
>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर
काळानुरूप व बदलत्या जीवनशैलीनुसार परिवर्तन होत राहणार यात दुमत नाही. परंतु आज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाकडे वाटचाल करत असताना कोरोना या संकटामुळे सर्वच गोष्टीवर विपरीत परिणाम झाले आहेत. आज केवळ गणेशोत्सव नव्हे, तर इतरसुद्धा धार्मिक सण-उत्सवाच्या माध्यमातून प्रचंड पैशाची उलाढाल होत असते. सण व उत्सवांचा मूळ हेतू व उद्देश सर्वांनी एकत्र येऊन आनंद व उत्साहाने साजरा करावयाचा. परंतु मागील काही वर्षांत बाजारीकरण होत चालले असून ते एखाद्या इव्हेंटप्रमाणे साजरे केले जात असून त्याचे मार्केटिंगसुद्धा मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. हे कमी की काय म्हणून सेलिब्रेटी, सिने अभिनेते-अभिनेत्री व राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीने प्रत्येक गणेशोत्सव मंडळ आपली प्रसिद्धी करण्यात मशगूल झालेले आपण पाहिले. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव हाच आहे काय, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केवळ या वर्षी कोरोनाचे संकट आहे म्हणून अत्यंत साधेपणाने व खर्च कमी करून उत्सव साजरा करणे ही भूमिका खरोखरीच स्वागतार्ह आहे. कित्येक दिग्गज सार्वजनिक उत्सव मंडळांनी विविध आरोग्यसेवेशी निगडित असे उपक्रम आखलेले आहेत. तर ज्या गिरगावात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला त्याच परिसरातील काही चाळींनी आपली शंभरहून अधिक वर्षांची परंपरा अबाधित ठेवली आहे. त्यापैकीच एक फणसवाडी येथील जगन्नाथ चाळ ‘धरमैक्य संरक्षक संस्था’ ही आपले यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. मागील एक वर्षापासून हा सोहळा पूर्ण जल्लोषात साजरा करण्यासाठी तेथील सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत होते, पण कोरोना संकटामुळे त्यावर पाणी पडले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आदी मान्यवर तसेच अनेक दिग्गज व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चाळीला एक इतिहास, परंपरा आहे ती आजवर जपली गेली आहे. आज या 125 वर्षांच्या परंपरेत खंड न पडता परिस्थितीनुसार त्या उत्सवाचे स्वरूप बदलून धार्मिक कार्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करून सामाजिक भान जपण्याचा मानस या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अंगी बाळगला आहे. हे सर्व करताना राज्य शासनाच्या आदेशाच्या नियमावलीचे पालन करून हा उत्सव अत्यंत साधेपणाने करावयाचे ठरवले आहे. आज मुंबईतील तिसरा गणेशोत्सव म्हणून याची ख्याती आहे आणि त्या परंपरेत खंड पडू नये, ती अबाधित राहावी या दृष्टिकोनातून केवळ गणपतीसाठी आकर्षक कायमस्वरूपी देव्हारा व मंदिरासारखे कटआऊट बनवून पर्यावरणाचे भान अधोरेखित केले आहे.
रहिवाशांच्या जिवाशी खेळ
>> वैभव मोहन पाटील
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. साधारणपणे पाच ते सात वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. 45 फ्लॅट असलेली ही इमारत गेल्या काही महिन्यांपासून हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने इतकी मोठी दुर्घटना घडल्याचे स्पष्ट होते. शिवाय दुर्घटनेच्या दिवशी इमारतीचा एक पिलर (खांब) देखील ढासळला असल्याचे दिसून आले आहे. वास्तविक अशा अनेक इमारती सर्वत्र जलद गतीने उभारण्यात आलेल्या आहेत. त्यावर नियंत्रण राखण्यात स्थानिक यंत्रणा अपयशी ठरत असल्याने लोकांची फसवणूक करणारे बिल्डर लोकांना लाखोंचा चुना लावून पसार होतात. त्यांनतर काही वर्षांनी इमारतींच्या बांधकामातील उणिवा जाणवायला लागतात. याकडे दुर्लक्ष केले तर महाडसारख्या दुर्घटना घडतात हे वारंवार घडलेल्या उदाहणांवरून दिसून आले आहे. मात्र याला खरा जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे. इमारत उभारण्यासाठी ठरावीक नियमावली सरकारने घालून दिलेली आहे. मात्र आर्थिक व्यवहारांत गुंतलेले लोक याला फाटा देऊन आपला स्वार्थ साधून घेतात व लोकांच्या जिवाशी खेळतात. सरकारने कधीतरी याचा गांभीर्याने विचार करून अशा घटकांवर कडक कारवाई करायला हवी. इमारतींचे पारदर्शक पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवे. कमकुवत व निकृष्ट साहित्य वापरलेल्या इमारती त्वरित रिकाम्या करून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे आदेश संबंधिताना द्यायला हवेत.




























































