
- रोहिणी निनावे [email protected]
गजेंद्र अहिरे. नाटक, मालिका, चित्रपट… लेखन, दिग्दर्शन. खऱ्या अर्थाने हुनरबाज कलावंत. आपण जे करू ते उत्तमच हा प्रचंड आत्मविश्वास त्याच्या कामातून जाणवत राहतो.
गजेंद्र अहिरे… अनेक वर्षांपासून हे नाव गाजतं आहे. ‘कवी तो आहे कसा आननी ’ या उक्तीप्रमाणेच लेखक, दिग्दर्शक आहे कसा आननी हे देखील प्रेक्षकांनी क्वचित पाहिले असते. मी आणि गजेंद्र अहिरे आम्ही साधारण एकाच वेळी करीअरला सुरुवात केली. तो अतिशय बिझी लेखक आहे, एवढंच माहीत होतं. खरं तर तो खूप कमी बोलणारा आणि कदाचित आढ्यताखोर असेल अशीही माझी समजूत होती, पण काही काळाने हा गैरसमज दूर झाला.
गजेंद्र भेटायला आला तोच एका परदेशी कंपनीच्या चित्रपटाच्या संदर्भात कुणाशीतरी बोलत… गजेंद्र त्याच्या करीअरबाबत नेहमीच फोकस्ड राहिला आहे. आणि पिक्चर अभी बाकी है… असं त्याचं करीअरच्या बाबतीत म्हणणं आहे! पुन्हा एकदा बिग मग कॅफेमध्येच भेटलो. अधिकारी ब्रदर्स, जिथून आमच्या करीअरची सुरुवात झाली होती, त्या इमारतीच्या मागच्या लेनमध्येच हा कॅफे आहे. गजेंद्र म्हणाला, मी वयाच्या तिसऱ्या वर्षीच मनातल्या मनात गोष्ट लिहून डायरेक्ट केली होती असं म्हण ना… मला खूप हसू आलं. तो म्हणाला, मी खूप गोष्टी रचून सांगायचो. फेकूचंद होतो. पण यातच कुठेतरी स्टोरीटेलर दडला असावा!
आमच्या एक बाई होत्या मनीषा बर्वे. त्यांनी मला सांगितलं, मनात येतं ते सगळं लिहून काढत जा. मला जुनी हिंदी गाणी खूप आवडायची. ती खूपदा बघितली नसायची. मग मी मनातल्या मनात चित्रीकरण करायचो. याच क्षेत्रात काम करायचं हे माझं आधीच ठरलं होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर मी एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सेटिंग, लायटिंग सगळंच! राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत भाग घेत होतो. मी लिहिलेलं ‘गावकुसाबाहेरचं गाव’, ‘कॉकी पॉपीची गोष्ट’ ही नाटकं खूप गाजली. वयाच्या 23व्या वर्षी मी माझं पाहिलं मोठं नाटक लिहिलं, ते म्हणजे ‘आईचं घर उन्हाचं’. मला बक्षिसं मिळाली, नाव होत गेलं. ऑफर्स येत गेल्या… सुरुवात झाली.
सिरीयल्सकडे कसा काय वळलास? असं मी विचारल्यावर त्याने सांगितलं, आधी मी राजन वाघधरेंकडे ‘श्रीमान श्रीमती’ लिहायला लागलो. त्यानंतर अधिकारी बंधूंची प्रसिद्ध मालिका ‘वक्त की रफ्तार’ लिहायला लागलो. नंतर ‘बंदिनी’, ‘प्रतिबंध’ अशा एका पाठोपाठ 23 मालिका केल्या. 2 वर्षांत 1700 एपिसोड लिहिले. सेटवर बसून लिहायचो. एक वेळ अशी आली की लिहून लिहून माझं डोकं प्रचंड दुखायला लागलं. मग मी ब्रेक घेतला. नंतर मी एक चित्रपट केला ‘कृष्णाकाठची मीरा’, जो पैशांअभावी प्रदर्शितच झाला नाही. पण मग मी ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ केला आणि त्या नंतर वळून बघितलं नाही.
