
>> प्रसाद ताम्हनकर
विचार करा, तुम्ही अगदी शांत, निवांत असे आयुष्य जगत आहात. जिवाला, मालमत्तेला जपत आहात, सर्व काळजी घेत आहात; अन् अचानक एके दिवशी अंतराळात भरकटलेल्या आणि क्षतिग्रस्त झालेल्या एखाद्या अंतराळ यानाचा तुकडा तुमच्या घरावर येऊन पडला तर? एकेकाळी कल्पनेपलीकडे वाटणारी ही घटना आता सहजपणे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तुमचे झालेले नुकसान कोण भरून देणार? या प्रकारच्या दुर्घटनेसाठी काही इन्शुरन्स असतो का? हे यान समजा एखाद्या दुसऱ्या देशाचे किंवा परदेशी कंपनीचे असेल, तर जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत.
सध्या अंतराळ सफरीच्या क्षेत्रात जगभरातील अनेक मोठय़ा कंपन्या आपले पाय रोवत आहेत. मोठय़ा प्रमाणावर खासगी कंपन्यांच्या या स्पर्धेमुळे अंतराळातील वाहतूक आणि कचरादेखील प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. यामुळे पृथ्वीच्या कक्षेत येऊन पृथ्वीवरती आदळू शकणाऱ्या अंतराळ कचऱ्याची भीतीदेखील मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. या अंतराळातील कचऱ्याला ‘स्पेस डेबरीस’ असे म्हटले जाते. एका अहवालानुसार जानेवारी 2020 पर्यंत अंतराळात साठलेल्या अशा कचऱ्याचे वजन 8000 मेट्रिक टनपेक्षा देखील जास्त होते.
काही महिन्यांपूर्वीच चीनचे एक अंतराळ यान अंतराळात भरकटले आणि क्षतिग्रस्त झाले. या यानाचे वजन तब्बल 20 हजार किलो इतके प्रचंड होते. याचा एक अनियंत्रित तुकडा पृथ्वीच्या कक्षेत घुसून, मालदीवजवळ हिंद महासागरात कोसळला. यापूर्वी देखील मे 2020 मध्ये देखील चीनचे असेच एक रॉकेट अनियंत्रित होऊन पश्चिम आफ्रिकेच्या तटावर कोसळले होते. यानंतरच खरे तर या चर्चेने जोर पकडला होता. अशा दुर्घटनेत नुकसान झाल्यास भरपाई मिळते का? तर याचे उत्तर ‘हो’ असे आहे! जगभरातील विविध देशांनी आपापसात करार करून अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय करारांना मान्यता दिलेली आहे, ज्यांच्या मदतीने अशा दुर्घटनेत झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीबद्दल मोबदला मिळू शकणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर `Outer Space Treaty (1967)’ आणि `Liability Convention (1972)’ हे प्रमुख असे दोन कायदे आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तांनीदेखील या कायद्याच्या नियमांचा स्वीकार केला असून, या कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही देशाचे अंतरिक्ष यान दुर्घटनाग्रस्त होऊन दुसऱ्या एखाद्या देशाच्या हद्दीत कोसळल्यास, हा त्या दोन देशांमधील सरकारचा मुद्दा असेल. या कायद्यांनुसार ज्या देशाचे यान दुर्घटनाग्रस्त झाले असेल, तो देश आंतरराष्ट्रीय पातळीवर या दुर्घटनेला जबाबदार असेल आणि या दुर्घटनेत झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई हा देश करेल. एखाद्या देशाच्या खासगी कंपनीचे यान जरी अशाप्रकारे दुर्घटनाग्रस्त झाले, तरीसुद्धा ती जबाबदारी त्या देशाचीच असणार आहे.
विशेष म्हणजे या कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या देशाला दुर्घटनाग्रस्त यानाने केलेल्या नुकसानीचा कोणताही पुरावा देण्याची किंवा ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.
1978 मध्ये रशियाचा ‘सोव्हिएत कॉसमॉस 954’ हा उपग्रह कॅनडाच्या उत्तर पश्चिम क्षेत्रातील एका निर्मनुष्य रानमाळात कोसळला होता. या दुर्घटनेनंतर यानातील परमाणू रिअॅक्टरमधून मोठय़ा प्रमाणावर किरणोत्सर्गी कचरा त्या भागात पसरला. अमेरिका आणि कॅनडाच्या संयुक्त टीमने हा कचरा साफ केला. या कामासाठी त्या काळी 84 करोड रुपये (6 मिलियन कॅनडीयन डॉलर) खर्च आला होता. कॅनडाने त्यावेळी रशियावर 36 करोड रुपयांचा (6 मिलियन पॅनडीयन डॉलर) दावा या कायद्याअंतर्गत लावला होता. शेवटी रशियाने कसेबसे 18 करोड (3 मिलियन कॅनडीयन डॉलर) देऊन हा मामला गुंडाळला.


























































