दिसले तेव्हा महाराजांनी त्यांना तिथल्या तिथे शासन करून मठातून घालवून दिले. त्याबाबत किंचितही दया-माया महाराजांनी दाखवली नाही. वेदविद्यासंपन्न योगी असूनही कर्मठपणाचे सोवळेओवळे करून त्यांनी आपल्यात भक्तांत अंतर निर्माण केले नाही. भेदातीत वातावरण निर्माण केले. स्त्र्ााr-पुरुषांना समानतेने वागवून आत्मविकासाचा मार्ग मोकळा केला. बायजासारख्या निर्मळ मनाच्या शिष्येवर अन्याय झाले तेव्हा त्यांनी कठोर शब्दांत तिच्या घरच्यांची व समाजाची कानउघाडणी केली. महाराजांचा सुशिक्षित तरुण वर्गावर प्रभाव पडत असे. समाजभान लक्षात घेऊन संभ्रमित तरुणांना वात्सल्यपूर्ण समुपदेशनाच्या भूमिकेतून त्यांच्यात विचारपरिवर्तनाची क्रांती घडवली. अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर करायला त्यांनी शिकवले. वासुदेवानंद सरस्वतींसारख्या थोर विभूती महाराजांच्या भेटीला येत असत. लोकमान्य टिळकांच्या अकोल्याच्या सभेला महाराज हजर होते. तेव्हा टिळकांनी त्यांना समर्थ रामदासांची उपमा देऊन अभिवादन केले होते. अतिशय निस्पृह असणाऱ्या या योग्याने उदार मनाने शिष्यांचे आर्त पुरवले. आजही शरणागताला ते सुख देतात याचा लाखो भक्तांना प्रत्यय येतो.

आपली प्रतिक्रिया द्या