मुद्दा – गणेशोत्सव : राष्ट्र आणि धर्मजागृतीचे कर्तव्य

1003

>> डॉ. उदय धुरी

श्री गणेश हे समस्त हिंदू बांधवांचे आराध्य दैवत आहे. हिंदू लोक मोठय़ा श्रद्धेने आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करत असताना तो शास्त्रानुसार साजरा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण गणेशोत्सव हा काही मौजमजेचा विषय नसून त्यातून श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने गणेशोत्सवातील शास्त्र्ा जाणून त्यानुसार कृती करून अधिकाधिक आध्यात्मिक लाभ करून घ्यायला हवा. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीची चेतना युवकांमध्ये जागृत केली. धार्मिक उत्सवाला राष्ट्रकार्याची जोड दिली. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवातून जे साध्य केले, ते स्वातंत्र्योत्तर काळात आपण का करू शकत नाही?

राष्ट्र आणि धर्म यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचा लोकमान्यांचा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना आपण नेहमी ध्यानात ठेवायला हवा. आजही राष्ट्रप्रेम जागृत करणारे देखावे गणेशोत्सवात काही प्रमाणात दिसून येतात; नाही असे नाही. त्याच जोडीला दुर्मिळपणे काही उद्बोधक व्याख्यानमालाही असतात; पण लोकमान्यांच्या काळात उद्बोधन हाच मुख्य उद्देश होता. आज ती जागा करमणुकीने घेतली आहे. ज्यांची सकलकलानिधी गणरायावर श्रद्धा आहे, त्या सर्वांनी याविषयी आत्मावलोकन केले पाहिजे असे वाटते. सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा त्याची पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, हे आपल्या सर्वांचे पवित्र कर्तव्य आहे आणि तसे करणे शक्यही आहे. गणेशोत्सवातील अपप्रवृत्तीचे उच्चाटन करून श्री गणेशाची कृपा संपादन करा!

सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र्ा सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल! सात्त्विक मूर्तीची पूजा करून अधिकाधिक आध्यात्मिक लाभ मिळवा! चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्ती बनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्ती बनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी! मूर्ती पाटावर बसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसार बनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो.

सध्या पर्यावरणपूरक म्हणजेच ‘इको फ्रेंडली’ नावाने विविध वस्तूंच्या मूर्ती तयार केल्या जातात. यामध्ये कागदी लगद्याची मूर्ती ‘इको फ्रेंडली’ असल्याचा प्रचार मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पुणे यांनी दिनांक 30/9/2016 रोजी कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. न्यायाधिकरणासमोर हे सप्रमाण सिद्ध झाले आहे की, ‘माटुंगा, मुंबईतील शासकीय संस्था अर्थात ‘रसायन तंत्रज्ञान संस्था’, तसेच पर्यावरणतज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार 10 किलो कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे 1000 लिटर पाणी प्रदूषित होते. त्या पाण्यात झिंक, क्रोमियम, कॅडमियम, टायटॅनिअम ऑक्साईड असे विषारी धातू आढळून आले. तसेच पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा शून्यावर आली, जे पर्यावरणास घातक आहे.’ त्यामुळे कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत, या अपप्रचाराला बळी न पडता शाडूच्या मूर्तीलाच प्राधान्य द्या!

(मुंबई प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती )

आपली प्रतिक्रिया द्या