देवा तूचि गणेशु

>> विवेक दिगंबर वैद्य

अनेक संतश्रेष्ठ श्रीगणेशाच्या प्रतिमेशी निगडित असल्याचे पाहावयास मिळते. श्रीगणेश निर्गुण निराकार अशी आरंभदेवता असल्यामुळे संतश्रेष्ठांच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रत्येकास खुणावणारे स्वयंभू तत्त्व आहे. अनेक संतश्रेष्ठांनी श्रीगणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे किंवा त्यांच्या स्मृतीस्थानी तरी श्रीगणेशमूर्तीची स्थापनाच करण्यात आलेली आहे. म्हणूनच, श्रीगणेश या दैवताकडे संतश्रेष्ठांचे ‘स्थान’माहात्म्य वाढविणारे दैवत म्हणूनही पाहता येते.

ओंकार’ हे श्रीगणेशाचे ‘मूळ’रूप आहे. ज्या नादमय ‘ओम’कारातून विश्व साकारले त्या ‘ओंकार’तत्त्वाचा उल्लेख श्रीतुकाराम महाराज ‘श्रीगणेशाचे प्रधान रूप’ असा करतात. हे श्रीगणेशरुप तिन्ही देवांचे जन्मस्थान आहे असे सांगून ब्रह्मदेवाचा ‘अ’कार, विष्णुचा ‘उ’कार आणि श्रीशंभूमहादेवाचा ‘म’कार यातून प्रकटलेला ‘ओंकार’ स्वयंभू असून हे परिपूर्ण श्रीगणेशरूप समस्त वादविवादांच्या पलीकडे आहे असेही ते श्रीगणेशाच्या ‘रुपगुण-वर्णनपर’ अभंगात सांगतात. तर भक्तसंकटांचा समूळ नाश करण्यासाठी श्रीगणेश उभा ठाकलेला असून ’चौदा विद्या, तुझ्या कृपे येतील। मुके बोलतील वेदघोष। असे सांगत श्रीगणेशाची कृपा होताच मुके जीवही वेदांचा जयघोष करतील अशी खात्री श्रीनामदेव महाराज बाळगतात. या सोबतच, ‘सूक्ष्माहून सूक्ष्म सान। तयामाजी तुझे अधिष्ठान। यालागी मूषक वाहन। नामाभिधान तुझे’ असे सांगताना उंदरासारखे लहानसे वाहन घेताना विश्वातील सूक्ष्म व लहानसान गोष्टींवरही आपले उत्तमप्रकारे अधिष्ठान आहे हेच श्रीगणेश दाखवून देत असावा असे श्रीएकनाथ महाराजांना वाटते.

श्रीगणपती ही विद्येची देवता आहे, कलाधिपती आहे म्हणून श्रीज्ञानदेवांनी विश्ववंद्य श्रीगणेशास वंदन करुन ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथारंभ केलेला आहे. माऊली श्रीगणेशाला शब्दब्रह्माचे रूपक मानतात. ‘अकार चरणयुगल। उकार उदर विशाल। मकार महामंडल। मस्तकाकारे’ असे रुपवर्णन करताना माऊली ‘ओम’ हा गणेशाचा रुपाकार आहे असे सुचविते व ‘हे तिन्ही जेथ एकवटले। तेथ शब्द ब्रह्म कवळले। ते मिया श्रीगुरुकृपा नमिले। आदिबीज’ असे म्हणून त्यास वंदन करते. माऊलींना श्रीगणेशाचे विविध अवयव, रुप, वेशभूषा, अलंकार व आयुधे यांच्या जागी शब्द, प्रबंध, सिद्धांत, काव्य, नाटकादी वाङमयकृतींचा भास होतो. त्यांचा ‘गणेशु’ वाङमयरुप घेत अवतरलेला ‘अक्षरगणेश’ आहे. ‘अक्षर’ब्रह्माचे आदिबीज आहे. तो केवळ ‘आद्य’ नसून ‘वेदकाला’च्या पूर्वीही अस्तित्वात असल्याचे माऊली सांगते.