मी विचारलं, कशा प्रकारचे चित्रपट बनवायला तुला आवडतात? तुझे चित्रपट ऑफबीट असतात आणि विषयातही खूप वैविध्य असतं. गजेंद्र म्हणाला, मला सुचलेली गोष्ट मला आवडली की मगच मी चित्रपट लिहायला बसतो. मीनिंगफुल असं काही चित्रपटांत असायला हवं.
मी हसत म्हटलं, तू संख्येने खूप चित्रपट खूप कमी वेळात बनवतोस असं तुझ्याबद्दल बोललं जातं. ‘गजेंद्राची फॅक्टरी’च म्हण ना… गजेंद्र म्हणाला, असं बाकीच्यांना वाटतं. एखादा चित्रपट, एखादी गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की असेल तर तो चित्रित करण्यासाठी जेवढा वेळ लागायचा तेवढाच लागतो, पण त्यासाठी जे प्लॅनिंग हवं, ते खूपजणांकडे नसतं, जे माझ्याकडे आहे. मी फक्त इन्स्टंट चित्रपट बनवले असते तर आज माझ्या नावावर इतके चित्रपट असते का? एवढे नामवंत कलाकार माझ्या चित्रपटात काम करायला तयार झाले असते का?
मी म्हटलं, बरोबर… याच्याशीच संबंधित पुढे बोलायचं होतं. तुझ्या चित्रपटात मोठं मोठे कलाकार असतात नेहमी… म्हणजे निळू फुले, विक्रम गोखले, रीमा लागू… इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर सुरुवातीलाच काम करताना तुला दडपण नाही आलं? गजेंद्र म्हणाला, दडपण कसलं? काम सुरू असतं तेव्हा मी दिग्दर्शक आणि ते अभिनेते असतात. त्यांचाही हाच दृष्टिकोन असतो. पण मला खूप काही शिकता आलं या मातब्बर अभिनेत्यांकडून.
मी म्हटलं, तू जुन्या पिढीबरोबर काम केलं आहेस तसं नव्या पिढीसोबतही केलं आहेस. या नवीन पिढीविषयी तुला काय वाटतं? कितपत तयारीने ते आले असतात? गजेंद्र म्हणाला, आजची पिढी अधिक हुशार झाली आहे, विशेषतः चित्रपटात काम करणारी. चित्रपटाचा बदलणारा चेहरामोहरा, या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी हवा असलेला प्रोफेशनल ऍटीट्यूड त्यांच्याकडे आहे. ते त्यांचं काम व्यवस्थित करतात आणि जोवर माझ्या मनाजोगतं काम होत नाही, मीही शॉट ओके करत नाही.
मी म्हटलं म्हणजे आपण नवीन पिढीकडून काही अपेक्षा करू शकतो… गजेंद्र म्हणाला, आता त्यांच्याकडूनच अपेक्षा आहेत! ते इथे काम करायलाच येतात. मीसुद्धा गजेंद्रच्या या मताशी सहमत आहे.
मी म्हटलं, खूपदा यश अभिनेत्री वा अभिनेत्यांच्या डोक्यात जातं आणि ते दिग्दर्शकाला शिकवू लागतात. याविषयी तुला काय म्हणायचंय?
गजेंद्र म्हणाला, प्रत्येक अभिनेत्याने हे समजून घ्यावं की त्याला ज्या टाळ्या मिळतात, त्यामागे त्याच्या टॅलेंटबरोबरच आणखी सत्तर लोकांची मेहनत असते. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, मेकअपमन, साऊंड, म्युजिक अगदी कटर पकडणारासुद्धा…
तुझे अनेक चित्रपट फेस्टिव्हलला येतात, बक्षिसं मिळवतात. हे कसं काय घडलं? गजेंद्र म्हणाला, आपला चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून मी तो फेस्टिव्हलला पाठवायला सुरुवात केली. मी काही फक्त पुरस्कारासाठी चित्रपट बनवत नाही, पण आपण केलेल्या कामाची ही दखल असते. चित्रपट एका वर्तुळाबाहेर पोहोचतो. आपलीही दृष्टी विस्तीर्ण होते. मला खूप ऍवॉर्ड्स मिळाली आहेत, पण ऍवॉर्ड्स मिळाली म्हणून मी हुरळलो नाही आणि थांबलोही नाही. मला अजून खूप काही करायचंय. मला बायोपिक करायचा आहे. पूर्णपणे सायलेंट असा चित्रपट करायचा आहे. सध्या तरी मी परदेशी सिनेमा करण्याच्या गडबडीत आहे.