जनप्रिय श्रीगणेश दैवताचे आगळे ‘शब्दशिल्प’ श्रीरामदासस्वामींनी साकारले आहे. समर्थांनी ‘नृत्य’ गणेशाचे रुप साकारलेले आहे. संतश्रेष्ठांनी त्यांच्या काव्यरचनेतून श्रीगणेशाचे सगुण रुप प्रभावीपणे साकारले आहे. श्रीतुकाराम, श्रीनामदेव, श्रीएकनाथ, श्रीज्ञानेश्वरादी संतकवींपासून श्रीमोरया गोसावी, श्रीधर, श्रीकृष्णदयार्णव, श्रीचिंतामणी महाराज, श्रीमुत्तेश्वर, श्रीदासगणू, श्रीसोमयाजी, श्रीअमृतराय, श्रीसरस्वती गंगाधर, श्रीअनंतसुत अशा हजारो कविश्रेष्ठांची लेखणी श्रीगणेशाच्या गुणरुपवर्णनार्थ बहरुन आल्याचे दिसते. सर्वसामान्य ते असामान्यांपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱया श्रीगणेशाची दखल संतश्रेष्ठांनी घेतली आहे. 17व्या शतकापर्यंत श्रीज्ञानेश्वरादी संतश्रेष्ठ आणि त्यानंतर अवतरलेल्या संतश्रेष्ठांच्या मांदियाळीनेह श्रीगणेशाचे गुणगान केलेले आहे. निजामशाही राजवटीत लाडवंती येथे जन्मलेल्या व सकलमत संप्रदायाचे संस्थापक असलेल्या चतुर्थ दत्तावतार श्रीमाणिकप्रभू महाराज यांनी श्रीगणेशवर्णन करताना स्तुतीपर पद व आरती रचलेली आहे. त्यांचे उत्तराधिकारी श्रीमार्तंड माणिकप्रभू यांनीही वेगवेगळ्या रागावर आधारित श्रीगणेशस्तुतीपर चार पदे रचलेली आहेत.
सन 1857 मध्ये अक्कलकोट येथे येऊन तिथेच कायमचे स्थिर झालेल्या श्रीस्वामीमहाराजांच्या चरित्रग्रंथामध्ये श्रीगणेश दैवताचे उल्लेख आढळतात. अक्कलकोट येथील कुरुंदवाडकर पटवर्धनांचे स्वयंभू श्रीगणेश मंदिर आणि जुन्या राजवाडय़ानजीक असलेले श्रीगणेश पंचायतन मंदिर येथे श्रीस्वामीसमर्थ अनेकदा जाऊन बसत. अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाडय़ात ते अधूनमधून वास्तव्यही करीत असत. मजेची गोष्ट अशी की राजवाडय़ाच्या मुख्य दरवाजावरील गणेश चौकटीला स्पर्श करून श्रीस्वामी राजवाडय़ात प्रवेश करीत. श्रीस्वामीसमर्थांची उंची सर्वसामान्यांपेक्षाही अधिक होती. किल्ल्याच्या उंच प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीची उंची त्यापेक्षा अधिक असते. त्या पट्टीवर स्थापित श्रीगणेशमूर्तीच्या चरणांपर्यंत श्रीस्वामींचा हस्तस्पर्श होत असे यावरून त्यांची प्रचंड अमानवीय उंची समजून येते.

अनेकदा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून गणेशपट्टीला स्पर्श करुन आत जाताना या गणेशाकडे कौतुकाने पाहात ‘मेरा गण्या’ असे म्हणत. बुधवार पेठेतील श्रीस्वामीसमाधी मंदिरातील मयूरेश्वर श्रीस्वामीमहाराजांनी स्थापन केला. भक्तश्रेष्ठ चोळप्पांच्या घराच्या आवारात झाडाखाली प्रकट झालेला अमूर्त रुपातील ‘मांदार गणेश‘ही श्रीस्वामीसमर्थ व श्रीगणरायाच्या एकत्वाचे दर्शन घडवितो.

महाराष्ट्रातील शेगांव येथे अवतरलेले श्रीगजानन महाराज त्यांच्या ‘गण-गण’च्या नामजपामुळे ‘श्रीगजानन’ म्हणून ओळखले जातात. ‘गण-गण’च्या नित्य जपामुळे शेगांवकरांनी त्यांचे नामकरण गणपती वा गजानन असे केले. शेगांवी येण्याआधी श्रीगजानन महाराज यांनी नाशिक जवळील इगतपुरी तालुक्यातील कावनई गावामध्ये श्रीकपिलधारा तीर्थ परिसरात तपश्चर्या केली आणि येथे त्यांनी दगडातून स्वयंभू साकारलेली श्रीगणेशमूर्ती स्थापन करुन त्यांच्या तपश्चर्येचा श्रीगणेशा केला. श्रीमहाराजांनी अवतारकार्य पूर्णत्वाला नेताना, दीड दिवसाचा गणपती ज्या दिवशी विसर्जित होतो त्या ऋषीपंचमीस समाधी घेतली. यामुळे अनेक भक्त श्रीगजानन महाराजांना ‘श्रीगणेशरुप’ मानतात.
अनेक संतश्रेष्ठ श्रीगणेशाच्या प्रतिमेशी निगडित असल्याचे पाहावयास मिळते. श्रीगणेश निर्गुण निराकार अशी आरंभदेवता असल्यामुळे संतश्रेष्ठांच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे, प्रत्येकास खुणावणारे स्वयंभू तत्त्व आहे. नामजपसाधनेस महत्त्व देणाऱया श्रीगोंदवलेकर महाराज यांचे मूळ नाव गणपती होते. अन्य अनेक संतसज्जनांचे नाव श्रीगणेशनामाशी साधर्म्य राखणारे होते. अनेकांच्या श्रद्धास्थानांत श्रीगणेशाचा समावेश अग्रक्रमाने होत असतो. अनेक संतश्रेष्ठांनी श्रीगणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे किंवा त्यांच्या स्मृतीस्थानी तरी श्रीगणेशमूर्तीची स्थापनाच करण्यात आलेली आहे. म्हणूनच, श्रीगणेश या दैवताकडे संतश्रेष्ठांचे ‘स्थान’माहात्म्य वाढविणारे दैवत म्हणूनही पाहता येते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या