मी म्हटलं, बायोपिकविषयी काय म्हणणं आहे, तू हल्लीचे चित्रपट पाहिले का? अचानक बायोपिक्स का यायला लागले आहेत असं वाटतं तुला? गजेंद्र म्हणाला, मी सहसा चित्रपट पाहत नाही आणि पाहिले तरी समीक्षा करत बसत नाही. कुणीतरी खूप कष्टाने सिनेमा बनवला असतो, त्यावर टीका करणे मला योग्य वाटत नाही. प्रत्येक काळात चित्रपटाचा ट्रेंड बदलतो. नवीन ट्रेंड येतो त्याप्रमाणे सध्या बायोपिकचा ट्रेंड आला आहे. काही जुन्या विशेष काम केलेल्या व्यक्तीचा जीवनपट उलगडून दाखवला तर हे समाजासाठी चांगलंच आहे की… चित्रपट चांगला किंवा वाईट नसतो… तो एक तर भिडतो किंवा भिडत नाही!
मी म्हटलं, मी बघितलंय तुझे सगळे चित्रपट तूच लिहितोस. असं का? गजेंद्र म्हणाला, कारण मी लेखक आहे. जेव्हा एखादी गोष्ट मला सुचते तेव्हा मी विचार करायला लागतो की कोण हे सगळ्यात चांगलं लिहू शकेल, तेव्हा माझ्या मनासमोर एकच नाव येतं. गजेंद्र अहिरे…! माझी गोष्ट माझ्याइतकी चांगली कोण सांगू शकेल, लिहू शकेल? किंवा ती साकार करू शकेल?
मी विचारलं, आज निर्माता-दिग्दर्शकांपुढे काय आव्हान आहे असं तुला वाटतं? त्यावर गजेंद्र म्हणाला, खूप मोठं आव्हान आहे. कारण आता सिनेमा ग्लोबल झाला आहे. आता स्पर्धा एकमेकांशी नाही, ग्लोबल झाली आहे. गावं छोटी शहर बनताहेत. भाषेला सीमा उरलेल्या नाहीत. प्रेक्षकांसाठी खूप चॉईस निर्माण झाला आहे. त्यांना थिएटरमध्ये चित्रपट बघायला ओढून आणणं खूप कठीण आहे. आज ज्याचा त्याचा स्वतःचा डिवाइस आहे. नवीन नवीन चित्रपट लगेच ऍमेझॉन, नेटफ्लिक्सवर दिसतात. शिवाय खोट्या गोष्टींपेक्षा आपण ज्याला ‘स्लाइस ऑफ लाईफ’ म्हणतो त्या गोष्टी जास्त चालताहेत. पुस्तकामधला कंटेंट आता चित्रपटात आला आहे. एक पुस्तक वाचल्याचा अनुभव प्रेक्षकाला येतो आहे.
हल्ली नेटवरच्या काही वाहिन्यांवर क्राईम, सेक्सचा अतिरेक दिसतो आहे. हे जास्त विकलं जात आहे का? गजेंद्र म्हणाला, हे सगळं तात्पुरतं आहे. या गोष्टी फार टिकत नाहीत. हे बघून ही माणसाची नजर एका पॉईंटला मरते. न्युडिटी हाच कॉस्च्युम होतो. चिरंतन आहेत त्या मानवी भावना. आणि त्याच शेवटपर्यंत टिकून राहणार!





























































